शोध न्यूज : राजकारणात अनेक नेत्यांनी बोलण्याचे ताळतंत्रच सोडले असल्याचे दिसत असताना आता पुन्हा सदाभाऊ खोत आणि राजू शेट्टी यांच्यात वाकयुद्ध रंगले आणि रेड्यापासून भुरट्यापर्यंत उपमा देण्यात आल्या.
राजकारणात बोलण्याची पातळी कुठल्या ठरला गेली आहे हे आता सर्वसामान्य माणसाला ज्ञात आहे. काही राजकीय व्यक्तींची विधाने समाजात अशांतता निर्माण करीत असून कसले ताळतंत्र राहिले नसल्याचे दिसत आहे. टीका करताना तर काही मर्यादाच उरल्या नसल्याचे सतत समोर येत आहे आणि प्रसिद्धी माध्यमे आता सामान्य माणसांपर्यंत पोहोचली असल्याने प्रत्येक विधान आणि त्याचे पडसाद तळागाळापर्यंत पोहोचत आहे. थोर महापुरुषांच्या संदभार्त बोलताना देखील विचार केला जात नाही. थेट छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांच्याविषयी बोलतानाही जिभेवर नियंत्रण रहात नाही. त्यातच आता रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी एक वादग्रस्त विधान केले आहे.
‘राज्यकर्ते म्हणजे रेड्यांची औलाद’ असे वादग्रस्त विधान सदाभाऊ खोत यांनी केले आहे. राज्यकर्ते म्हणजे रेड्यांची औलाद असतात. राज्यकर्त्यांना बोलायला लावायचे असेल तर आपल्याला ज्ञानेश्वरांसारखे त्या रेड्याच्या पाठीवर हात ठेवावा लागेल, असे विधान रयत क्रांती संघटनेचे सदाभाऊ खोत यांनी पुण्यात बोलताना केले. (Criticism between Sadabhau Khot and Raju Shetty) याचवेळी बोलताना खोत यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्यावर देखील टीका केली. एफआरपीचा मुद्दा आम्हीच विधानसभेत आणि विधानपरिषदेत मांडला आहे. त्यामुळेच निर्णय झाला असून त्याचे श्रेय राजू शेट्टी घेत आहेत असा दावा खोत यांनी केला. याला राजू शेट्टी यांनी अत्यंत परखडपणे उत्तर दिले आहे. “सदाभाऊ खोत हा तर भुरटा माणूस ! भुरटा माणूस काही बोलतो म्हणून मी प्रतिक्रिया देणं योग्य नाही”, असे राजू शेट्टी यांनी म्हटले आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी हे आंदोलनात प्रचंड आक्रमक असतात पण त्यांची भाषा कायम सौम्य राहिली आहे. शासन आणि विरोधकांवर टीका करताना देखील ते नेहमीच मर्यादा पाळत आलेले आहेत. सदाभाऊ खोत यांची काही विधाने मात्र चर्चेची ठरली असून आता पुन्हा त्यांनी राज्यकर्त्यांना "रेड्यांची औलाद" असे संबोधले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !