शोध न्यूज : सालगड्याच्या विश्वासावर घर टाकून शेतमालक कीर्तनासाठी गेले पण सालगड्यानेच मालकाच्या घरावर डल्ला मारल्याचा प्रकार घडला असून आता विश्वास तरी कुणावर ठेवायचा हा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित होऊ लागला आहे.
चोराच्या हातात किल्ल्या दिल्यावर चोराला चोरी करण्याचे धाडस होत नाही असे म्हणतात. शेतकरी तर सालगड्यावर प्रचंड विश्वास ठेवतो आणि त्याला आपल्याच घरातील एक सदस्य मानतो. हा नोकर असला तरी त्याच्यावर संपूर्ण कुटुंब मोठा विश्वास टाकत असते आणि घरातील प्रत्येक बाब त्याला माहित असते. शेतासह घरातील कामे देखील हा सालगडी मोठ्या आपुलकीने आणि विश्वासाने करीत असतो त्यामुळे त्याला घरात मुक्त वावर असतोच पण त्याच्यावर विश्वास टाकून मालक निवांत असतो. अशाच एका सालगड्यावर विश्वास असलेले शेतकरी मालक कीर्तनासाठी गेले आणि भरदुपारी याच सालगड्याने आपल्याच मालकाच्या घरावर डल्ला मारला असल्याचे करमाळा तालुक्यात उघडकीस आले आहे.(The servant absconded after stealing from the farmer's house) विश्वासाने ज्याच्यावर घर सांभाळण्याची जबाबदारी दिली त्यानेच घरात घुसून चोरी केल्याचा हा प्रकार शेतकरी धक्कादायक मानू लागले आहेत.
करमाळा तालुक्यातील खडकी येथील सुरेश सीताराम शिंदे यांनी पोलिसात याबाबत फिर्याद दिली असून त्यानुसार त्यांचा सालगडी रमेश डोंगरे यानेच त्यांच्या घरात चोरी केली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रज तालुक्यातील वाई (मेंढी) येथील रमेश धोंडीबा डोंगरे हा त्यांच्याकडे सालगडी म्हणून कामासाठी होता. १ लाख ५ हजार रुपयांच्या मोबदल्यात सालाने डोंगरे याला त्यांनी कामावर ठेवले होते. सुरेश शिंदे हे जातेगाव येथील एका वस्तीवर असलेल्या कीर्तनासाठी गेले होते तर त्यांच्या पत्नी लग्नाचा बस्ता बांधण्यासाठी पुण्याला गेलेल्या होत्या. घरी कुणीच नव्हते परंतु जाताना शिंदे यांनी सालगडी डोंगरे याला घराकडे लक्ष देण्यास सांगितले होते. त्याच्यावर घर सोपवून घराला कुलूप लावून शिंदे हे सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास कीर्तनासाठी निघून गेले.
कीर्तन आटोपून दुपारी ते परत घरी आले आणि त्यांना धक्काच बसला. कुलूप लावून ते गेले होते पण परत आले तेंव्हा त्यांचे घर उघडेच असल्याचे त्यांना दिसले. त्यांनी घाईघाईने घरात पाहणी केली असता कपाटातील दागिने गायब असल्याचे त्यांच्या निदर्शनाला आले. त्यांनी सालगडी रमेश डोंगरे याचा शोध घेतला पण तो कुठेच आढळून येत नव्हता. कपाटातील सोन्याचे नेकलेस, कर्णफुले असे एक लाख पन्नास हजार रुपये किमतीचे दागिनेही गायब झालेले होते. सालगडी डोंगरे हा कुठेच आढळून येत नसल्याने तो चोरी करून पळून गेला असल्याचे शिंदे यांच्या लक्षात आले. त्यानंतर शिंदे यांनी पोलिसात धाव घेत दीड लाखांचे दागिने घेवून सालगडी पळून गेल्याची फिर्याद त्यांनी दिली आहे. ज्याच्यावर विश्वास ठेवला आणि ज्याच्यावर घर सोपवले त्यानेच डल्ला मारल्याने परिसरात याची चर्चा सुरु असून विश्वास ठेवायचा तरी कुणावर ? हा प्रश्न उपस्थित झाला आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !