शोध न्यूज : सोलापूर जिल्ह्यात काल झालेल्या अपघाताच्या दोन घटनात तीन जण ठार झाले असून पाच जण जखमी झाले आहेत. सोलापूर - पुणे महामार्गावर एकाच दिवशी हे दोन अपघात झाले आहेत.
सोलापूर - पुणे महामार्गावर मोहोळजवळ वडवळ येथे दोन कारची समोरासमोर जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला. यात दोघांचा जागीच मृत्यू झाला असून चौघे जखमी झाले आहेत. पुण्याकडून सोलापूरच्या दिशेने निघालेल्या कारचा पुढचा टायर फुटल्याने अपघाताची ही घटना घडली आहे. धावत्या कारचा टायर फुटल्याने ही कार रस्त्याच्या दुभाजकाला धडकली आणि तेथून दुसऱ्या एका कारवर आदळली.या अपघातात लोहारा तालुक्यातील माकणी येथील ४२ वर्षे वयाचे शशिकांत सदाशिव आधटराव आणि अक्कलकोट येथील निखील शशिकांत बिराजदार (४०)या दोघांचा मृत्यू झाला. अक्कलकोट येथील आठ वर्षे वयाची ओवी निखील बिराजदार, उस्मानाबाद येथील अनुराधा रविकांत बिराजदार (३८) सुनिता शशिकांत अधटराव (४०) बालाजी काशिनाथ साठे (५२) हे चार जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पुण्याकडून सोलापूरकडे निघालेली कार (एम एच १२ एस क्यू ८६७) ही वडवळ शिवारात आली असताना या कारचा टायर फुटला त्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटले. ही कार रस्त्याच्या दुभाजकावर आदळून पलीकडील बाजूला गेली आणि समोरून येत असलेल्या, सोलापूरकडून टेंभुर्णीकडे जात असलेल्या कारवर (एम एच २५ आर ८६५) आदळली. (Three killed in two accidents on Solapur-Pune highway) त्यामुळे दोन्ही कारमधील प्रवासी मृत्युमुखी पडले आणि जखमी झाले.
ट्रॅक्टर चालकाचा मृत्यू
सोलापूर - पुणे महामार्गावर झालेल्या अन्य एका अपघातात ट्रॅक्टर चालकाचा मृत्यू झाला आहे. कंटेनरने डम्पिंग ट्रॅक्टरला पाठीमागून धडक दिल्याने ट्रॅक्टर पलटी झाला आणि या अपघातात सुनील कोंडीबा लबासे (माजलगाव) हा २४ वर्षे वयाचा ट्रॅक्टरचालक मृत्युमुखी पडला. मोहोळ जवळ चंद्रमौळी चौकात हा अपघात झाला. डम्पिंग ट्रॅक्टर (एम एच २६ बी ८४७८) हा उसाने भरून मोहोळ च्या दिशेने येत होता. कृष्णा पिनेश क्षीरसागर (१३) हा या अपघातात जखमी झाला आहे. अपघात झाल्यानंतर कंटेनर चालक पळून गेला असून मोहोळ पोलीस तपास करीत आहेत.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !