शोध न्यूज : अर्ध्या मार्गावरूनच राज्य परिवहन महामंडळाची बस परत नेल्याने नियंत्रकासह ९ जणांना निलंबित करण्याची मोठी कारवाई महामंडळाने केली असून एकूण प्रकरणाने प्रवासी आणि कर्मचारी यांच्यात मोठी खळबळ उडाली आहे.
राज्य परिवहन महामंडळाच्या बस सेवेच्या बाबतीत अलीकडे वेगवेगळ्या तक्रारी येत असतात. वाहकाच्या मनमानीबाबतही प्रवाशांची ओरड असते. छोट्या स्थानकावर थांबा असतानाही अनेकदा बस थांबत नाहीत त्यामुळे तेथील प्रवाशांची प्रचंड गैरसोय होत असते. विविध प्रकारच्या सामान्य तक्रारी असतात परंतु बारामती आगाराच्या एका बसने भलतीच धमाल केली असून मनमानीचा कहर झाल्याने मानले जात आहे. राज्य परिवहन महामंडळाची बस ही नेहमी ठरलेल्या मार्गावरून आणि ठरलेल्या थांब्यापर्यंत जात असते. बारामती आगाराची बस मात्र अर्ध्या रस्त्यावरूनच परत फिरली आणि प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. हा प्रकार केल्यामुळे बारामती आगारातील चार चालक, चार वाहक आणि एक नियंत्रक अशा ९ जणांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
बारामती ते नीरा जाणारी एस टी बस वडगाव निंबाळकर बस स्थानकातूनच परत नेण्यात आली. विशेष म्हणजे असा प्रकार एका बस बाबत झाला नाही तर तब्बल चार बसच्या बाबत अशीच अजब घटना घडली. चार चालक आणि चार वाहकांनी आपल्या ताब्यातील एस टी बस पुढे घेवून जाण्याऐवजी परत फिरवल्या. राज्य परिवहन महामंडळाच्या बस बाबत कधी चुकूनही असा प्रकार घडत नाही. येथे मात्र एका नव्हे तर चार बसबाबत असाच धक्कादायक आणि बुचकळ्यात टाकणारा प्रकार घडला. यामुळे प्रवाशांची अचानक आणि मोठी गैरसोय झाली. ठरलेल्या मार्गावरून बस न नेता ती अर्ध्या रस्त्यावरूनच परत आणल्यामुळे प्रवाशांची अडचण झाली. काही प्रवाशी गप्प राहिले असले तरी काहींनी मात्र याबाबत तक्रारी केल्या. काही महिलांनी तर थेट पुणे विभागाचे नियंत्रक रमाकांत गायकवाड यांच्याकडे मोबाईलवरून याबाबत तक्रार केली होती.
प्रवाशांच्या तक्रारी गेल्यानंतर या प्रकाराबाबत वरिष्ठ पातळीवरून चौकशी करण्यात आली आणि या तक्रारीत तथ्य आढळून आले. एकूण घटनेची गांभीर्याने दखल घेत चार वाहक, चार चालक आणि नियंत्रक अशा ९ जणांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. एस टी ची फेरी पूर्ण न करता आणि कुणालाही काही माहिती न देता अथवा परवानगी न घेता अर्ध्या रस्त्यातून बस परत आणणे हा शिस्तभंगाचाच प्रकार असून त्यानुसार कारवाई करण्यात आली असल्याची माहिती परिवहन महामंडळाचे अधिकारी रमाकांत गायकवाड यांनी दिली आहे. अर्ध्या रस्त्यातून बस परत आणण्याचा अलीकडील काळातील तरी हा पहिलाच प्रकार मानला जात आहे. शिस्तभंगाचा कुठलाच प्रकार खपवून घेतला जाणार नाही असा इशाराही गायकवाड यांनी दिला आहे.
राज्य परिवहन महामंडळाच्या बस अशा प्रकारे अर्ध्या रस्त्यावरून परत घेवून येण्याच्या या प्रकाराने प्रवाशांची गैरसोय तर झालीच आहे पण अचानक घेण्यात आलेल्या अशा निर्णयाचे आश्चर्य देखील व्यक्त होऊ लागले आहे. (State Transport Corporation employees suspended) आपल्या मर्जीने चालक, वाहक एस टी चा मार्ग कसा बदलू शकतात, अर्ध्या रस्त्यावरून बस परत फिरविण्याचे धाडस कसे करू शकतात ? असा सवाल आता प्रवासी देखील विचारू लागले आहेत.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !