BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

८ डिसें, २०२२

मतदार यादीवर आक्षेप घेतल्यामुळे प्राणघातक हल्ला !

 


शोध न्यूज : मतदार यादीतील दुबार नावावर हरकत घेतल्याच्या रागातून पंढरपूर तालुक्यात प्राणघातक हल्ला करण्यात आला असून तंटामुक्ती समिती अध्यक्ष आणि माजी पंचायत समिती सदस्य यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पंढरपूर तालुक्यातील ईश्वर वठार येथील ४२ वर्षे वयाचे ज्ञानेश्वर तुकाराम गुंडगे यांच्यावर हल्ला झाल्याप्रकरणी त्यांच्या पत्नी रेखा गुंडगे यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. या फिर्यादीनुसार मतदार यादीतील दुबार मतदारांच्या नावाबाबत ज्ञानेश्वर गुंडगे यांनी हरकत घेतल्यामुळे गावातील तंटामुक्ती समितीचा अध्यक्ष संजय लक्ष्मण सरवडे आणि पंचायत समितीचा माजी सदस्य औदुंबर मेटकरी यांनी ज्ञानेश्वर गुंडगे यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याचे म्हटले आहे. मतदार यादीवर हरकत घेतल्यामुळे सदर दोघे हे चिडून होते आणि त्याबाबत आपल्याला तशी माहिती पतीने दिलेली होती असे फिर्यादी रेखा गुंडगे यांनी म्हटले आहे. पंढरपूर तालुक्यातील ईश्वर वठार हे गाव राजकीय दृष्ट्या संवेदनशील मानले जाते आणि मतदार यादीवरूनच हा गंभीर प्रकार येथे घडला असल्याचे समोर आले आहे.

 

गुंडगे कुटुंब झोपलेले असताना बाहेर कुत्रे भुंकण्याचा आवाज आला त्यामुळे कुणीतरी आले असल्याची जाणीव त्यांना झाली.  बाहेर कोण आले आहे याचा अंदाज घेण्यासाठी ज्ञानेश्वर गुंडगे हे घराबाहेर गेले असता बाहेरून शिवीगाळ आणि आरडाओरडा होत असल्याचा आवाज आला त्यामुळे आपणही बाहेर गेलो. यावेळी सदर दोघे आपल्या पतीला मारहाण करीत असल्याचे दिसून आले. पतीला सोडविण्यासाठी आपण मध्ये पडलो असता आपणासही मेटकरी याने ढकलून दिले आवाज ऐकुन मुलगी ज्योती ही घराबाहेर आली त्यावेळी तिलाही  मारहाण करतील या भितीने मी मध्ये गेले त्यावेळी औदुंबर याने मुलगी ज्योती हीचे अंगावर ढकलून दिले त्यामुळे ज्योतीही खाली पडली. औदूंबर मेटकरी आणि  संजय सरवदे हे माझे पती ज्ञानेश्वर यांना खाली पाडून मारहाण करीत होते.


फिर्यादी रेखा गुंडगे आणि  मुलगी ज्योती हीचा ओरडण्याचा आवाज ऐकून बाजुच्या शेतात पिकाला पाणी देत असलेले माझे दिर रविंद्र गुंडगे हे तेथे आले. त्यावेळी संजय सरवदे याने बाजुस पडलेला दगड उचलला आणि  "तुला जिवंत सोडत नाही" असे असे म्हणत ज्ञानेश्वर गुंडगे यांच्या पोटात मारला. औदूंबर मेटकरी याने दगड उचलून "याला सोडु नको" असे म्हणत  हातातील दगड माझे पतीचे डोक्यात मारला.  ज्ञानेश्वर गुंडगे यांनी  त्यांचा उजवा हात मध्ये घातल्याने औदुंबर याने मारलेला दगड त्यांच्या दंडावर लागला. यावेळी गुंडगे कुटुंबाने आरडाओरडा केला तेंव्हा हे दोघे तेथून निघून गेले. जाताना 'मतदार यादीतील नावाबाबत हरकत घेतो काय? तुला सोडत नाही" असे म्हणून ते गेले. त्यानंतर ज्ञानेश्वर यांची रक्ताची उलटी झाली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. त्यानंतर ज्ञानेश्वर गुंडगे यांना पंढरपूर येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. 


या मारहाणीत ज्ञानेश्वर गुंडगे यांची मुलगी ज्योती हिच्या पोटात दुखू लागल्याने त्यांनी  पंढरपूर येथील शासकीय रुग्णालयात उपचार घेतले आहेत. सदर प्रकरणी पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आली असून पोलिसांनी तंटामुक्ती अध्यक्ष  संजय लक्ष्मण सरवडे आणि पंचायत समितीचा माजी सदस्य औदुंबर मेटकरी यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. (Objection to voter list, attempted murder in Pandharpur taluka) भारतीय दंड संहिता कलम ३०७,३२३, ३४,५०४ नुसार हा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 


 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !