जिल्हाधिकारी यांच्या समोरच खासदार आणि आमदार यांच्यात जोरदार हमरीतुमरी झाली आणि ठाकरे गटाच्या खासदाराने भाजप आमदाराची थेट औकात काढली. या घटनेचा व्हिडीओ समाजमाध्यमावरून वेगाने व्हायरल होत आहे.
लोकप्रतिनिधी म्हणून जनतेने निवडून दिले असले तरी ही मंडळी नेमकी कशी वागतात हे अनेकदा पाहायला मिळत असते. परस्परांवर टीका करताना तर अलीकडे राजकीय मंडळीनी पातळी सोडून दिलेली असल्याचे देखील त्यांच्या अनेक विधानावरून दिसून येते. सद्या तर 'शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे' आणि 'बाळासाहेबांची शिवसेना' यांच्यातील शब्दयुद्ध रोजच पहावे लागत आहे. त्यात मधूनच भाजपची फोडणी या वादातील तिखटपणा वाढवत असतेच. धाराशिव येथे मात्र जिल्हाधिकारी यांच्या एका बैठकीत उद्धव ठाकरे शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि भाजपचे आमदार जगजित सिंग राणा पाटील यांच्यात जोरदार शब्दयुद्ध झाले आणि अखेर जिल्हाधिकारी यांनाच मध्ये पडावे लागले. एक खासदार आणि एक आमदार यांच्यात झालेल्या या हमरातुमरीचा व्हिडीओ सगळीकडे व्हायरल होऊ लागला असून या वादाची चर्चा देखील सुरु झाली आहे.
पीक विम्याच्या खरीप हंगामात झालेल्या नुकसान या संदर्भात उस्मानाबादजिल्हाधिकारी कार्यालयात बैठक बोलावण्यात आली होती. भाजपचे आमदार जगजित सिंग राणा पाटील यांनी काही शेतकऱ्यांना निरोप दिला. यामुळे काही शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयात हजर झाले.या बैठकीची वेळ सकाळी ११ ची ठरली होती परंतु दुपारचे १ वाजले तरी या बैठकीला सुरुवात झाली नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी गोंधळ घालायला सुरुवात केली. याच दरम्यान या बैठकीत खासदार आणि आमदार हमरीतुमरीवर आल्याचं पहायला मिळालं. जिल्हाधिकारी कार्यालयात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर आणि भारतीय जनता पक्षाचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्यात चांगलीच खडाजंगी झाली.
या बैठकीत भाजप आमदार जगजीतसिंग राणा यांनी खा. निंबाळकर यांचा 'बाळा' असा उल्लेख केला आणि त्यानंतर ओमराजे खवळले. जिल्हाधिकारी यांच्या समोरच 'तू जास्त बोलू नकोस, तू तूझ्या औकातीत राहा, तुझे संस्कार तुझी औकात मला ठाऊक आहे, अशा शब्दात ओमराजे निंबाळकर यांनी आमदार राणा पाटील यांना सुनावलं. बैठक सुरु असताना, राणा पाटील यांनी पीकविमा देताना कंपन्यांकडून भेदभाव केला जातो. प्रशानाकडून पंचनाम्याची पावती घेण्याचा सल्ला शेतकऱ्यांना दिला. पण त्याचवेळी, प्रशासनाकडे पंचनाम्याच्या पावत्याच नाहीत, तर शेतकऱ्यांची फसवणूक का करताय? असा संतप्त सवाल खासदार निंबाळकर यांनी केला. जिल्हाधिकारी यांच्या साक्षीने खासदार आणि आमदार यांच्यात जोरादार हमरातुमरी सुरु झाली आणि बैठकीचे वातावरण देखील तणावपूर्ण झाले.
पीकविम्यासंदर्भातील बैठकीत खासदार आणि आमदार यांच्यात जोरदार संघर्ष सुरु झाला आणि जिल्हाधिकारी हे दोघानाही शांत करण्याचा प्रयत्न करीत राहिले. अखेर जिल्हाधिकारी यांनीच दोघांना शांत केले आणि या वादावर तात्पुरता का होईना पडदा पडला. (MLAs and MPs clashed in front of the Collector) बैठकीत झालेल्या या घटनेचा व्हिडीओ मात्र सगळीकडे व्हायरल होत असून ही हमरीतुमरी लोक मोठ्या संख्येने सोशल मीडियावरून पाहू लागले आहेत.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !