BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२ नोव्हें, २०२२

पंढरपूर तालुक्यातील वाळू तस्करांना मोठा दणका !

 


शोध न्यूज : पंढरपूर तालुक्यातील वाळू तस्करांना मोठा दणका बसला असून वाळू आणि वाहने मिळून ३१ लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. 


भीमा नदीच्या पात्रातून वाळू तस्करी करण्याचा प्रकार जुनाच असला तरी अलीकडे महसूल आणि पोलीस प्रशासनाने कारवाईचा बडगा अधिकच तीव्र स्वरुपात उगारलेला दिसत आहे. बाळू चोरांवर गुन्हे दाखल करणे, वाळू तस्करांना हद्दपार करणे , अवैध वाळू उपसा करणाऱ्या होड्या फोडून नष्ट करणे अशा विविध प्रकारच्या कारवाया सुरु आहेतच पण आता तब्बल ३० लाख ७८ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त करून वाळू चोरांना मोठा दणका दिला आहे. पंढरपूर तालुका पोलिसांनी गेल्या पाच दिवसात केलेल्या विविध कारवायात वेगवेगळे गुन्हे दाखल केला असून त्यातून लाखोंचा मुद्देमाल जप्त करण्यात यश मिळवले आहे. या कारवाईमुळे वाळू तस्करांचे धाबे दणाणले आहेत.


पंढरपूर तालुक्यातील  देगाव, मुढेवाडी, चळे, तावशी येथे अवैध वाळू वाहतूक होत असलेल्या ठिकाणी छापा टाकून दोन ट्रॅक्टर व दिड ब्रास वाळू व तीन पिकअप व दोन ब्रास वाळू असे एकूण ३० लाख ७८ हजार  रुपये किंमतीचा मुददेमाल जप्त केला. मौजे देगाव, ता. पंढरपूर शिवारातील आठ खोल्या ति-हे मार्ग सोलापुर रोडवर अवैध वाळू वाहतूक चालु असल्याबाबत माहिती मिळाल्याने सदर ठिकाणी  छापा टाकून ५ लाख ८ हजार रुपये किमतीचा  एक लाल रंगाचा विना नंबरचा स्वराज्य ८५५ कंपनीचा हेड व त्याचे मागील बिगर नंबरची डंपींग ट्रॉली व त्यात ८ हजार रुपये किमतीची एक ब्रास वाळू असा ५ लाख ८ हजार रुपये किंमतीचा मुददेमाल मिळून आल्याने अज्ञात चालकव मालक यांचे विरुध्द वरील प्रमाणे पंढरपूर तालुका पोलीस ठाणेस गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


मुंढेवाडी शिवारातील भिमा नदीपात्रातून अवैधरित्या वाळू उपसा करून ती पिकअपच्या सहायाने वाहतुक करून भरून वाळु चोरी चालु असल्याबाबत  गोपनीय माहिती मिळाल्याने सदर ठिकाणी जावून छापा टाकून ६ लाख रुपये किमतीचा विना क्रमांकाचा पांढऱ्या  रंगाचा टाटा योध्दा कंपनीचे पिकअप व ४ हजार रुपये किमतीची वाळू असा ६ लाख ४ हजार रुपये किमतींचा  मुददेमाल मिळून आल्याने अज्ञात चालक व मालक यांचे विरुध्द  पंढरपूर तालुका ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुंडेवाडी हद्दीतच वाळूचा उपसा करून वाळू पिकअप वाहनात भरून चोरी करण्यात येत असल्याची आणखी एक घटना पकडली गेली आहे. यात ५ लाख ५८ हजार रुपये किमतीचा महिंद्र पिकअप आणि वाळू असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अज्ञात चालक मालक यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पंढरपूर तालुक्यातील चळे येथे दर्लिंग मंदिराजवळ भीमा नदीच्या पात्रात टाकलेल्या छाप्यात वाहनांसह चोरीची वाळू असा ६ लाख ४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पकडण्यात आला आहे तर तावशी येथे वाहन आणि वाळू असे मिळून ८ लाख ४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या सर्व गुन्ह्यात वाहने जप्त करण्यात आलीच आहेत शिवाय अज्ञात चालक मालकांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गुन्ह्यात वापरण्यात आलेली वाहने ही विनाक्रमांकाची असून त्यांच्या मालकांचा शोध पोलीस घेत आहेत. 


पोलीस अधिक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधिक्षक  हिंमतराव जाधव, उप विभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम, पोलीस निरीक्षक मिलींद पाटील यांचे मार्गदर्शनाखाली, पोलीस कर्मचारी भराटे, कदम, गायकवाड, शिंदे, चंदनशिवे आदींनी ही कारवाई केली आहे. (Action on sand theft in Pandharpur taluka) वाळू चोरांच्या विरोधात एकूण पाच गुन्हे दाखल झाले असून लाखोंचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !