BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१७ डिसें, २०२२

सोलापूर जिल्ह्यात धावत्या काकीनाडा रेल्वे एक्सप्रेसवर दरोडा !



शोध न्यूज : सोलापूर - मोहोळ दरम्यान काकीनाडा रेल्वे एक्स्प्रेसवर दरोडा टाकून प्रवाशांना लुटण्याची घटना घडली असून यामुळे रेल्वे प्रवास देखील पुन्हा असुरक्षित ठरू लागला असल्याचे दिसत आहे. 


सोलापूर जिल्ह्यातील रेल्वेमार्गावर रेल्वेवर दरोडा टाकला जाण्याची घटना काही नवी नाही, जिंती, पारेवाडी रेल्वेस्थानकावर पुन्हा पुन्हा रेल्वे प्रवाशांना लुटले जाते त्यामुळे रेल्वे पोलीस सतर्क असतात. धावती रेल्वे एक्सप्रेस गाडीच्या सिग्नलमध्ये बिघाड करून रेल्वे थांबवली जाते आणि रेल्वेतील प्रवाशांना लुटले जाते. गुरुवारी रात्री  सोलापूर - मोहोळ दरम्यान दरोड्याची ही घटना घडली आहे. भावनगर- काकीनाडा रेल्वे एक्सप्रेसचा वेग कमी होताच दरोडेखोर रेल्वेत घुसले आणि त्यांनी प्रवाशांना लुटले आहे. महिला प्रवाशांचे दागिने आणि रोख रक्कम अशी लुट या दरोडेखोरांनी केली असल्याची माहिती रेल्वे पोलिसांकडून देण्यात आली आहे. भावनगर - काकिनाडा रेल्वे एकस्प्रेसच्या (क्रमांक-१७२२२) एस-१, एस-६, एस-७ या कोचमध्ये दरोडा पडल्याची प्राथमिक माहिती आहे. 


मोहोळ तालुक्यातील मलिकपेठ रेल्वे स्टेशनच्या जवळ दरोड्याची ही घटना घडली. रेल्वेचा वेग कमी होताच दरोडेखोर रेल्वेत घुसले. दरोडेखोरांनी ट्रेक डाऊन केला होता त्यामुळे रेल्वेचा वेग कमी झाला आणि दरोडेखोर रेल्वेत शिरले. प्रवाशांना भीती दाखवत त्यांनी रेल्वेत दहशत निर्माण केली आणि झोपेतील प्रवाशांच्या अंगावरील दागिने ओरबाडून घेण्याचा प्रयत्न केला. यात साठ वर्षे वयाच्या गौसिया बेगम यांच्या गळ्यातील दोन तोळे सोन्याचे दागिने आणि ७ हजार रुपयांची रोकड, ४२ वर्षीय श्रीमती राधा  यांच्या गळ्यातील अडीच तोळे सोन्याचे दागिने, श्रीमती गीता यांच्या गळ्यातील चार तोळे सोन्याचे दागिने आणि ७ हजार ५०० रुपयांची रोख रक्कम लुटली आहे. घाबरलेल्या प्रवाशांनी या घटनेबाबत तातडीने रेल्वेतील तिकीट तपासनीस यांना याची माहिती दिली. 


सदर रेल्वे सोलापूर येथे पोहोचली तेंव्हा आरपीएफ आणि लोहमार्ग पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली. काकीनाडा रेल्वे एक्सप्रेस दौंड येथून निघाल्यानंतर सोलापूरपर्यंत या रेल्वेला मध्ये कुठेच थांबा नाही.(Robbery on running Kakinada Railway Express in Solapur District)  दौंड येथून निघालेली ही एक्सप्रेस थेट सोलापूर स्थानकावरच थांबत असते. दरोड्याच्या या घटनेने रेल्वे प्रवाशात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. 


अधिक बातम्यांसाठी येथे क्लिक करा !  


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !