BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१४ जाने, २०२३

महिला सरपंचांच्या हाती पहिल्याच दिवशी झाडू !

 



शोध न्यूज :  जनतेतून निवडून आलेल्या सरपंचांचा रुबाब आणि थाट काही वेगळाच असतो पण एका महिला सरपंचाच्या हाती पहिल्याच दिवशी झाडू आला आणि या महिला सरपंचाचे राज्यभर कौतुक होऊ लागले आहे.


ग्रामपंचायत निवडणुकीत साधा सदस्य निवडून आला तर त्याचा जल्लोष काही वेगळाच असतो. यावेळी ग्रामपंचायत सरपंच पदाची निवडणूक थेट जनतेतून घेण्यात आली आणि त्यामुळे चुरस देखील वाढलेली होती.  निवडणुकीत विजय संपादन करण्यासाठी कुणी कुणी आणि काय काय प्रकार केले याची चर्चा अजूनही सुरु आहे. जनतेतून निवडून आलेल्या सरपंचांचा जल्लोष पुढे काही दिवस टिकतो आणि उधळलेल्या गुलालात जनतेला दिलेली आश्वासने अदृश्य होऊन जातात. निवडणुकीत विजयी होण्यासाठी भल्या मोठ्या बाता मारल्या जातात पण निवडून आल्यानंतर हळूहळू मत दिलेल्या जनतेचा विसर पडतो. बहुतेक गावात अशाच तक्रारी येत असतात. धुळे जिल्ह्यातील एका महिला सरपंचाने मात्र राज्यातील  सरपंचाच्या आणि सदस्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजन घातले आहे. 


महिला सरपंच म्हटलं की केवळ नावापुरत्या असतात आणि त्यांचा कारभार त्यांचे पतीदेव करीत असतात. पत्नी सरपंच असली तरी हे पतीच गावात सरपंच म्हणून वावरत असतात. पत्नीच्या सरपंचपदाच्या खुर्चीवर पती बसल्याचे काही फोटो देखील सोशल मीडियावर झळकले असून या 'नकली' सरपंचाची सोशल मीडियावरून पुरेशी टिंगल देखील झाली आहे.  महिला राष्ट्रपती, पंतप्रधान अशी सर्वोच्च पदे सांभाळू शकतात पण काहींचा महिलांबाबत समज अजूनही काहीसा वेगळाच असल्याचे दिसते. धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील गव्हाणीपाडा- माळपाडा येथील नूतन महिला सरपंच बालीबाई बाजीराव चौरे यांनी मात्र एक वेगळाच धडा घालून दिला आहे. निवडणूक आलेल्या सरपंचांचे रुबाबाचे फोटो प्रसिद्ध होतात पण या महिला सरपंचाचे हातात झाडू घेतल्याचे  फोटो राज्यभर व्हायरल होत आहेत.  


जनतेतून निवडून आल्यावर गुलाल उधळण्याचे आणि सत्काराचे फोटो व्हायरल केले जातात पण लोकनियुक्त सरपंच बालीबाई चौरे यांनी मात्र अशा थाटामाटाला फाटा दिला आणि सर्वप्रथम आपल्या कर्तव्याची भूमिका पार पाडली. कार्यक्रम, उद्घाटने, हारतुरे अशा तात्कालिक बाबींना महत्व दिले जाते पण बलीबाई यांनी सर्वप्रथम स्वच्छतेला महत्व दिले. गावाच्या विकासाआधी गावातील स्वच्छता आणि नागरिकांचे आरोग्य महत्वाचे असते पण नेमके याकडेच दुर्लक्ष होत असते. बालीबाई चौरे या थेट जनतेतून निवडून येताच आणि सरपंचपदाचा कार्यभार हाती घेण्याच्या आधी त्यांनी झाडू हातात घेतला. ग्रामपंचायत कार्यालयात पहिल्या दिवशी पाउल ठेवताना त्या नवी केरसुणी घेवून आल्या आणि आपल्या हाताने ग्रामपंचायत कार्यालय झाडून स्वच्छ केले. 


बालीबाई चौरे यांनी केलेले हे काम पाहून आधीच्या सरपंच आणि सदस्यांचे चेहरेही पाहण्यासारखे झाले तर पुढील निवडणुकीत निवडून येणाऱ्यासाठी देखील एक पायंडा घालून दिला. (A broom in the hands of women sarpanches on the very first day) राज्यात जनतेतून थेट निवडून आलेले अनेक सरपंच आहेत परंतु एकाही सरपंचाचा अशा प्रकारे लौकिक झाला नाही. गावकरी बालीबाई चौरे यांचे कौतुक करीत असून आपण योग्य सरपंच निवडून दिल्याचा त्यांना गर्व वाटू लागला आहे. त्यांच्याकडून आता संपूर्ण गाव स्वच्छ राहिल आणि गावकऱ्यांच्या आरोग्याची देखील काळजी घेतली जाईल असा विश्वास गावकरी व्यक्त करू लागले आहेत.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !