BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२४ सप्टें, २०२२

पंढरीच्या मुंगसाला लागलीय चहाची तलफ !

 


शोध न्यूज : पंढरीतील एका मुंगसाला लागलीय चहाची तलफ आणि त्यामुळे ते तलफ झाली की रोज चहाच्या टपरीवर येते आणि चहा पिऊन पुन्हा आपल्या मार्गाने निघून जाते. या मुंगसाची आणि चहाच्या टपरीची आता चांगलीच चर्चा होऊ लागली आहे. 


मुंगूस हा प्राणी 'साप मुंगूस यांच्या लढाई' बाबत नेहमी चर्चेत असतो, एवढेसे मुंगुस पण भल्या भल्या नागाला ते मारून टाकत असते. अशा लढाईचे अनेक व्हिडीओ आपण पहात असतो. एरवी मुंगूस हा प्राणी तसा भित्रा दिसतो, माणसांची चाहूल लागली तरी ते पळून जाते. मुंगसाचे तोंड पाहणे हे शुभ असल्याचे मानले जाते त्यामुळे कुठे मुंगूस दिसले तरी लोक आनंदी होतात आणि स्वत:ला भाग्यवान म्हणतात. अर्थात ही ज्याची त्याची श्रद्धा आणि समज असतात. कुठले प्राणी शुभ अथवा अशुभ असण्याचे काही कारण नसते पण एखादा समज पक्का झाला की तो कायम टिकून राहतो. मुंगुस कधी माणसांच्या जवळपास फिरकत नाही पण पंढरीत मात्र चहाची तलफ असलेल्या मुंगसाचा रोजचा वावर चहाच्या टपरीवर असतो. 


पंढरपूर - पुणे रस्त्यावर असलेल्या इसबावी परिसरात सचिन देशमाने यांचा चहाचा गाडा आहे. साहजिकच अनेकजण या गाड्याजवळ चहाचा आस्वाद घेण्यासाठी येत असतात. चहाची टपरी आणि माणसांची गर्दी हे कुठेही एक समीकरण बनलेले असते. याच गाड्याच्या मागच्या बाजूला एका इमारतीचे बांधकाम सुरु आहे. तेथे काही महिन्यांपासून एका मुंगसाचा वावर आहे. हे मुंगूस फिरत फिरत देशमाने यांच्या चहाच्या गाड्याजवळ आले तेंव्हा त्यांनी या मुंगसासाठी एका डिशमधून त्याच्यासाठी चहा ठेवला. आश्चर्य म्हणजे या मुंगसाने त्या चहाचा मनमुराद आस्वाद घेतला. संपूर्ण चहा पिऊन हे मुंगूस परत आपल्या दिशेने निघून गेले. डिशमधून मुंगूस चहा पीत असल्याचे अनेकांनी कौतुकाने पाहिले. 


ही घटना तेवढ्यापुरतीच थांबली नाही. माणूस चहाची तलफ झाली की आपोआप चहाच्या गाड्याकडे वळतो तसे आता मुंगसाचे झाले आहे. त्याच्या जिभेला चहा एवढा आवडला की आता या मुंगसाला चहाची सवयच झाली आहे. त्यालाही आता चहाची तलफ होऊ लागली असून चहा पिण्याची इच्छा झाली की ते या गाड्यावर येते. मुंगुस आले की देशमाने यांच्याही लक्षात त्याची तलफ येते आणि ते त्याला एका डिशमध्ये चहा ठेवतात. मुंगूस तो चहा आवडीने पिते आणि पुन्हा परत निघून जाते. दिवसातून त्याला दोन ते तीन वेळा चहाची तलफ होते आणि ते आवर्जून चहाच्या गाड्यावर येते. चहाच्या गाड्यावर आले की तेथील एका पत्र्याला धडक मारते. त्याच्या या हालचालीने ते चहा मागत असल्याचे देशमाने यांच्या लक्षात येते. 


देशमाने पुढे जाऊन चहाची डिश ठेवतात आणि मग लगेच हे मुंगूस पत्र्याच्या खालून बाहेर येते. शांतपणे इकडे तिकडे पहात ते चहाचा आस्वाद घेते आणि पुरात पत्र्याच्या खालून ते निघून जाते. विशेष म्हणजे देशमाने यांनी जर चहाची डिश थोडीशी अलीकडे ठेवली तर तसे चालत नाही. (Pandharpur Special News)  गाड्याच्या बाजूला माणसांचा वावर असल्याने ते जास्त पुढे यायला तयार नसते उलट चहाची डिश पायाने ओढत मागे ढकलते. हे मुंगुस अगदी नियमितपणे दिवसातून दोन तीन वेळा चहा पिण्यासाठी गाड्याजवळ येते त्यामुळे लोक हे पाहण्यासाठी आवर्जून थांबलेले असतात. त्याची येण्याची वाट पाहतात आणि ते आले की त्याचे चहा पिणे लोक कौतुकाने पहात राहतात. आता या मुंगसाची आणि त्यांना चहा देणाऱ्या देशमाने यांची चांगलीच चर्चा होऊ लागली आहे.  




 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !