BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

३ जाने, २०२३

स्फोट झालेल्या फटाका कारखान्याच्या मालकास ज्वारीच्या पिकातून अटक !

 


शोध न्यूज : स्फोट झालेल्या फटाका कारखान्याच्या मालकांचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके रवाना झालेली असताना मालक युसुफ मणियार हा शिराळे येथेच एका शेतात लपून बसला असल्याचे निदर्शनास आले असून त्याला अटक करण्यात आली आहे तर त्याचा भागीदार मात्र अजूनही बेपत्ता आहे. 


बार्शी तालुक्यातील पांगरी शिराळे परिसरातील फटाके कारखान्यात स्फोट होऊन लागलेल्या आगीमुळे चार महिलांचा मृत्यू झाला असल्याने दु:ख व्यक्त होत असतानाच हा कारखानाच विनापरवाना सुरु असल्याची माहिती उघडकीस आल्याने संताप व्यक्त होत आहे. कारखाना मालक युसुफ मणियार आणि त्याचा भागीदार नाना पाटेकर यांच्यासह बेकादेशीर फटाका कारखान्याकडे डोळेझाक करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी पुढे आली आहे. दरम्यान सदर घटनेनंतर पोलिसांनी युसुफ मणियार, नाना पाटेकर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्यांच्या अटकेसाठी पोलीस पथके रवाना झाली आहेत. दरम्यान त्यांना अटक करण्यात यावी यासाठी पंगरीत आज कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. 


फटाका कारखान्याचा मालक युसुफ हाजी मणियार हा बार्शी तालुक्यातील पांगरी येथीलच असून घटना घडल्यापासून तो अज्ञातस्थळी गेला होता. पोलीस त्याचा शोध घेत होते परंतु त्याचा थांगपत्ता लागत नव्हता. मणियार आणि पाटेकर यांना शोधण्यासाठी एक पथक पुणे, मुंबई, ठाणे आदी भागात पाठविण्यात आलेले होते तर  दुसरे पथक हुबळी, सोलापूर, विजयपूरच्या  भागात रवाना करण्यात आले होते. पांगरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ खुने यांचे एक पथक उस्मानाबाद, केज, बीड, धारूर, कळंब आदी भागात आरोपीचा शोध घेत होते. दोन्ही आरोपी शक्य तेवढ्या लवकर अटकेत येतील यासाठी पोलिसांचा प्रयत्न होता. दरम्यान कारखाना मालक युसुफ मणियार हा शिराळे हद्दीतील सुतार शेतात दडून बसला होता. पोलिसांना याचा सुगावा लागला आणि मणियार याला अटक करण्यात आली.


कारखाना मालक युसुफ हाजी मणियार याला अटक करण्यात आली असली तरी त्याचा भागीदार नाना पाटेकर हा मात्र अजूनही पोलिसांना गुंगारा देत असून त्यालाही लवकर बेड्या पडतील असा पोलिसांचा प्रयत्न आहे. कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, सोलापूर जिल्हा पोलिस प्रमुख शिरीष सरदेशपांडे, अप्पर पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी जालिंदर नालकुल यांच्या मार्गदर्शनाखाली (To the owner of the Barshi Firecracker Factory Arrested from crop) पांगरी पोलीस पथकाचे प्रमुख असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ खुने, सहाय्यक फौजदार सतिश सुनील बोदमवाद, अर्जुन कापसे, संतोषकोळी यांच्या पथकाने मणियार याला अटक करण्यात यश मिळवले आहे. उस्मानाबाद येथील रहिवाशी असलेल्या भागीदार नाना पाटेकर याचा पोलीस शोध घेत आहेत. आरोपींच्या शोधासाठी पोलिसांनी तीन पथके तयार केली आहेत. 


विनापरवाना कारखाना 
स्फोट झालेला फटाका कारखाना हा विनापरवाना चालवला जात असल्याची माहिती स्फोटाची घटना घडल्यानंतर समोर आला होता. रस्त्याच्या कडेला असलेला आणि अनेक वर्षापासून सुरु असलेला हा कारखाना विनापरवाना चालत असतानाही प्रशासनाच्या लक्षात कसे आले नाही असा सवाल उपस्थित होत आहे. पूर्वी दिलेला परवाना नुतनीकरण केलेला नव्हताच पण जेथे हा परवाना दिला होता ती जागा सोडून परस्पर दुसऱ्याच जागेत हा कारखाना बिनधास्त सुरु होता. प्रशासकीय अधिकाऱ्यांना मात्र याचा पत्ताच नव्हता याचे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. 


चार महिलांचा मृत्यू !

सदर दुर्घटनेत चार महिलांचा मृत्यू झाला असून काही जखमी आहेत. सुमन ऊर्फ सुमित्रा ज्ञानोबा जाधवर (वय ५६, रा. वालवड, ता. बार्शी) व गंगाबाई मारुती सांगळे (वय ५०, रा. उक्कडगाव), मीना बाबासाहेब मगर (वय ५२, रा. पांगरी, ता.बार्शी) व मोनिका संतोष भालेराव (वय ३०, रा. वालवड) असे या मृत पावलेल्या महिलांची नावे आहेत.  जखमी कौशल्या सुखदेव बगाडे (वय ३०, रा. पांगरी) यांना उस्मानाबाद येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती गंभीर आहे. सुरुवातीला मृताचा आकडा ९ असल्याचे सांगितले जात होते परंतु हा आकडा चुकीचा असल्याचे नंतर समोर आले.







कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !