BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

४ जाने, २०२३

सोलापूर जिल्ह्यातील आमदार, खासदारांना पाठवल्या बांगड्या !



शोध न्यूज : सोलापूरचे पाणी पळवले जात असतानाही जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी गप्प बसले असल्यामुळे उजनी पाणी संघर्ष समितीने जिल्ह्यातील अकरा आमदार आणि दोन खासदार यांना बांगड्याचा आहेर पाठविला आहे आणि निषेध व्यक्त केला आहे. 


सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी म्हटल्या जात असलेल्या उजनी धरणाचे पाणी पळविण्याचे प्रकार आणि त्यावर राजकारण होण्याचेही प्रकार गेल्या अनेक वर्षांपासून घडत आहेत. उजनीचे पाणी आपापल्या मतदारसंघात नेण्यासाठी कित्येक लोकप्रतिनिधींची धडपड कायम सुरु असते. इंदापूर तालुक्यातील लाकडी निंबोडी योजनेसाठी उजनीचे पाणी देण्यास सोलापूर जिल्ह्यातून प्रखर विरोध होत आहे तर सोलापूरच्या वाट्याचा एक थेंब देखील इंदापूर तालुक्याला दिला जाणार नसल्याचे आधीपासूनच सांगण्यात येत आहे. महाविकास आघाडी सरकारमधील सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यावर उजनीचे पाणी पळवले जात असल्याबाबत सतत आरोप झाले आणि त्यांच्या राजीनाम्याचीही मागणी होत राहिली. राष्ट्रवादीवर आधी आरोप केले जात होते परंतु आता सत्तांतर झाले तरीही लाकडी निंबोडी सिंचन योजनेला गती दिली जात आहे. राष्ट्रवादी पक्षावर आरोप करणारे भाजपचे नेते आता मात्र शांत बसलेले दिसत आहेत. 


सोलापूरचे हक्काचे पाणी पळवले जात असतानाही सोलापुरातील भाजप आमदार, खासदार आणि कॉंग्रेस पक्षाचे आमदार का गप्प आहेत ? असा सवाल करीत उजनी पाणी संघर्ष समितीने जिल्ह्यातील ११ आमदार आणि २ खासदार यांना बांगड्यांचा आहेर पाठवून निषेध व्यक्त केला असून लढा आक्रमक करण्याचा इशाराच समितीने दिला आहे. समितीचे प्रमुख अतुल खुपसे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा देखील निषेध व्यक्त केला आहे. मोहोळ येथील शासकीय विश्रामगृहावर सर्वपक्षीय शेतकरी नेत्यांची एक बैठक झाली आणि या बैठकीत लोकप्रतिनिधी आणि शासनाचा निषेध करण्यात आला. यावेळी भारतीय जनता पक्षावर सडकून टीका करण्यात आली आहे. महाविकास आघाडीचे सरकार असताना लाकडी निंबोडी योजनेस पाणी देण्यास भाजपाच्या लोकप्रतिनिधी आणि नेत्यांनी विरोध केला होता. आता राज्यात भाजप सत्तेत असताना लाकडी निंबोडी योजनेची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. महाविकास आघाडीचे सरकार असताना तत्कालीन जलसंपदा मंत्री जयंत पाटील येन ही योजना रद्द झाली असल्याचे लेखी परिपत्रक काढले होते. 


महाविकास आघाडी सत्तेत असताना देवेंद्र फडणवीस यांनी लाकडी निंबोडी योजनेस पाणी देण्याबाबत वेगळी भूमिका घेतली होती, आता ते राज्यात सत्तेत असताना या योजनेला गती मिळू लागली आहे आणि उजनीचे पाणी पळविण्याची प्रक्रिया वेगाने सुरु झाली आहे. जलसंपदा विभाग त्यांच्याकडे असूनही उजनीचे पाणी बारामती आणि इंदापूरला जात आहे याबाबत देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत देखील नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. बारामतीमधून भाजपाचा खासदार आणि इंदापुरामधून आमदार निवडून आणण्यासाठी सोलापूरच्या हक्काचे पाणी इंदापूर आणि बारामतीकडे देण्यास मान्यता दिली जात आहे काय ? असा सवाल उपस्थित करीत समितीने निषेध केला. (Bangles sent to MLAs, MPs of Solapur district) आज लोकप्रतिनिधीना केवळ बांगड्यांचा आहेर पाठवत आहोत पण तोडगा नाही काढला तर हातात काठ्या घेवून शेतकरी रस्त्यावर उतरतील असा सणसणीत इशारा देखील यावेळी देण्यात आला आहे.




.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !