BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

७ डिसें, २०२२

उत्पादन शुल्क विभागाने गोवा बनावटीची दारू पकडली !



पंढरपूर येथील राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने मोहोळ तालुक्यात केलेल्या कारवाईत माढा तालुक्यातील एकाला गोवा बनावटीच्या दारूसह ताब्यात घेतले असून अलीकडेच अशा प्रकारची एक कारवाई करण्यात आली होती.


गोवा राज्यातील दारू महाराष्ट्रात आणण्यास बंदी आहे परंतु गोव्यातील दारू स्वस्त असल्यामुळे तेथून ती आणून महाराष्ट्रात जादा दराने विकली जाते आणि यात मोठा आर्थिक फायदा असतो त्यामुळे अलीकडे गोव्यातील दारू महाराष्ट्रात आणण्याचे प्रमाण वाढताना दिसत आहे. अलीकडेच मंगळवेढा तालुक्यात एक कार पकडून त्यातील गोवा बनावटीची दारू जप्त करण्यात आली होती. आता पुन्हा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पंढरपूर येथील पथकाने मोहोळ तालुक्यात रस्त्यावर सापळा लावून वाहतूक केली जात असलेली गोवा राज्यातील विदेशी दारू पकडण्यात आली असून यात माढा तालुक्यातील टेंभुर्णी येथील एकाला ताब्यात घेण्यात आले आहे. मोहोळ तालुक्यातील खंडाळी गावाच्या हद्दीत उत्पादन शुल्क विभागाने ही कारवाई केली आहे. 


राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार या पथकाने खंडाळी गावच्या हद्दीत रस्त्यावर आपल्या पद्धतीने सापळा लावला होता. खंडाळी ते खंडाळी पाटी या दरम्यान सापळा लावून उत्पादन शुल्क विभागाचे पथक 'सावज' टप्प्यात येण्याची प्रतीक्षा करीत होते. याच वेळी एकजण विना क्रमांकाच्या दुचाकीवरून येताना दिसला. त्याचे वागणे काहीसे संशयास्पद दिसल्यामुळे या पथकाने त्याला थांबण्याचा इशारा केला. पथकाला पाहताच त्याने आपली दुचाकी तेथेच टाकली आणि तेथून पळ काढला. यामुळे तर उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाचा संशय अधिकच बळावला. त्याच्या पाठीमागून एक स्विफ्ट कार येत होती त्यामुळे या कारला (MH12 HV 5790) पथकाने थांबवले आणि पंचासमक्ष गाडीची तपासणी केली.


सदर कारची तपासणी केली असता या गाडीत देशी विदेशी मद्याचा साठा आढळून आला. कारचा चालक बालाजी बबन खडके (टेंभुर्णी, ता. माढा) यास पथकाने ताब्यात घेतले. महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ नुसार खडके याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोवा राज्य निर्मित 'एड्रियल व्हिस्की' च्या ७५० मिली क्षमतेच्या १८० बाटल्या, 'रॉयल स्टॅग' व्हिस्कीच्या १८० मिली क्षमतेच्या ५० बाटल्या,  'इंपेरियल ब्ल्यू' व्हिस्कीच्या १८० मिली क्षमतेच्या ४८ बाटल्या, देशी दारुच्या १८० मिली क्षमतेच्या १४४  बाटल्या तसेच बाटलीची बनावट बुचे असे साहित्य या गाडीत आढळून आले असून हा साठा जप्त करण्यात आला आहे.  


जप्त करण्यात आलेल्या मद्याची किंमत एक लाख ३४ हजार एवढी असून दोन्ही वाहनेही जप्त करण्यात आली आहेत. (Excise department seized Goa-made liquor) वाहनासह एकूण ६ लाख २ हजर ७८० रुपयांचा मुद्देमाल या पथकाने जप्त केला असून यातील दुसरा संशयित आरोपी सचिन बनसोडे हा मात्र या पथकाच्या हाती लागला नाही. त्याच्या विरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा शोध घेतला जात आहे.  



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !