शोध न्यूज : नाशिक मध्यवर्ती कारागृहातून रजेवर गेलेला एक कैदी परस्पर फरार झाला पण तब्बल दीड वर्षे कारागृहाला याची माहितीच नसल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.
न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतर संबंधिताला कारागृहात पाठवले जाते, तेथे अत्यंत कडक बंदोबस्तात त्याला शिक्षा भोगावी लागते. कारागृहाचा बंदोबस्त अत्यंत कडक असतो आणि भिंती देखील उंच असतात. काही केल्या येथून अट्टल गुन्हेगाराला देखील पळून जाता येत नाही. अशा कडेकोट परिस्थितीतही काही गुन्हेगार तुरुंग प्रशासनाच्या हातावर तुरी देण्याचा प्रयत्न करतात पण बहुतेक वेळी ते सापडतात आणि मग भोगत असलेली शिक्षा अधिक कठोर होऊन बसते. त्यातूनही एका महाभाग कैद्याने पळ काढण्याचा मार्ग काढला, तो पसारही झाला पण तुरुंग प्रशासनाला तब्बल दीड वर्षे याचा सुगावाच लागला नाही याचे मोठे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
कारागृहातील कैद्यांना काही ठराविक दिवस रजा दिली जाते. अनेक सोपस्कार पूर्ण करावे लागतात तेंव्हा कुठे त्यांना तुरुंगातून काही दिवसांसाठी बाहेर यायला मिळते. ठरलेली रजा संपली की पुन्हा कारागृहात जावे लागते. काही कैदी मात्र रजेवर आल्यावर परत कारागृहात जायला तयार नसतात. नाशिक मध्यवर्ती कारागृहात असलेला प्रकाश कांतीलाल पांचाळ या कैद्याला एक महिन्याची रजा मंजूर झाली होती त्यामळे तो कारागृहाबाहेर गेला पण महिंना संपला तरी तो परत आला नाही दीड वर्षे उलटून गेल्यावर तुरुंग प्रशासनाला जाग आली आणि मग धावपळ करीत त्यांनी या कैद्याच्या विरोधात नाशिक रोड पोलीस ठाण्यात धाव घेतली. यामुळे कारागृह प्रशासनाचा सावळागोंधळ पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.
पांचाळ हा कैदी कायदेशीर रजा घेवून ३० एप्रिल २०२१ ला कारागृहाच्या बाहेर गेला होता. त्याला एक महिन्याची रजा मंजूर करण्यात आली होती. महिन्यानंतर हा कैदी पुन्हा कारागृहात येणे अपेक्षित होते. नाही आला तर लगेच त्यासंबंधी कारवाई सुरु होणे आवश्यक होते. परंतु यातील काहीच घडले नाही आणि तो गेला तिकडेच बेपत्ता झाला. तुरुंग प्रशासनाने मात्र त्याच्या विरोधात काहीच कारवाई केली नाही. त्याचा शोध घेतला परंतु तो कोठेच सापडत नाही त्यामुळे तो फरार झाला असे प्रशासनाचे म्हणणे आहे. तो गेल्याच्या दीड वर्षांनी नाशिक रोड पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आजवर सदर कैद्याचा शोध घेत असल्याचे म्हटले जात असले तरी त्याचे समर्थन होऊ शकत नाही. कैदी बेपत्ता होऊनही वर्षभर त्याच्या विरोधात काहीच कारवाई कशी करण्यात आली नसावी हा मोठा प्रश्न समोर उभा राहिलेला आहे.
कायदेशीर रजेवर गेलेला कैदी त्याच्या ठरलेल्या तारखेला कारागृहात पोहोचला नाही तर लगेच प्रशासनाची सूत्रे हलणे महत्वाचे होते. तब्बल दीड वर्षानंतर या कैद्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला जातो यामुळे प्रशासनाच्या कारभारावर मोठे प्रश्नचिन्ह लागले जात आहे. (Prisoners escape from prison, administration unaware) ही तक्रार एवढ्या विलंबाने का दाखल करण्यात आली ? रजा संपताच कैदी परत आला नाही ही बाब प्रशासनाच्या लक्षात कशी आली नाही ? आली असेल तर मग तातडीने पुढील कारवाई का करण्यात आली नाही ? असे विविध प्रश्न उपस्थित करण्यात येवू लागले आहेत. या घटनेने मात्र प्रशासनाच्या कारभाराकडे मात्र अनेक बोटे उचलली जाऊ लागली आहेत.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !