BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

५ जाने, २०२३

मोबाईल आणि टीव्हीच्या वापरावर दोन तासांची बंदी !




शोध न्यूज : प्रत्येकजण हल्ली मोबाईल आणि टी. व्ही च्या पडद्यासमोर व्यस्त झाला असतानाच पंढरपूर तालुक्यातील एका गावात मोबाईल आणि टीव्हीच्या वापरावर दोन तास बंदी घालून एक आदर्श उपक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे. 


प्रत्येक व्यक्तीकडे हल्ली मोबाईल आलेला आहे आणि याचा अतिरेकी वापर सुरु आहे. शाळकरी मुलांच्या हातात देखील पुस्तकांऐवजी मोबाईल फोन अधिक दिसू लागला आहे. याचे अनेक दुष्परिणाम समोर आलेले आहेत. मुलांची दृष्टी अधू होऊ लागली असून शाळकरी मुले या मोबाईलवर केवळ गेम खेळण्यात व्यस्त आहेत.  मोबाईल आणि टीव्ही हा सगळ्यांच्याच जीवनाचा अविभाज्य भाग झाला असून त्याचा विपरीत परिणाम शाळकरी मुलांवर होताना दिसत आहे. मैदानी खेळ विसरून मुले केवळ मोबाईलशी खेळत बसू लागल्याने आवश्यक शारीरिक विकास देखील खुंटू लागला आहे. शाळेतून आले की मुले मोबाईल हातात घेतात किंवा टीव्हीचा रिमोट घेतात. याचे अनेक दुष्परिणाम समोर आले असून नव्या पिढीला याचा धोकाही उत्पन्न झालेला आहे. डॉक्टर देखील याबाबत सूचना देतात पण 'मुले ऐकत नाहीत' अशी सबब पालक सांगत असतात. अशा परिस्थितीत पंढरपूर तालुक्यातील देगाव या गावात एक अत्यंत आदर्श उपक्रम हाती घेण्यात आला आहे. 


कुठल्याही गोष्टीचा अतिवापर हा नुकसानदायकच असतो आणि मोबाईल, टीव्हीचा अतिवापर घराघरात सुरु असून मुलांच्या अभ्यासावर याचा विपरीत परिणाम होत असल्याचे दिसते. यामुळे देगाव ग्रामपंचायतीने गावात एक उपक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे. गावात दररोज सायंकाळी ६ ते ८ या वेळेत मोबाईल आणि टीव्ही बंदीची घोषणाच करण्यात आली आहे. 'अभ्यासासाठी दोन तास' हा एक आदर्श उपक्रम देगाव ग्रामपंचायतीने हाती घेतला असून त्याची अंमलबजावणी देखील सुरु करण्यात आली आहे. या काळात दोन तास घरातील टीव्ही मोबाईल बंद करून केवळ मुलांचा अभ्यास घेतला जावा अशा सूचनाच पालकांना देण्यात आल्या आहेत.  


देगाव ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच तसेच सदस्य व गावकऱ्यांनी सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त बालिका दिन जिल्हा परिषद शाळेत साजरा करत 'अभ्यासासाठी दोन तास' या नाविन्यपूर्ण उपक्रमाची घोषणा केली आहे. याअंतर्गत दररोज सायंकाळी ६ ते ८ या दोन तासांच्या दरम्यान गावामध्ये सायरन वाजवला जातो. याबाबत ग्रामपंचायतमधील सेवक दवंडी देऊन आवाहन करतात. या वेळेत गावातील सर्व घरांमधील टीव्ही व मोबाईल बंद ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे. (Ban on mobile and TV usage for two hours) तसेच या कालावधीमध्ये पालकांनी विद्यार्थ्यांकडून अभ्यास करून घ्यावयाचा आहे. या उपक्रमामुळे मोबाईल, टीव्हीच्या आहारी गेलेले विद्यार्थी व पालक पुन्हा विद्यार्थ्यांच्या भवितव्याकडे वळतील. तालुक्यातील सर्व ग्रामपंचातींनी असा उपक्रम राबवावा, असे आवाहन सरपंच सीमा घाडगे यांनी केले आहे. या उपक्रमाचे ग्रामस्थांसह शिक्षक, विद्यार्थी यांनी स्वागत केले आहे. 


गावात ठरवून दिलेला हा नियम घराघरात पाळला जातोय की नाही याची पाहणी ग्रामपंचायत सदस्य आणि सेवक हे स्वत: जाऊन पाहत आहेत. सदर दोन तासात मुले अभ्यास करीत नसतील आणि मोबाईल, टीव्ही वापरला जात असेल तर त्या कुटुंबाला एक हजार रुपयांचा दंड आकाराला जात आहे !
 


देगाव ग्रामपंचायतीचा हा आदर्श गावागावात घेण्याची आवश्यकता असून यापूर्वी देखील राज्यातील काही गावात असा उपक्रम राबविणे सुरु झाले आहे. मुलांच्या शारीरिक आणि  मानसिक आरोग्यासाठी देखील हे अत्यावश्यक बनले आहे. मुलांच्या डोळ्यांच्या तक्रारी वाढलेल्या असून मोबाईलच्या अतिवापरामुळे बोटांचे देखील आजार बळावले आहेत. कोरोनाच्या कालावधीत शाळा बंद होत्या आणि ऑनलाईन अभ्यास घेतला जात होता. या काळात मोबाईल वापराचे प्रमाण प्रचंड वाढले होते आणि तशी गरज निर्माण झाली होती. या दरम्यान मुलांच्या हाताला चिकटलेला मोबाईल तसाच राहिला आहे आणि त्याचा अपाय अनेक मुलांच्यात दिसून आला आहे. देगाव ग्रामपंचायतीने राबवलेला हा उपक्रम गावागावात राबवला जावा अशी अपेक्षा देखील व्यक्त होऊ लागली आहे. 





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !