BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२५ डिसें, २०२२

तहसीलदारानाच मागितली खंडणी, प्रहार संघटनेच्या पदाधिकाऱ्याला अटक !

 


शोध न्यूज : आंदोलन करण्याची आणि सोशल मीडियावर बदनामी करण्याची धमकी देत तहसीलदार यांनाच खंडणी मागितल्याच्या आरोपावरून प्रहार संघटनेच्या दोन पदाधिकाऱ्यावर खंडणीचा गुन्हा दाखल कारण्यात आला आहे.


तालुक्यात मोठ्या प्रमाणात गौण खनिजाचे उत्खनन सुरु असतानाही महसूल विभागाकडून कसलीही कारवाई केली जात नाही अशी सोशल मीडियावरून बदनामी करीन आणि आंदोलनही केले जाईल असे म्हणत प्रहार संघटनेच्या दोन पदाधिकाऱ्यानी थेट मोहोळ तहसीलदार यांनाच ५० हजार रुपयांची खंडणी मागितली. ३० हजारात तडजोड करून त्यातील ८ हजाराची रक्कम घेताना साध्या वेषातील पोलिसांनी त्यांना रंगेहात पकडले असल्याची धक्कादायक घटना मोहोळ तालुक्यात घडली आहे. याप्रकरणी प्रहार संघटनेचे सोलापूर शहराध्यक्ष अजित कुलकर्णी आणि तालुकाध्यक्ष वैभव जावळे या दोघांच्या विरोधात खंडणी मागितल्याचा गुन्हा पोलिसांनी दाखल केला आहे. या घटनेने प्रचंड खळबळ उडाली आहे. प्रहार संघटनेचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी आक्रमक आंदोलन करतात आणि समस्या तडीस नेतात अशी प्रतिमा प्रहार संघटनेची आहे परंतु आता हा वेगळाच प्रकार समोर आला आहे. 


अवैध मार्गाने गौण खनिजाचे उत्खनन सुरु असून शासनाचा महसूल बुडवला जात आहे, चिंचोली काटी औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीने शासनाचा महसूल बुडवून गौण खनिजे नेण्यात येतात तरी त्यांच्यावर कारवाई का केली जात नाही असा जाब तहसीलदार यांना विचारण्यात आला. यानंतर तहसीलदार यांनी 'तुम्हाला हवी असलेली माहिती माहिती अधिकारात मागवून घ्या' असे प्रहारच्या पदाधिकाऱ्याना सांगितले होते. प्रहार संघटनेचे पदाधिकारी बदनामी आणि आंदोलन करण्याची धमकी देत पैशाची मागणी करीत होते. सतत पैशाची मागणी करीत आणि महसूल कार्यालयाची बदनामी करीत शासकीय कामात अडथळा आणला जात होता. या संदर्भात व्हाटसएपवरून तहसीलदार यांना मेसेज देखील करण्यात आला होता. न्यूज पोर्टल आणि सोशल मीडियावरून बातम्या देत सतत बदनामी केली जात होती. या प्रकाराला तहसीलदार प्रशांत बेडसे पाटील वैतागून गेले होते. 


अखेर तहसीलदार यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. तहसील कार्यालयातील लिपिकाकडे तहसीलदार यांनी ८ हजार रुपये दिले आणि प्रहार संघटनेच्या पदाधिकाऱ्याला याची माहिती दिली. ही रक्कम घेण्यासाठी प्रहारचे तालुकाध्यक्ष वैभव जावळे हा या लिपिकाकडे गेला आणि पैशाची मागणी केली. यावेळी साध्या वेषात पोलीस तेथे दबा धरून बसलेलेच होते. लिपिकाकडून खंडणीची रक्कम स्वीकारताना जावळे याला पोलिसांनी रंगेहात पकडले आणि अटक केली.तहसीलदार प्रशांत बेडसे यांनीच याबाबत तक्रार दिली असून पोलिसांनी अजित कुलकर्णी आणि वैभव जावळे या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. जावळे याने प्रहार संघटनेचा सोलापूर शहराध्यक्ष अजित कुलकर्णी याच्याशी तहसीलदारांचे फोनवरून बोलणे करून दिले होते आणि यावेळी कुलकर्णी याने 'जावळे यांच्याकडे ५० हजार रुपये द्या, आम्ही आंदोलन करणार नाही' असे तहसीलदार यांना सांगितले होते. 


खंडणीची रक्कम स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले असल्याने या घटनेला वेगळे महत्व प्राप्त झाले असून या घटनेने प्रहार संघटना बदनामीच्या भोवऱ्यात अडकली आहे. (Extortion demanded from tehsildars, Prahar sanghatana in trouble) आंदोलन न करण्यासाठी खंडणी घेण्याचा हा प्रकार संघटनेला देखील अडचणीचा ठरू लागला आहे. 





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !