शोध न्यूज : ऊस दर संघर्ष समितीचे आंदोलन आता अधिक आक्रमक वळणावर पोहोचले असून रस्त्यारस्त्यावर ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांचे टायर फोडले जात आहेत .
ऊसाचा अंतिम दर ३ हजार १०० आणि पहिली उचल २ हजार ५०० रुपयांची द्यावी या मागणीसाठी उस दर संघर्ष समितीने आंदोलनाचे हत्यार हाती घेतले आहे. पंढरपूर येथे ऊस परिषद घेवून या मागणीसह अन्य मागण्या करण्यात आल्या होत्या आणि कारखान्यांना दोन दिवसांची मुदत दिली होती. कारखान्यांनी या परिषदेच्या मागण्याची आणि आंदोलनाची कसलीही दखल घेतली नाही त्यामुळे टप्प्याटप्याने संघर्ष समितीने आपले आंदोलन अधिक उग्र करण्यास सुरुवात केली आहे. त्याचा परिणाम रस्त्यारस्त्यावर दिसू लागलेला आहे. समिती आणि कारखाने यांच्यातील बैठकीतून काहीच निष्पन्न झाले नाही त्यामुळे या आंदोलनाची धार वाढू लागली असल्याचे दिसत आहे. सोलापूर जिल्ह्यातील विविध भागात टायरफोड आंदोलन वेग धरू लागले आहे.
ऊस दर संघर्ष समिती व साखर कारखानदारांमध्ये ऊस दराची बैठक निष्पळ ठरली आहे. साखर कारखान्याचे चेअरमन या बैठकीत उपस्थित राहिले नाहीत त्यामुळे काही तोडगा निघण्याचा प्रश्नच आला नाही. या अनुपस्थितीचे तीव्र पडसाद सोलापूर जिल्ह्याच्या विविध भागात उमटत आहेत. काल रात्री जवळपास सोलापूर जिल्ह्यामध्ये पंढरपूर, माढा, माळशिरस, मंगळवेढा इत्यादी भागांमध्ये ५० ते ६० ट्रॅक्टरचे टायर फोडण्यात आले आहेत. ऊस दराच्या बाबतीत शेतकरी आक्रमक असून कारखानदाराच्या बेदखल भूमिकेमुळे हे आंदोलन आता अधिकच आक्रमक होत आहे. सोलापूर जिल्हाधिकारी यांनी काही मार्ग निघण्याच्या अपेक्षेने एक बैठक बोलावली होती परतू कारखानदारांनी याला प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे संघर्ष अधिकच तीव्र होत निघाला आहे.
बार्शी-कुर्डूवाडी रोडवर देखील ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचे टायर फोडण्यात आले आहेत. बार्शी-कुर्डवाडी रोडवर शेंद्री स्टेशन व साक्षी पेट्रोलियम रिधोरे दरम्यान आंदोलकांनी ट्रॅक्टरचे चारही टायर फोडले .हा प्रकार हॉटेल शिवराय जवळ घडला आहे. ऊसाला पहिला २५००रुपये व अंतिम दर ३१०० रुपये मिळावा अशी ऊस दर संघर्ष समितीने मागणी केली आहे. मात्र साखर कारखानदारांनी कारखाना सुरू होऊन जवळपास दहा ते पंधरा दिवस उलटून देखील ऊस दराविषयी आपली भूमिका जाहीर केली नाही.
काल देखील उपप्रादेशिक साखर आयुक्तालय, सोलापूर यांच्या नियोजनाखाली जिल्हाधिकारी,सोलापूर यांच्या अध्यक्षतेखाली व ऊस दर संघर्ष समिती व साखर कारखानदार यांच्यामध्ये नियोजन भवन,सोलापूर येथे बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीला बऱ्याचशा कारखानदारांनी अनुपस्थिती दाखवली. त्या बैठकीत कोणताही तोडगा निघाला नाही.सुरुवातीला ऊस दर संघर्ष समितीने गांधीगिरी मार्गाने आंदोलन करत नंतर आता गनिमी काव्याचे शत्र उचलले आहे व आंदोलन सुरू केले आहे.त्याचाच एक भाग म्हणून टायर फोडण्याचा आणखी एक प्रकार घडला असून अशा घटना वाढत जाण्याची शक्यता दिसत आहे.
पंढरपूर तालुक्यात बाजीराव विहीर परिसरात पहिली टायरफोड घटना घडली आणि त्यापाठोपाठ याचे लोण जिल्ह्यात पसरू लागले आहे. पिराची कुरोली फाटा, दसूर पाटी, शेळवे, जुना अकलूज रोड अशी विविध ठिकाणी वाहनाचे टायर फोडले जात असून यामुळे वाहनचालक मालक धास्तावलेले आहेत. (Sugarcane price agitation more aggressive, tires burst) आत्तापर्यंत पन्नास साठ वाहनाचे टायर फुटले असून संघर्ष समिती अधिकच आक्रमक होत चालली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !