शोध न्यूज : राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधून प्रवास करताना प्रवाशाच्या बॅगेतील साडे तीन लाख रुपयावर अज्ञात चोरटयांनी डल्ला मारला असून अत्यंत कौशल्याने चोरट्याने ही रक्कम लांबवली आहे.
एस टी बसमधून प्रवास करताना, विशेषतः बसमध्ये चढताना चोरटे आपली 'करामत' दाखवताना दिसतात. महिलांच्या गळ्यातील दागिने तसेच पर्समधील दागिने हातोहात लंपास करण्याचा अनेक घटना बस स्थानकावर घडत असतात. काही वेळा चोरी होताना हे लक्षात येते तर कित्येकदा चोर चोरी करून गायब झाल्यावर चोरीचा प्रकार लक्षात येतो. बस स्थानकावर पोलिसांची नेमणूक असते पण तरीही प्रवाशांच्या साहित्याच्या, महिलांच्या दागिन्यांच्या चोऱ्या होताना दिसतात. पंढरपूर तालुक्यातील करकंब येथील एक प्रवाशाच्या बॅगेतील रक्कम कधी काढली हेच समजू शकले नाही एवढ्या चलाखीने तीन लाख पस्तीस हजार रुपयांची चोरी झाल्याची घटना करकंब ते पंढरपूर प्रवासादरम्यान घडली आहे. त्यामुळे एस टी प्रवाशांत पुन्हा एकदा असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.
करकंब येथील वृद्ध कुमार दगडू टकले आणि दत्तात्रय बोधे ये टेंभुर्णी - पंढरपूर एस टी बसने सोलापूर येथे निघाले होते. सोलापूर येथील एका व्यक्तीला उसने देण्यासाठी म्हणून त्यांनी आपल्या जवळ एका बॅगेत ३ लाख ३५ हजाराची रक्कम घेतली होती. एसटीमध्ये चढल्यानंतर बसताना त्यांनी आपल्या बॅगेच्या सुरक्षेची काळजी देखील घेतली होती. दोन पायांच्या मध्ये बॅग ठेवून त्यांचा प्रवास सुरु झाला होता. पंढरपूर बस स्थानकावर हे दोघेही एस टी मधून खाली उतरले तेंव्हा मात्र या बॅगेची चैन अर्धवट उघडी असल्याचे त्यांना दिसले. पैशाची बॅग काळजीपूर्वक ठेवली असताना चेन उघडलेल्या अवस्थेत त्यांना दिसली त्यामुळे त्यांनी बॅगेतील पैशाची चाचपणी केली. बॅगेत ठेवलेली रक्कम गायब असल्याचे पाहून त्यांना धक्का बसला. पैशाची बॅग काळजीपूर्वक ठेवली असताना काही वेळातच ही रक्कम अलगद गायब झालेली होती.
धास्तावलेल्या या दोघांनीही तातडीने पंढरपूर शहर पोलिसात धाव घेतली आणि आपली रक्कम चोरीला गेल्याची फिर्याद दिली. पायात पकडून ठेवलेली बॅग जागेवर होती परंतु बागेतील ३ लाख ३५ हजार रुपयांची रक्कम मात्र गायब झालेली होती. अत्यंत हातचलाखीने चोरट्याने त्यांच्या रकमेवर डल्ला मारलेला होता. ही चोरी नेमकी कधी आणि कुठे झाली हे लक्षात येत नवहते परंतु करकंब ते पंढरपूर प्रवासाच्या दरम्यान भोसे पाटी येथे दोन महिला बसमधून उतरल्या होत्या. (S. T. Theft of passenger's money while travelling) त्यांच्या सोबत एक पाच वर्षे वयाची मुलगीही होती. या महिलांनीच ही रक्कम लांबवली असण्याची शक्यता कुमार टकले या ६८ वर्षे वयाच्या वृद्धाने व्यक्त केली असून पोलीस आता या महिलांचा शोध घेत आहेत.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !