BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१० डिसें, २०२२

एस टी प्रवाशांना लुटणाऱ्या महिला लाखोंच्या दागिन्यासह गजाआड !



शोध न्यूज : एस. टी. ने प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या कौशल्याने चोऱ्या करणाऱ्या महिला अखेर पोलिसांच्या गळाला लागल्या असून त्यांच्याकडून साडे नऊ लाखांचे सोने हस्तगत करण्यात आले आहे. 


राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधून प्रवास करताना सोन्याचे दागिने, रोख रक्कम अशा प्रकारच्या अनेक चोऱ्या होत आहेत. या चोऱ्या अत्यंत कुशलतेने केल्या जात असून आपली चोरी झाल्याचे देखील प्रवाशांच्या लक्षात लवकर येवू दिले जात नाही आणि जेंव्हा हे लक्षात येते तेंव्हा खूप उशीर झालेला असतो. नुकतेच पंढरपूर तालुक्यातील करकंब येथील वृद्ध कुमार दगडू टकले आणि दत्तात्रय बोधे हे टेंभुर्णी - पंढरपूर एस टी बसने सोलापूर येथे निघाले होते. सोलापूर येथील एका व्यक्तीला उसने देण्यासाठी म्हणून त्यांनी आपल्या जवळ एका बॅगेत ३ लाख ३५ हजाराची रक्कम घेतली होती. प्रवासात त्यांनी ही बॅग आपल्या पायांच्या मध्ये पकडली होती तरीदेखील बॅगेची चैन उघडून त्यातील संपूर्ण रक्कम चोरट्यांनी लंपास केली होती. पंढरपूर येथे आल्यानंतर त्यांच्या लक्षात हा प्रकार आला आणि नंतर त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. 


ही चोरी कुणी आणि कधी केली हे त्यांना समजले नसले तरी भोसे पाटी येथे दोन महिला बसमधून उतरून गेल्याचे त्यांना आठवले आणि त्यांनीच ही चोरी केली असल्याचा संशय त्यांना आला होता. अशा प्रकारे एस टी मध्ये सतत चोरी होत असल्याचे निदर्शनास येत राहिले परंतु विटा पोलिसांनी मात्र या चोरट्या महिलांना पकडले असून यामुळे आंतरराज्य महिलांच्या टोळीचा पर्दाफाश झाला आहे.  कराड तालुक्यातील तासवडे येथे राहणाऱ्या  आर. ईश्वरी (वय 28) आणि एम.दिपा (वय 22) या महिला मुळच्या कर्नाटक राज्यातील टूमकुर येथील आहेत. त्यांच्याकडून दोन गुन्हे देखील उघडकीस आले असून त्यातील ९ लाख ५१ हजार ३५० रुपये किमतीचे १७९.५  ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने पोलिसांनी हस्तगत केले आहेत. 


मागील महिन्यात विटा पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या दोन गुन्ह्याचा तपास पोलीस करीत होते. सोलापूर जिल्ह्यातील पिलीव येथील बायडा अनिल पाटणकर या वृद्ध महिला गुहागर - तुळजापूर या एस टी ने प्रवास करीत असताना त्यांची दागिन्याची पिशवी लंपास करण्यात आली होती. दुसऱ्या एका घटनेत गुहागर- तुळजापूर याच बसमधून प्रवास करीत असलेल्या किणी वाठार येथील नीता निकम यांच्याही बॅगेतील सोन्याच्या दागिन्यांची चोरी करण्यात आली होती. या दोन घटना वेगवेगळ्या घडल्या होत्या आणि याचा तपास पोलीस करीत होते. दरम्यान विटा बस स्थानकावर काही महिला संशयास्पदरित्या वावरत असल्याचे विटा पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखेच्या पथकाच्या निदर्शनास आले होते आणि त्यांनी यातील या महिलांना ताब्यात घेतले होते. 


सदर महिलांकडे तपास केला असता त्यांनी बसमध्ये दागिने चोरल्याची कबुली तर दिलीच पण हे दागिने तासवडे टोलानाका येथील त्या राहत असलेल्या भाड्याच्या घरात ठेवले असल्याची माहितीही त्यांनी दिली. त्यानुसार पोलिसांनी त्यांच्याकडून सोन्याचे गंठण, सोन्याचा हार, सोन्याच्या बांगड्या, झुमके, टोप्स, अंगठ्या इत्यादी दागिने हस्तगत केले आहेत. (
Women who robbed ST passengers arrested, jewelery seized) त्यांचाकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता असून या महिलांच्या सोबत आणखी काही महिला असण्याची आणि त्यांची एक टोळी असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली असून त्या दिशेने तपास करण्यात येत आहे. 


  


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !