शोध न्यूज : राज्य परिवहन महामंडळाच्या धावत्या बसला पुन्हा आग लागली परंतु चालकाच्या प्रसंगावधानामुळे ५४ प्रवाशांचा जीव वाचला. बसला पुन्हा पुन्हा आग लागण्याच्या घटनामुळे मात्र हा चिंतेचा विषय बनू लागला आहे.
गेल्या काही वर्षात धावती वाहने पेटण्याचे प्रमाण वाढले आहे. खाजगी प्रवासी वाहने धावत असताना आगीच्या विळख्यात सापडत आहेत आणि ही आग एवढी भडकते की संपूर्ण वाहन जळून खाक होत आहे. सुदैवाने अशा बहुतेक घटनातून जीवितहानी मात्र टाळली जाते. राज्य परिवहन महामंडळाच्या बसचा प्रवास हा सुरक्षित मानला जातो परंतु अलीकडे महामंडळाच्या बस देखील आगीच्या संकटात सापडू लागल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच कणकवली येथे धावत्या एस टी च्या इंजिनमधून धूर येवू लागला आणि या घटनेने घाबरून प्रवाशांनी बसमधून खिडकीतून आणि संकटसमयी बाहेर पडण्याच्या मार्गातून उड्या मारल्या होत्या. प्रवाशी सैरावैरा झाले होते परंतु सुदैवाने काही अनुचित घडले नाही. नाशिक जिल्ह्यातील येवला येथे मात्र ५४ प्रवाशांना घेवून जाणारी बस पेटली परंतु चालकाने वेळीच प्रसंगावधान राखले त्यामुळे प्रवाशांना कसलीही इजा झाली नाही.
राज्य परिवहन महामंडळाच्या सिल्लोड आगाराची बस ५४ प्रवासी घेवून निघाली होती. नाशिककडून औरंगाबादच्या दिशेने ही बस निघाली असताना येवल्यात जनता महाविद्यालयाच्या समोर आल्यानंतर बसच्या रेडिएटरमधून अचानक धूर निघत असल्याचे दिसून आले. धुराचे प्रमाण वाढतच चालल्याने चालकाला काही अंदाज आला आणि त्यांनी तातडीने बस रस्त्याच्या बाजूला घेत उभी केली आणि सर्वप्रथम त्यांनी बसमधील ५४ प्रवाशांना सुखरूप खाली उतरवले. (Maharashtra State Transport Corporation bus caught fire) त्यानंतर बसला आग लागली परंतु बसचालक रघुनाथ बावसकर यांनी प्रसंगावधान राखत पाणी टाकून आग आटोक्यात आणली. चालकाच्या समयसूचकतेबद्धल प्रवाशांनी त्यांना धन्यवाद दिले परंतु अशा प्रकारच्या घटना सतत घडत असल्यामुळे जुन्या आणि त्रासदायक ठरणाऱ्या बस लांब पल्ल्याच्या अंतरासाठी दिल्या जाऊ नयेत अशी मागणी मात्र प्रवासी करीत होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !