BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२४ डिसें, २०२२

ऊस तोडायला आला आणि थेट सरपंच झाला !

 


शोध न्यूज : ऊस तोड करण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील मजुराने गाव सोडले पण ऊस तोडायला म्हणून गेलेला मजूर त्या गावाचा थेट सरपंच बनला असल्याची एक दुर्मिळ घटना ग्रामपंचायत निवडणुकीत समोर आली आहे.


राज्यात गेल्या काही दिवसांपासून ग्रामपंचायत निवडणूक वेगवेगळ्या कारणांनी चर्चेला येत आहे. निवडणुकीत अनेक गमतीजमती आणि धक्कादायक प्रकार देखील समोर आले आहेत. सासू आणि सून यांच्यातील लढत, निवडून येण्यासाठी अंधश्रद्धेचा वापर, निवडणुकीत वाटलेले पैसे निवडणुकीनंतर परत मागण्यासाठी दमदाटी असे एकापेक्षा एक प्रकार यावेळच्या निवडणुकीत पाहायला मिळाले परंतु लोकशाहीचा एक वेगळा नमुना आणि वेगळी शक्ती देखील या निवडणुकीने दाखवून दिली आहे. निवडणुकीत अनेकदा धनदांडगे पडतात आणि सामान्य गरीब उमेदवार देखील निवडून येत असल्याच्या अनेक घटना समोर आलेल्या आहेत परंतु ऊस तोडणी मजूर देखील या लोकशाहीने सरपंच बनवला आहे. ऊस तोड मजूर म्हणून पोट भरण्यासाठी गावात आलेला सामान्य मजूर चक्क गावचा सरपंच बनला आहे. 


सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील बाभूळगाव येथील रमेश रावण कोळी हे आर्थिक परिस्थितीने गांजलेले असताना त्यांनी तीस वर्षांपूवी आपले गाव सोडले आणि ऊसतोड मजूर म्हणून त्यांनी कराड गाठले. कराड तालुक्यातील पश्चिम सुपने गावात त्यांनी आश्रय घेतला आणि तेथेच मजुरी करून आपले पोट भरू लागले. सद्याही ते गुऱ्हाळघरावर मजुरी करीत आहेत. आपल्या कुटुंबासह ते आता या गावातच स्थायिक झाले आहेत. सुपने, पश्चिम सुपने, साकुर्डी, डोंगरीमाळ परिसरात गुन्हाळघरांची संख्या मोठी असल्याने कोळी यांच्यासह कुटुंबालाही रोजगार मिळाला. दत्तू पैलवान यांच्या गुऱ्हाळघरावर ते मजूर म्हणून राहिले.  गुऱ्हाळ मालकांचा विश्वास त्यांनी संपादन केला आणि त्यामुळे मालकानेही त्यांच्या राहण्याची व्यवस्था केली. मजुरीसाठी बाभूळगाव येथून आलेल्या आणखी चार कुटुंबाचीही अशीच व्यवस्था झाली आणि ही कुटुंबेही येथेच स्थायिक झाली. 

  
रमेश कोळी हे पत्नी, मुलगा, सून आणि नातवंडांसमवेत राहतात. येथील ग्रामपंचायत निवडणूक जाहीर झाली आणि राष्ट्रवादीच्या गटाचे पॅनेलप्रमुख साहेबराव गायकवाड यांनी गुन्हाळ घरावरील मजूर रमेश कोळी यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला. सत्ताधारी गटाने मात्र माळी समाजातील राजेश माळी यांना उमेदवारी दिली. मजूर रमेश कोळी यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. निवडणुकीचे वातावरण तापले आणि कोण सरपंच होणार याची उत्सुकता लागून राहिली. सत्ताधारी गटाचे राजेश माळी हेच सरपंचपदाच्या निवडणुकीत विजयी होतील असा सर्वांचाच अंदाज होता. माळी हे तीन वेळा ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडणूक आलेले होते तर रमेश कोळी हे बाहेरगावावरून स्थायिक झालेले सामान्य मजूर होते. निवडणुकीचा निकाल लागला आणि सरपंचपदी ऊस तोडणी मजूर असलेले रमेश कोळी हे निवडून आले. 


ग्रामपंचायत निवडणुकीत ७ सदस्यांपैकी ४ सदस्य सत्ताधारी गटाचे निवडून आले आणि विरोधकांनी केवळ दोन जागा जिंकल्या. एका जागेवर समान १०६ मते पडली त्यामुळे चिट्ठी टाकून निकाल घेतला गेला. ही जागा सत्ताधारी गटाला मिळाली त्यामुळे सत्ताधारी गटाला एकूण पाच जागा मिळाल्या. गावातील कल हा सत्ताधारी गटाच्या बाजूला असतानाही सरपंचपदाच्या निवडणुकीत विरोधी गटाचे ऊस तोड मजूर असलेले रमेश कोळी हे निवडून आले. (Sugarcane cutting laborer wins as Sarpanch) कोळी यांना ११९ तर माळी यांना ११४ मते मिळाली. प्रचंड चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत ऊस तोडणी मजूर सरपंच बनले आणि लोकशाहीची एक वेगळी ताकद पुन्हा एकदा समोर आली. ऊस तोड मजूर म्हणून गावात गेले आणि चक्क त्याच गावाचे लोकनियुक्त सरपंच होण्याचा मान त्यांना मिळाला. 



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !