शोध न्यूज : ग्रामपंचायत निवडणुकीत विरोधकांवर भानामती, जादूटोणा करण्याचा धक्कादायक आणि अश्लाघ्य प्रकार उघडकीस आला असून पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासण्याच्या या प्रकाराचा निषेध होऊ लागला आहे.
गेल्या काही वर्षांपासून निवडणुकीतील विविध गैरप्रकार चव्हाट्यावर येतच आहेत. निवडणुकीत विजय संपादन करण्यासाठी अनेकजण कुठल्याही ठरला जातात. नोटांचे वाटप, ओल्या पार्ट्या असे विविध अनुचित प्रकार वापरत मते मिळविण्याचा प्रयत्न सर्रास केला जातो. ग्रामपंचायतीच्या निवडणुकात देखील अलीकडे असे प्रकार वाढताना दिसत असून ग्रामीण भागातील काही प्रकार तर प्रचंड धक्कादायक ठरत आहेत. आता तर निवडणुकीत विजय मिळविण्यासाठी अंधश्रद्धेचा अवलंब केला जात असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
जादूटोणा, भानामती अशा प्रकाराविरुद्ध महाराष्ट्रात कायदा करण्यात आला आहे पण ग्रामपंचायत निवडणुकीत या कायद्यालाही अडगळीला टाकले असल्याचे दिसून आले आहे. गावोगावी ग्रामपंचायत निवडणुकीची धामधूम सुरु असून निवडणुकीत विजय संपादन करण्यासाठी शक्य ते सगळेच करणे सुरु झाले आहे. सांगली जिल्ह्यात तर विरोधकांवर भानामती, जादूटोणा यासारखे प्रकार केले जात असल्याचे समोर आले आहे. (Witchcraft, black magic on opponent in Gram Panchayat elections) एरवीही ग्रामीण भागात असे प्रकार होतच असतात पण निवडणुकीच्या निमित्ताने यात वाढ झाली आहे. पुरोगामी महाराष्ट्रात नरबळीसारखे अमानुष प्रकार देखील अवलंबण्यात येतात ही लाजिरवाणी बाब आहे.
खानापूर, वाळवा तालुक्यात उमेदवार निवडून यावा म्हणून भानामती, जादूटोणा अशा प्रकाराचा आधार घेतला जात आहे. याची सांगली जिल्ह्यात जोरदार चर्चा असून संताप देखील व्यक्त केला जात आहे. वाळवा तालुक्यातील कनेगाव ग्रामपंचायत निवडणूक सद्या सुरु आहे. येथे निवडणुकीत विजय मिळविण्यासाठी अंधश्रद्धेचा आधार घेतला जात आहे. अज्ञात व्यक्तीने केळी, कापडाचे पीस, बाहुल्या, लिंबू, हळद कुंकू अशा वस्तू दुरडीत घालून गावाच्या चौकाचौकात मध्यरात्रीच्या वेळी ठेवले असल्याचे दिसून आले. विज्ञान युगात आणि पुरागामी महाराष्ट्रात आजही असा प्रकार पाहायला मिळाला असून यामुळे संतापजनक प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. हायस्कूल चौक, मारुती चौक, नवीन गावठाण वसाहत, भरतवाडी रस्ता अशा प्रत्येक ठिकाणी या वस्तू आढळून आल्या आणि लोकांत खळबळ उडाली. खानापूर तालुक्यातील जाधवनगर येथे देखील भानामातीचा प्रकार समोर आला. निवडणूक प्रचाराच्या बॅनर समोर नारळ, हळदी कुंकू, लिंबू ठेवल्याचे प्रकार देखील दिसून आले आहेत.
आजच्या काळात असे प्रकार होऊ लागल्याने चर्चा आणि संताप व्यक्त होत असून अंधश्रद्धा किती रुजलेली आहे याचीच साक्ष हा प्रकार देवू लागला आहे. सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका निवडणुकीवेळीही काळी जादू, करणी, भानामती यासारखे प्रकार समोर आले होते. स्त्याच्या प्रत्येक वळणावर अंडी, दोन लिंबू, काही ठिकाणी एक लिंबू, दोन अंडी असे ठेवण्यात आले आहेत. या सर्व प्रकारामुळे मतदारांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले होते. मिरज येथेही काही चौकात काळी बाहुली लटकवण्यात आली होती. निवडणुकीतील प्रतिस्पर्धी उमेदवार पडावा आणि नागरिक मतदानास बाहेर पडू नये यासाठी काळी जादू केल्याची चर्चा यावेळी होत होती. सद्या सुरु असलेल्या या प्रकारचा निषेध केला जात आहे.
हा सगळा खोटेपणा - अंनिस
ग्रामपंचायत निवडणुकीत विरोधी उमेदाराच्या विरोधात असे अंधश्रद्धेचे प्रकार सर्रास सुरु असतात. निवडणूक आयोग आणि अंधश्रद्धा निर्मुलन समिती यांच्याकडे अशा प्रकारच्या तक्रारी येतात. जादूटोणा, भानामती असले प्रकार खोटेपणाचे असून मतदारांनी निर्भयपणे मतदान करावे असे आवाहन निवडणूक आयोग आणि अंधश्रद्धा निर्मुलन समितीने केले आहे. मतदाराला अंगारा, भंडारा उचलायला लावून मतदान करण्याबाबत शपथ घ्यायला लावली जाते, विरोधी उमेदवाराच्या दारात लिंबू मिरची, काळी बाहुली, नारळ उतारा टाकण्याचे तसेच मांत्रिक तांत्रिक बोलावून मतदारावर दबाव टाकण्याचे प्रकारही होते असतात. हे सगळे प्रकार निवडणूक आचारसंहितेचा भंग करणारा आहे असेही निवडणूक आयोगाने सांगितले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !