शोध न्यूज : तरुणाचे अपहरण करून त्याच्यावर खुनी हल्ला केल्याप्रकरणी पंढरपूर पोलिसात ९ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जुन्या भांडणाच्या रागातून पंढरपूर येथील एका तरुणाला बळजबरीने पळवून नेले आणि निर्जनस्थळी नेऊन त्याच्यावर खुनी हल्ला करीत त्याला ठार मारण्याचा प्रयत्न झाल्याची फिर्याद पोलिसात दाखल झाल्यानंतर हा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदर प्रकरणातून सुटका झाल्यानंतर सोहम पवार याने पोलीसात तक्रार केली आहे. पंढरपूर तालुक्यातील जुन्या कासेगाव रस्त्यावर रविवारी दुपारनंतर ही घटना घडली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पंढरपूर शहराला गुन्हेगारीची मोठी पार्श्वभूमी आहे परंतु अलीकडे ही गुन्हेगारी कमी झाल्याचे दिसत असतानाच पुन्हा हळूच ही गुन्हेगारी डोके वर काढू लागली असल्याचे दिसत आहे.
पंढरपूर पद्मावती विस्थापितनगर येथे राहणाऱ्या १९ वर्षे वयाच्या तरुणाचे दुचाकीवरून अपहरण करून त्याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न झाला आहे. पवार याने दिलेल्या फिर्यादीनुसार पंढरपूर येथे राहणारे पिल्या बंदपट्टे, अक्षय बंदपट्टे, संजय धोत्रे, रवी बंदपट्टे, देवा बंदपट्टे, भय्या पवार, रोहन बंदपट्टे यांनी तसेच अन्य दोन अनोळखी व्यक्तींच्या विरोधात हा गुन्हा पंढरपूर शहर पोलिसात दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी सोहम पवार याचा भाऊ शुभम याचा रोहन बंदपट्टे आणि पिल्या बंदपट्टे (संत पेठ) यांच्यासोबत गेल्या आठवड्यात भांडण झाले होते. दुचाकी आडवी मारल्यामुळे झालेल्या या वादापासून हे दोघे शुभम पवार याच्याविरोधात चिडून होते. भय्या उर्फ सुरज पवार आणि अन्य काही जन शुभमचा शोध घेत त्याच्या घरापर्यंत पोहोचले पण शुभम घरी नसल्यामुळे त्याच्या आईला शिवीगाळ करीत वडिलांना मारहाण करण्यात आली तसेच दमदाटीही करण्यात आली.
शुभमचा शोध घेत असतानाही तो सापडत नाही हे पाहून या टोळीने सोहम पवार याला बळजबरीने दुचाकीवर बसवून त्याला जुना कासेगाव रस्त्यावरील निर्जनस्थळी आणि काटेरी झुडुपात नेले. तेथे नेल्यावर सोहम याला जीवे ठार मारण्याची धमकी देत जबर मारहाण केली. या मारहाणीत कोयता, स्टील पंच, लाकडाचा वापर करण्यात आला. लाथा बुक्क्यांनीही त्याला मारहाण करण्यात आली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. शोहम याने तेथून आपली सुटका करून घेतली आणि पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. (Kidnapping and attack on youth, case filed in Pandharpur police) या प्रकरणी पोलिसांनी पिल्या बंदपट्टे, अक्षय बंदपट्टे, संजय धोत्रे, रवी बंदपट्टे, देवा बंदपट्टे, भय्या पवार, रोहन बंदपट्टे यांनी तसेच अन्य दोन अनोळखी व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !