शोध न्यूज : ग्रामपंचायत निवडणुकीच्या कारणावरून धाराशिवचे शिवसेना (ठाकरे) खासदार ओमराजे निंबाळकर आणि जिल्हाधिकारी यांना संपवून टाकण्याची धमकी आल्याने राज्यभर खळबळ उडाली आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीत यावेळेस वेगवेगळे रंग दिसू लागले असून कुणी भानामती, जादूटोणा करीत आहे तर कुणी पाठींबा देण्यासाठी धमकी देत असल्याचे दिसत आहे. निवडणूक खेळीमेळीने होण्याचे दिवस संपलेले असून निवडणुकीत पैसा आणि धमक्या, दमदाटी याचा वापर वाढलेला आहे. पण तुळजापूर तालुक्यात एक वेगळा आणि तितकाच धक्कादायक प्रकार समोर आला आहे. निवडणुकीत पाठींबा मागण्याची एक वेगळीच पद्धत दिसून आली असून त्यासाठी उमेदवारासह खासदार निंबाळकर आणि जिल्हाधिकारी यांनाही संपवून टाकण्याची लिखित धमकी मिळाली आहे. यामुळे राजकारणात पराचंद खळबळ उडाली असून पोलिसांनी देखील हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे.
माझ्या घरावर चिट्ठी लावून ठार मारण्याची धमकी दिली जात आहे, या सरकारने महाराष्टाचा बिहार करून टाकला असून कुठे आहेत राज्याचे मुख्यमंत्री? कुठे आहेत पोलीस? असा सवाल ज्ञानेश्वर साळवे यांनी विचारला आहे. हा प्रकार निदर्शनास आल्यावर पोलिसांना फोन केला पण दहा किमी अंतर येण्यासाठी पोलिसांना दोन तास लागले. आता २४ तासात कारवाई नाही झाली तर राष्टवादी काँग्रेस आंदोलन करील असा इशाराही त्यांनी दिला आहे.
कशा होणार निवडणुका ?
मतदारांवर दबाव आणण्याचा हा प्रयत्न असून पोलिसांनी संबंधिताना शोधून काढून त्याला शिक्षा झालीच पाहिजे. उमेदवार आणि मतदार कुठल्याही दबावाशिवाय मतदानात सहभागी होतील याची दक्षता प्रशासनाने घेण्याची गरज आहे. संस्काराची भाषा करीत होते त्यांच्याच कार्यकर्त्यांचे संस्कार यातून दिसून येत आहेत असे खासदार निंबाळकर यांनी म्हटले आहे त्यामुळे त्यांचा रोख नेमका कुणावर आहे ? याची चर्चा सुरु झाली आहे. उमेदवार, खासदार आणि जिल्हाधिकारी यांनाच धमकावले जात असेल तर निवडणुका निपक्षपाती कशा होतील असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !