BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२ नोव्हें, २०२२

कार्तिकी यात्रेतून दुचाकीसह खेळणी विक्रेत्याची पिकअप पळवली !

 



शोध न्यूज : कार्तिकी यात्रेसाठी पंढरीत गर्दी होऊ लागली असतानाच चोरीच्याही घटना घडू लागल्या असून एका खेळणी विक्रेत्याचे पिकअप वाहन तसेच एक दुचाकीही अज्ञात चोरट्यांनी पळवून नेले आहे.


पंढरीच्या प्रमुख चार यात्रांसाठी भाविकांची मोठी गर्दी होत असते. कोरोंनामुळे दोन वर्षे पंढरीच्या यात्रा भरू शकल्या नव्हत्या, आता कोरोणाचा प्रादुर्भाव जवळपास संपुष्टात आला आहे त्यामुळे सगळे निर्बंध हटले आहेत. दोन वर्षे वारीला येता आले नसल्यामुळे भाविकांची मोठी गर्दी होत आहे. कार्तिकी एकादशीचा दिवस दोन दिवसावर आलेला असल्याने या वारीसाठी पंढरीत भाविकांची मोठी गर्दी झाली असून त्यांच्या सुरक्षेसाठी मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला आहे. भाविक जसे मोठ्या श्रद्धेने वारीसाठी येतात तसेच व्यापारी आपल्या व्यवसायासाठी येत असतात. भाविकांच्या या गर्दीत अनेक चोर देखील सहभागी होत असतात आणि त्यांचा भाविकांना उपद्रव होत असतो. 


वारीच्या गर्दीत घुसलेल्या चोरांवर  नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांना डोळ्यात तेल घालून काम करावे लागते तरीही चोरटे चोऱ्या करीत असतात. वारीच्या निमित्ताने व्यापार करण्यासाठी आलेल्या एक विक्रेत्याची पिकअप वारीतून पळवून नेल्याची एक घटना पंढरीत घडली आहे.  बारामती तालुक्यातील माळेगाव येथील खेळणी विक्रेते यल्लाप्पा बाळू शिंदे हे खेळणी विक्रीचा व्यवसाय करीत असून त्यासाठी त्यांनी एक जुनी पिकअप विकत घेतलेली होती. कार्तिकी यात्रेत खेळणी विक्री करण्यासाठी त्यांचा पिकअप  (एमएच ४२ बी ३८२) घेवून पंढरीत आले होते. महात्मा फुले पुतळ्याच्या मागच्या बाजूस त्यांनी ही गाडी उभी करून सांगोला रस्त्यावर खेळणीचे दुकान लावत होते. काही वेळेत ते पुन्हा गाडीकडे आले असता त्यांनी ही गाडी जागेवर दिसून आली नाही.


महात्मा फुले पुतळ्याच्या मागच्या बाजूला गाडी लावून काहीच वेळ झाला होता तेवढ्यात पिकअप चोरून नेल्याचे दिसून आले. शिंदे यांनी आजूबाजूला शोध घेतला परंतु कोठेच त्यांच्या गाडीचा काहीच तपास लागला नाही त्यामुळे त्यांनी पोलिसात धाव घेतली आणि गाडी चोरीला गेल्याची फिर्याद दिली. (Vehicle Theft in Pandharpur Kartiki Wari) दीड लाख रुपये किमतीची त्यांची पिकअप चोरीला गेल्याची तक्रार त्यांनी दिल्यानंतर पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.


दुचाकीची चोरीला !

वारीच्या निमित्ताने पंढरीत गजबज असताना स्थानिक नागरिकाचीही एक दुचाकी चोरीला गेली आहे. जुनी पेठ येथे राहणारे सतीश मारुती कांबळे यांची दुचाकी जुन्या बस स्थानकाच्या परीसातून अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली आहे. कांबळे यांचे मिलन पान शॉप नावाचे दुकान जुन्या बस स्थानकाच्या समोरच्या बाजूस आहे. आपली दुचाकी पान दुकानाच्या बाजूला लावून ते पान दुकानात बसले होते. काही वेळाने त्यांची दुचाकी जागेवर नसल्याचे दिसून आले. त्यांनी शोधाशोध केली परंतु गाडीचा काहीच शोध न लागल्याने आपली गाडी चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी पोलिसात दुचाकी चोरीची फिर्याद दाखल केली आहे.    



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !