शोध न्यूज : पंढरपूर - मोहोळ रस्त्यावर पुन्हा एक भीषण अपघात झाला असून या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे तर तिघे जखमी झाले आहेत.
पंढरपूर - मोहोळ मार्गाचे काम संथगतीने सुरु असून या मार्गाचे काम सुरु झाल्यापासून अनेक अपघात झाले आहेत. काही दिवसांपूर्वीच पंढरपूर येथील तिघांचा दुर्दैवी मृत्यू याच मार्गावर झाला होता आणि आता पुन्हा याच मार्गावर आणखी एक मोठा अपघात झाला आहे. शनिवारी पेनूर शिवारात माने वस्तीजवळ झालेल्या या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. भरधाव वेगाने निघालेल्या स्विफ्ट कारच्या चालकाचे नियंत्रण सुटले आणि रस्त्याचे काम करीत असलेल्या कामगारांना या कारने धडक दिली. यात धडकेत हिंगोली येथील धनजयसिंह मुशीसिंह (वय ३१), शैलेंद्र दौलत जोंधळे (वय ४२) या दोघांचा जागीच मृत्यू झाला तर मध्यप्रदेशातील कौठाली येथील संतलेश उराव शुकर उराव (३४), पोखरापूर येथील अब्दुल निजाम शेख (२६) हे कामगार आणि कारचालक पंढरपूर येथील चैतन्य अतुल मेनकुदळे (२५), प्रसाद नवगिरे (३५) हे पाच जण जखमी झाले आहेत.
पंढरपूर - मोहोळ रस्त्याचे काम प्रदीर्घ काळापासून सुरु आहे. हे काम सुरु असताना या कामावर लोक काम करीत होते. यावेळी स्विफ्ट कार (एम एच १३ डी एन ५३५२) पंढरपूरकडून मोहोळच्या दिशेने निघाली होती. पेनूर जवळ ती माने वस्तीच्या परिसरात आली त्यावेळीच चालकाचे नियंत्रण सुटून ही कार सरळ कामगारांच्या अंगावर गेली, कामगारांना जोराची धडक देत या कारने त्यांना फरफटत नेले आणि नंतर कार उलटी पलटी झाली, यात दोन कामगारांचा जागीच मृत्यू झाला तर अन्य पाच कामगार जखमी झाले.
अपघाताची माहिती मिळताच मोहोळ पोलीस धावत घटनास्थळी पोहोचले. पंढरपूर येथील कार चालक चैतन्य अतुल मेनकुदळे याच्यावर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हयगयीने कार चालवून दोघांच्या मृत्यूस आणि अन्य लोकांच्या जखमी होण्यास कारणीभूत ठरल्याप्रकरणी कारचालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Two killed in an accident on Pandharpur-Mohol road) कारमधील प्रसाद नवगिरे हा देखील जखमी झाला आहे. सदर रस्त्याचे काम सुरु असल्याने अचानक चालकांचा गोंधळ उडतो आणि अपघाताच्या घटना घडतात असा नित्याचा अनुभव आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !