शोध न्यूज : भरदिवसा पोलिसांच्या हातावर तुरी देत पोलिसांच्या ताब्यातील आरोपीने धूम ठोकली असून या आरोपीने तिसऱ्यांदा पोलिसांना हुलकावणी दिली आहे. आरोपीने पलायन केल्याने पोलीस दलात देखील प्रचंड खळबळ उडाली आहे.
पोलीस परिश्रमाने एखाद्या आरोपीला अटक करतात आणि त्याला गजाच्या आड बंदिस्त करतात पण नंतर होत असलेल्या थोड्याशा हयगयीमुळे पोलिसांच्या ताब्यातील आरोपी निसटून जात असल्याच्या घटना अधूनमधून घडत असतात. बंदिस्त असलेल्या तुरुंगातून देखील आरोपी बेमालूमपणे निसटून जातात आणि त्याचा परिणाम पोलिसांना भोगावा लागतो. पळून गेलेला आरोपी आज ना उद्या पुन्हा पोलिसांना सापडत असतो परंतु हयगय केलेल्या पोलिसांना मात्र शिक्षा भोगावीच लागते. तुरुंगातून आरोपी पळून जाऊ शकतात त्यामुळे न्यायालयात नेताना आणि परत आणताना विशेष काळजी घ्यावीच लागते. जेंव्हा यात कसूर होते तेंव्हा आरोपीला पळून जाण्याची संधी मिळते. असाच प्रकार सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथे घडला आहे आणि पोलिसांच्या ताब्यातील एक आरोपी न्यायालयातून बेमालूमपणे पळून जाण्यात यशस्वी झाला आहे.
बनावट नोटांच्या प्रकरणात अटक केलेला आणि न्यायालयात आणलेला सिद्धेश्वर केचे हा माढा तालुक्यातील बारलोणी येथील आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देत न्यायालयातून पळून गेला आहे. सोलापूर जिल्ह्यातील माढा, टेंभुर्णी, वैराग अशा ठिकाणी बनावट नोटा चलनात आणल्याप्रकरणी विविध कलमानुसार केचे याच्यावर गुन्हे दाखल आहेत. त्याला सोलापूर येथील कोठडीत ठेवण्यात आले होते. आरोपीला ठराविक कालावधीत न्यायालयासमोर उभे करण्याची आवश्यकता असते त्यामुळे केचे याला आणि अन्य एका महिला आरोपीला बार्शी येथील न्यायालयात आणण्यात आले होते. यावेळी दोन पोलीस कर्मचारी आणि एक महिला पोलीस कर्मचारी यांचा बंदोबस्त देण्यात आला होता. सोलापूर येथून बसने पोलीस कर्मचारी या आरोपींना बार्शीत घेवून गेले होते. बार्शी येथील न्यायालयापर्यंत आरोपींना व्यवस्थित आणण्यात आले पण न्यायालयात आल्यावर या आरोपीने आपला रंग दाखवला आणि पोलिसांच्या हाती तुरी देण्यात यशस्वी झाला.
बार्शी येथील न्यायालयात आणल्यानंतर केचे याने पोलिसांना लघुशंकेचे निमित्त केले आणि त्यानंतर पोलिसांना हिसडा देत त्याने न्यायालयाच्या आवारातून पलायन केले. तो पळून जाऊ लागताच पोलिसांनी त्याचा पाठलाग केला पण आरोपी मात्र पळून जाण्यात यशस्वी झाला. विशेष म्हणजे त्याच्या डाव्या हातात बेडी घातलेली आहे. मोडनिंब येथील गुरांच्या बाजारात स्वत:चा पिकअप टेम्पो घेऊन डुप्लिकेट नोटा देऊन शेळ्या खरेदी करताना त्याला अटक करण्यात आली होती. एक वर्षापूर्वी त्याला ही अटक केली गेली होती परंतु या आरोपीने पुन्हा एकदा पोलिसांना हुलकावणी दिली आहे. (Accused in police custody absconded with handcuffs, Arrested in fake note case ) विशेष म्हणजे या आरोपीचा पलायन करण्याचा इतिहास आहे. पोलिसांच्या ताब्यात असतांना पळून जाण्याची त्याची ही तिसरी वेळ आहे. आता पुन्हा पळून गेल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !