शोध न्यूज : भरधाव वेगातील ट्रकचा ब्रेक फेल होताच ट्रक चालकाने ट्रकमधून उडी मारली आणि विनाचालक ट्रक रस्त्यावर धावत राहिल्याचा थरारक व्हिडीओ व्हायरल होत असून त्यातून हा सर्व प्रकार लाईव्ह पाहायला मिळत आहे.
सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात एका एस टी चा ब्रेक फेल झाला आणि चालकाने प्रसंगावधान राखत एस टी शेतात घालून ७० प्रवाशांचे प्राण वाचाविल्याची घटना नुकतीच घडली आहे. भर रस्त्यावर वाहनांचे ब्रेक फेल झाले तर अनर्थ अटळ ठरतो. क्वचित प्रसंगी चालकाच्या हुशारीमुळे अशा वाहनावर देखील नियंत्रण मिळवले जाते परंतु मोठी वाहतूक असलेल्या रस्त्यावर अपघात टाळता येत नाही. एक बसने अनेक वाहनांना धडक दिल्याची घटना देखील ताजी आहे. रस्त्यावर अनेक वाहने धावत असताना एखाद्या वाहनाचा ब्रेक फेल झाला तर वाहन अनियंत्रित होते. अशा वेळी हे वाहन किती वाहनांना ठोकर मारत धावत राहील हे सांगता येत नाही.
पुणे - मुंबई महामार्ग तर अपघातासाठी प्रसिद्ध आहे. या मार्गावर सतत अपघात होतात आणि अनेकांचे प्राण जातात. अशा मार्गावर एक वेगळाच थरार घडला असून हा थरार कॅमेऱ्यात चित्रित झाला आहे. पुणे - मुंबई महामार्गावरून प्रचंड वेगाने निघालेल्या एका ट्रकचा ब्रेक अचानक निकामी होतो आणि हा ट्रक सुसाट धावत सुटतो. पुढील धोका लक्षात येताच या ट्रकचा चालक धावत्या ट्रकमधून खाली उडी घेतो. त्यानंतर तर या ट्रकवर कुणाचेच नियंत्रण राहत नाही. (Viral video, brake failure driver jumps, Uncontrolled truck) रस्त्याच्या दोन्ही बाजूने अनेक वाहनांची ये जा सुरु आहे आणि अशा परिस्थितीत विनाचालक ट्रक सुसाट धावत राहतो. हा थरार कॅमेऱ्यात चित्रित झाल्याने तो पाहायला मिळत असून लोक पुन्हा पुन्हा हा व्हिडीओ पाहत आहेत.
सिमेंटच्या गोणी घेऊन हा ट्रक पुण्याहून मुंबईला निघालेला असताना बोरघाटात अमृतांजन पुलाच्या अलीकडेच अचानक ब्रेक फेल झाला. त्यामुळे या ट्रकने एका बसला धडक दिली, त्यानंतर मात्र ट्रकचालकाने सरळ धावत्या ट्रकमधून खाली उडी घेतली आणि वेगात असलेला हा ट्रक अनियंत्रितपणे सुसाट धावत राहिला. भर रस्त्यावर एक वेगळाच थरार सुरु झाला आणि अनेकांना धडकी भरली. हा ट्रक रस्ता दुभाजकाला धडक देत देत पुढे जात राहिला आणि अमृतांजन पुलाच्या पुढे गेल्यावर मात्र तो थांबला. एवढी थरारक घटना घडूनही सुदैवाने जीवितहानी झाली नाही आणि थरार पाहणाऱ्या सर्वानीच सुटकेचा निश्वास टाकला. पहा हा थरारक व्हिडीओ !


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !