BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

८ डिसें, २०२२

चाळीस ग्रामसेवकांवर एकाच वेळी निलंबनाची कारवाई !





शोध न्यूज : काही ग्रामसेवक लाचखोरीत अडकले असतानाच एकाच वेळी तब्बल ४० ग्रामसेवकाना निलंबित करण्याची मोठी कारवाई करण्यात आली आहे.


अनेक ग्रामपंचायतीचा कारभार प्रचंड वादग्रस्त असतो आणि भ्रष्टाचाराच्या मोठ्या तक्रारी समोर येत असतात. शासकीय प्रतिनिधी म्हणून ग्रामसेवकाची नियुक्ती ग्रामपंचायतीत असते पण काही ग्रामसेवकच भ्रष्टाचार करतात. सरपंच आणि ग्रामसेवक हे संगनमत करुन गैरकृत्य करीत असतात. अशा अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. शासकीय योजनात भ्रष्टाचार, ठेकेदाराकडून लाच घेणे अशाही प्रकरणात काही ग्रामसेवक अडकले आहेत. ग्रामपंचायतीत होत असलेल्या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी होण्याची गरज असताना अशी चौकशी होऊ नये यासाठी ग्रामसेवकच आंदोलन करु लागले आहेत.


ग्रामपंचायतीमधील भ्रष्टाचाराची चौकशी न करण्याच्या मागणीसाठी ग्रामसेवकांनी चक्क आंदोलन केले पण हे आंदोलन करणे ग्रामसेवकांना चांगलेच महागात पडले आहे. भ्रष्टाचाराची चौकशी केली जावी म्हणून आंदोलने होत असतात पण ग्रामसेवक मंडळींनी चक्क भ्रष्टाचाराची चौकशी करु नये अशी अजब मागणी करीत आंदोलन केले. हेच आंदोलन त्यांना भोवले असून अजब मागणी करणाऱ्या या ४० ग्रामसेवकांच्या निलंबनाचे आदेश नांदेड जिल्हा परिषदेने काढले आहेत. या निलंबनामुळे जिल्हाभर एकच खळबळ उडाली आहे.


महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मुखेड तालुक्यातील हंगरगा आणि गुंडोपंत दापका या दोन ग्रामपंचायतीच्या कारभाराची चौकशी करावी, या मागणीसाठी आंदोलन केले होते. याला प्रत्युत्तर करीत  या दोन्ही ग्रामपंचायतीची फेरचौकशी करू नये, गटविकास अधिकाऱ्यांना दिलेले निलंबनाचे आदेश रद्द करावेत, या मागणीसाठी ग्रामसेवकांनी असहकार आंदोलन केले होते. आंदोलन विरूध्द आंदोलन असा प्रकार घडल्याने याची वेगळ्या प्रकारे चर्चा सुरु झाली होती. त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आंदोलक ग्रामसेवकांच्या विरूध्द कारवाई करण्यासाठी आंदोलन केले. ग्रामसेवकानी चौकशी न करण्यासाठी केलेल्या आंदोलनात सहभागी झालेल्या ग्रामसेवकावर कारवाई करावी यासाठी मनसेने  जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या कक्षात ठिय्या आंदोलन केले. अखेर उप मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आंदोलनात सहभागी ४० ग्रामसेवकाना निलंबित केले. निलंबनाची कारवाई होताच जिल्हाभर प्रचंड खळबळ उडाली आहे.


भ्रष्टाचार झाल्याचा आरोप झाल्यावर चौकशी आवश्यक ठरते. भ्रष्टाचार केलेला नसेल तर चौकशीची भीती असण्याचे काही कारणही नसते. (Simultaneous suspension action against forty gramsevaks) परंतु चौकशी केली जाऊ नये या मागणीसाठी आंदोलन केले जाते याचेच आश्चर्य व्यक्त केले जात असून चाळीस ग्रामसेवकाना हे भलतेच महागात पडले आहे.








कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !