शोध न्यूज : पैशासाठी विषारी औषध बळजबरीने पाजून पत्नीचाच खून करण्याचा धक्कादायक प्रयत्न पंढरपूर तालुक्यात घडला असून या प्रकरणी पतीच्या विरोधात पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
माहेराहून घरखर्चासाठी पैसे आणण्यासाठी आपल्याच पत्नीला सतत मारहाण करणाऱ्या पतीने अखेर बळजबरीने विषारी औषध पाजून तिला ठार मारण्याचा प्रयत्न केल्याच्या घटनेने पंढरपूर तालुक्यात खळबळ उडाली आहे. पंढरपूर तालुक्यातील पिरीची कुरोली येथील या घटनेबाबत पिडीत पत्नीने पोलिसात फिर्याद दिली असून पोलिसांनी पती सुनील लक्ष्मण लामकाने याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. भारतीय दंड संहिता कलम ३०७, ३२४, ४९८ अ, ५०४, ५०६ नुसार हा गुन्हा नोंद केला आहे. सौ. मनीषा सुनील लामकाने या पिडीत महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार आई वडिलांकडून पैसे आणण्यासाठी पती सुनील लामकाने हा सतत त्रास देत होता आणि पैशासाठी मारहाण देखील करीत होता. पंढरपूर तालुक्यातील खेडभोसे येथील सुदाम विठ्ठल पवार यांची मुलगी मनीषा हिचा विवाह सुनील लामकाने याच्याशी फेब्रुवारी २००९ मध्ये झाला होता.
विवाहानंतर दोन तीन महिने व्यवस्थित गेले परंतु त्यानंतर सुनील याला दारूचे व्यसन लागले. दारू पिण्यासाठी आणि अन्य प्रकारे चैन करण्यासाठी त्याला पैशाची कमतरता भासू लागली. दारू पिऊन तोघरी आला की पत्नी मनीषा हिला मारहाण करू लागला आणि माहेरहून पैसे घेवून येण्यासाठी मारहाण, शिवीगाळ आणि अन्य प्रकारे जाच करीत राहिला. सातत्याने असाच प्रकार होत राहिला. चार वर्षांपूर्वी मनिषाचे वडील मनीषाला माहेरी घेऊन गेले होते. मनीषाने पतीच्या विरोधात न्यायालयात देखील धाव घेतली होती परंतु नंतर सामोपचाराने वाद मिटविण्यात आला होता आणि मनीषा पुन्हा सासरी गेली होती. त्यानंतर देखील पुन्हा पती सुनील लामकाने हा मनीषाला त्रास देत राहिला आणि पैशासाठी तिचा शारीरिक, मानसिक छळ करीत राहिला.
मनीषा शेतातून काम करून ९ नोव्हेंबर रोजी घरी आल्यानंतर घरात स्वयंपाक करीत असताना पती सुनील हा पुन्हा दारू पिऊन आला आणि भांडू लागला. तुला माहेरहून पैसे आणायला सांगितले असतानाही तुझे वडील पैसे देत नाहीत काय? अशी विचारणा करीत ऊसाने मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी मनीषा घराचा दरवाजा बंद करून घरात थांबली असता पती सुनील लामकाने याने खिडकी तोडून घरात प्रवेश केला.घरात आल्यानंतर त्याने मनीषाला खाली पाडले आणि जनावरांसाठी गोचीड मारण्याचं औषधाचा डबा घेतला. आता तुला जिवंत ठेवत नाही म्हणत जीवे ठार मारण्याच्या हेतूने बळजबरीने गोचीड मारण्याचे औषध मनीषाला पाजले. मनीषा मोठ्याने ओरडू लागल्यानंतर आवाज ऐकून सासू, दीर आणि शेजारी धावत आले आणि त्यांनी सोडवले.
बळजवरीने गोचीड मारण्याचे औषध पाजल्याने मनीषाला तातडीने पंढरपूर येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचार घेवून रुग्णालयातून सोडण्यात आले असून मनीषाने पोलीसात तक्रार दिली आहे. ( Attempt to kill wife by force feeding poison ) या घटनेची चर्चा खेड भोसे आणि पिराची कुरोली परिसरात आधीपासूनच सुरु झाली होती परंतु आता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पंढरपूर तालुक्यात या घटनेने खळबळ उडवून दिली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !