BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२४ सप्टें, २०२२

अपघातात जखमी झालेल्या दोन बंधूंचा दुर्दैवी मृत्यू !

 


शोध न्यूज : काल संध्याकाळी अपघातात गंभीर जखमी झालेल्या दोन भावांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून माढा तालुक्यात यामुळे हळहळ व्यक्त होऊ लागली आहे. 


माढा तालुक्यातील सुर्ली येथून शिराळ (टें) गावाच्या दिशेने निघालेल्या दोन बंधूंचा काल संध्याकाळी गंभीर स्वरूपाचा अपघात झाला होता. सोळा वर्षे वयाचा विठ्ठल अतुल कदम आणि १४ वर्षे वय असलेला रणजीत अतुल कदम हे दोघे बंधू एका दुचाकीवरून दळण आणण्यासाठी म्हणून निघाले होते. संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास त्यांच्या दुचाकीला एका अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली आणि या अपघातात दोन्ही बंधू गंभीर स्वरुपात जखमी झाले होते. 


दळण आणण्यासाठी म्हणून दोघे भाऊ गेले होते आणि दळण घेऊन ते परत आपल्या घरी निघालेले असताना त्यांच्या दुचाकीस अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. धडक देवून हे वाहन पळून गेले आणि जखमी अवस्थेत दोघे भाऊ रस्त्यावर पडले. अपघाताची माहिती मिळताच आजूबाजूचे तरुण धावले आणि दोघांना टेंभुर्णी येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. दोघांना या अपघातात मोठा मार लागला होता. 


दुचाकीला अज्ञात वाहने अत्यंत जोराची धडक दिल्याने दोघे भाऊ गंभीर स्वरूपाचे जखमी झाले होते त्यामुळे त्यांच्यावर टेंभुर्णी येथे उपचार करून त्यांना अकलूज येथे नेण्यात येत होते, या दरम्यान दोघांनीही अखेरचा श्वास घेतला. (Accidental death of two brothers in Madha taluka) ही दु:खद बातमी ऐकून अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला आहे. एकाचे वय हे सोळा वर्षाचे तर दुसऱ्याचे चौदा वर्षांचे होते आणि दोघेही सख्खे भाऊ होते. विठ्ठल हा दहावी पास असून त्याने सोलापूर येथे आयटीआय प्रशिक्षण घेण्यासाठी प्रवेश घेतलेला होता. शुक्रवारीच तो सोलापूर येथून आपल्या घरी आला होता आणि दुसर्याच दिवशी ही घटना घडली, त्याचा भाऊ रणजीत हा माढा तालुक्यातील अकोले खुर्द येथे बबनराव शिंदे विद्यालयात नवव्या इयत्तेत शिकत होता. 


नियतीच्या मनात वेगळेच !

कदम कुटुंबाला अपघाताचा मोठा शाप लागला असल्याचे दिसत आहे. दोन सख्खे भाऊ या अपघातात मृत्युमुखी पडले तर दहा वर्षांपूर्वी त्यांचे वडील देखील अपघातातच गेले होते. अकोले खुर्द जवळ त्यांचा अपघात झाला होता. त्यांच्या निधनानंतर या दोन मुलांच्या आईने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत, मोलमजुरी करून या दोन्ही मुलांना वाढवले होते, त्यांच्या शिक्षण करण्यासाठी आई कष्ट करीत होती. आईचे हे कष्ट विठ्ठलला पाहवत नव्हते. शिक्षण पूर्ण करून लवकर नोकरी मिळवायची आणि आईला होणारे कष्ट थांबवायचे अशी विठ्ठलची इच्छा होती परंतु नियतीच्या मनात काही वेगळेच होते ! 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !