BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

३० नोव्हें, २०२२

सोलापूर जिल्ह्यातील गुरुजीनाच शिकवला "धडा" !

 


शोध न्यूज : सोलापूर जिल्ह्यातील एक मुख्याध्यापक आणि तीन उप शिक्षक यांना आज जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी सणसणीत 'धडा' शिकवला असून या चौघांनाही निलंबित करण्यात आले आहे.

 

जिल्हा परिषदेच्या काही शाळांची अवस्था भलतीच 'कठीण' बनली असून पालकांच्या मनातही जिल्हा परिषद शाळांच्या बाबतीत फारशी आस्था दिसत नाही. जिल्हा परिषद शाळेत मोफत शिक्षण असतानाही पालक महागड्या शाळेत आपल्या पाल्य पाठवत असतात. सोलापूर जिल्ह्यातील काही शाळा या अत्यंत चांगल्या असताना काही मोजक्या बिफिकीर शिक्षकामुळे शाळांची अवस्था दयनीय असल्याचे दिसत आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी मात्र अधिकारी, कर्मचारी आणि शिक्षक यांना शिस्त लावण्यासाठी आपली 'छडी' उगारली आहे त्यामुळे अनेकांचे दाबे दणाणले आहेत. शिक्षणाधिकारी किरण लोहार हे लाच प्रकरणात अडकल्यापासून सोलापूर जिल्ह्यातील शिक्षण विभागाची जोरदार चर्चा असतानाच मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी चार शिक्षकांना मोठा दणका दिला आहे.


सोलापूर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पांडे (करमाळा) येथील उप शिक्षक प्रवीण कृष्णात घाडगे आणि विलास हनुमंत ओहोळ तसेच उत्तर सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाथरी येथील मुख्याध्यापक बसवराज कोळी आणि उपशिक्षक  सतीश राठोड या चौघांचे निलंबन आज मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी केले आहे. वारंवार शाळेत गैरहजर राहणे, वारंवार रजेवर तसेच परवानगी न घेता शाळेत गैरहजर राहून विद्यार्थ्यांचे शिक्षणिक नुकसान करणे असे आरोप घाडगे आणि ओहोळ या शिक्षकावर होते. चौकशीत हे आरोप सिद्ध झाल्याने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. गट शिक्षणाधिकारी तसेच वरिष्ठ अधिकारी यांच्या सूचनांचे पालन करीत नसल्याचेही निदर्शनास आले होते. 


सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी तसेच उत्तर सोलापूर गटविकास अधिकारी यांनी ९ नोव्हेंबर २०२२ रोजी पाथरी येथील शाळेस अचानक भेट दिली होती. यावेळी मुख्याध्यापक बसवराज कोळी आणि उपशिक्षक सतीश राठोड हे शालेय कामकाजात वेळेत उपस्थित राहत नाहीत, कामकाज व्यवस्थित करीत नाहीत, वरिष्ठ अधिकारी यांनी भेटी दिल्यानंतर करण्यात आलेल्या सूचनांचे पालन करीत नसल्याचे निदर्शनास आले होते त्यामुळे या दोघांचेही निलंबन करण्यात आले आहे. (Four teachers of Solapur Zilla Parishad suspended) एकाच जिल्ह्यातील चार शिक्षकांचे एकाचवेळी निलंबन झाल्यामुळे जिल्ह्यातील शैक्षणिक वर्तुळात एकाच खळबळ उडाली असून कामचुकार शिक्षकांना मोठा हादरा बसला आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !