शोध न्यूज : ढाब्यावर मौजमजा करायला गेलेल्यांना ही मजा चांगलीच महागात पडली असून राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने ९ तळीरामाना रंगेहात पकडून ढाबा चालकासह कारवाई केली आणि न्यायालयाने त्यांना दंडही ठोठावला आहे.
ढाबा आणि हॉटेल अशा ठिकाणी मद्यविक्री करण्यास तसेच मद्यप्राशन करण्यास बंदी असताना जिकडे तिकडे खुलेआम दारू विकलीही जाते आणि तळीराम मस्त मजा घेत अशा ठिकाणी दारू प्राशन करीत बसलेले असतात. गेल्या महिन्यांपासून मात्र राज्यभर कारवाई करण्याचा सपाटा लावण्यात आला आहे. राज्य उत्पादन शुल्क विभाग अशा ढाब्यांवर धाडी टाकून चालक आणि ग्राहकांच्या विरोधात गुन्हे दाखल करून अटक करीत आहे. अत्यंत जलद गतीने दोषारोप पत्र न्यायालयात सादर केले जात आहे आणि या खटल्याचा निकाल लागून न्यायालय दंड देखील सुनावत आहे. सोलापूर जिल्ह्यातही गेल्या काही दिवसांत अशा अनेक घटना घडल्या आहेत. कारवाई होत असल्यामुळे अनेक हॉटेल चालक तसेच मद्यपी 'शहाणे' होताना दिसत आहेत पण काहीजण अजूनही याकडे दुर्लक्ष करीत आहेत.
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने अक्कलकोट रोड आणि बार्शी रोड येथील ढाब्यावर धाडी टाकल्या असता या दोन्ही ठिकाणी अवैधरित्या मद्यविक्री आणि मद्यप्राशन असे प्रकार आढळून आले आहेत. उत्पादन शुल्क विभागाने हॉटेल चालक तसेच येथे सापडलेल्या ९ मद्यपी ग्राहकांना दणका दिला आहे. गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. भोगाव हद्दीतील 'हॉटेल गावरान तडका' येथील धाडीत मालक बलभीम शिवाजी तांबे, (अंबिकानगर, बाळे) याच्यासह मद्यप्राशन करीत बसलेले ग्राहक सोमनाथ बसवराज चौगुले, अनिल तायाप्पा तांबे, नागनाथ रामलिंग कल्याणकर, परमेश्वर चंद्रकांत माने व परमेश्वर हरिश्चंद्र शेळके यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. अक्कलकोट रोडवरील शांती चौक येथील 'हॉटेल दीपक' येथे करण्यात आलेल्या कारवाईत हॉटेल मालक चंद्रकांत रामण्णा साळुंखे याच्यासह ग्राहक संगमेश्वर मलय्या राठीमाणी, प्रकाश गणू चव्हाण, चिदानंद अंजनप्पा बिराजदार व रमेश धनजू चव्हाण यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
दोन्ही घटनात गुन्हा दाखल करून मुद्देमाल तर जप्त केलाच पण मालकासह ग्राहकांना अटक करण्यात आली. अत्यंत जलद गतीने दोषारोपपत्र न्यायालयात सादर करण्यात आले. एक दिवसात दोषारोप पत्र सादर होताच दारूबंदी न्यायालयात तत्काळ सुनावणी घेण्यात आली आणि दोन्ही ढाबाचालकांना प्रत्येकी २५ हजार रुपयांचा दंड सुनावण्यात आला तर मद्यपी ग्राहकांना प्रत्येकी दोन हजार रुपयांचा दंड सुनावण्यात आला. ढाब्यावर बेकायदा मद्य विकणे आणि परवानगी नसताना त्या ठिकाणी मद्यप्राशन करणे हे या मंडळींच्या चांगलेच अंगलट आले आहे. (Illegal sale of liquor and consumption of liquor in hotels is expensive) उत्पादन शुल्क विभागाची कारवाई अशीच सुरु असून आता पुढचा नंबर कुणाचा लागतोय याकडे लक्ष लागलेले आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !