शोध न्यूज : सोलापूर जिल्ह्यातील दोन ग्रामसेवकांना निलंबित करण्यात आले असून एका ग्रामसेवकाची वेतनवाढ रोखण्याची मोठी कारवाई मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी केली आहे.
सोलापूर जिल्हा परिषदेतील कामचुकार आणि कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी यांना वठणीवर आणण्याचा सपाटाच मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी लावला आहे. कालच सोलापूर जिल्हातील एका मुख्याध्यापकासह तीन उप शिक्षकावर निलंबनाची कारवाई केली आहे आणि आज सलग दुसऱ्या दिवशी तीन ग्रामसेवकावर मोठी कारवाई करण्यात आली आहे. यातील एक ग्रामसेवक माढा तालुक्यातील असून एक माळशिरस तालुक्यातील तर तिसरा दक्षिण सोलापूरमधील आहे. माढा तालुक्यातील जाधववाडी (मो) ग्रामपंचायतीत कार्यरत असताना ग्रामसेवक रत्नाकर रोहिदास अभिवंत यांना निलंबित करण्यात आले आहे.
जाधववाडी ग्रामपंचायतीत कार्यरत असताना सजामध्ये अनुपस्थित राहणे, कर्तव्यात कसूर करणे, कामकाजात अनियमितता, आर्थिक अनियमितता याबाबत पंचायत समिती कुर्डूवाडी गट विकास अधिकारी यांचा अहवालानुसार अभिवंत यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. पंचायत समिती दक्षिण सोलापूर अंतर्गत बोरामणी ग्रामपंचायत येथे कार्यरत असताना ग्रामसेवक एन. जी. जोडमोटे यांच्यावर देखील ठपका ठेवण्यात आला असून त्यानाही निलंबित करण्यात आले आहे. ग्रामपंचायत सचिव म्हणून ग्रामसेवक पदाची कर्तव्ये आणि जबाबदारी पार पडण्याबाबत अक्षम्य दुर्लक्ष केल्याचा ठपका ठेवला गेला आहे.
ग्रामसेवक जोडमोटे यांची बोरामणी येथून बदली झाल्यानंतर ग्रामपंचायतीचा संपूर्ण कार्यभार हस्तांतरित न करणे, दप्तर तपासणीसाठी ग्रामपंचायतीचे अभिलेखे उपलब्ध न करून देणे, विकास कामे करताना विविध योजना आणि प्राप्त निधी खर्च करताना अधिक अनियमितता आणि अपहार करणे, १४ वा वित्त आयोगाचा निधी खर्च करताना विहित कार्यपद्धतीचा अवलंब न करणे, निधी खर्च करताना आर्थिक अनियमितता आणि अपहार करणे वगैरे दोषारोप चौकशीत सिद्ध झाले असल्यामुळे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
ग्रामसेवक पांडुरंग महादेव एकतपुरे हे माळशिरस तालुक्यातील माळेवाडी बोरगाव ग्रामपंचायतीत कार्यरत असताना कर्तव्यात अक्षम्य दुर्लक्ष करणे, वरिष्ठांच्या आदेशाचा अवमान करणे, कर्तव्यात कसूर आणि गैरशिस्तीचे वर्तन करणे, शासकीय सेवक असतानाही प्रशासनास सहकार्य न करणे तसेच दिशाभूल करणारी आणि चुकीची माहिती न्यायालयात देणे, अभियोग पक्षाचे खटल्यास अनुसरून साक्ष न देणे असा ठपका ठेवण्यात आला आहे. महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा (वर्तणूक) नियम १९६७ मधील नियम ३ चा भंग केलेने महाराष्ट्र जिल्हा परिषद जिल्हा सेवा (शिस्त व अपील ) नियम १९६४ मधील नियम ४ मधील उपनियम (२) नुसार त्यांची वेतनवाढ तात्पुरत्या स्वरुपात स्थगित करण्यात आली आहे.
काल एक मुख्याध्यापक आणि तीन उपशिक्षक यांचे निलंबन करण्यात आल्यानंतर आज तीन ग्रामसेवकावर कारवाई झाल्यामुळे जिल्हा परिषदेतील अधिकारी, कर्मचारी हादरले असून आणखी किती जणांवर कारवाईचा असा बडगा येतोय याकडेच आता लक्ष लागले आहे. (Two gramsevaks suspended in Solapur district) कर्तव्यात कसूर करणाऱ्या आणि आर्थिक अनियमितता करणाऱ्यांची आता काही खैर नसल्याचेच दिसून येवू लागले आहे. या कारवाईमुळे अनेकांचे धाबे दणाणले आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !