![]() |
प्रातिनिधिक चित्र |
शोध न्यूज : एकतर्फी प्रेम करणाऱ्या प्रियकराने स्वत:ला पेटवून घेत पेटलेल्या अवस्थेत प्रेयसीला मिठी मारल्याचा धक्कादायक प्रकार घडला असून हे दोन्हीही महाविद्यालयीन विद्यार्थी विद्यार्थिनी आहेत. या घटनेने प्रचंड खळबळ उडवून दिली आहे.
श्रद्धा वालकर या तरुणीचे प्रियकरानेच ३५ तुकडे केले आणि फ्रीजमध्ये ठेवून रोज एक तुकडा फेकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याची एक मोठी घटना नुकतीच उघडकीस आली आहे . मानवतेला धक्का लावणाऱ्या या घटनेने मोठी चिंता निर्माण केलेली असतानाच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे आणि यामुळे शैक्षणिक वर्तुळात तर हादरा बसलाच आहे परंतु पालकांची चिंता देखील वाढवली आहे. आयुष्याला आकार देण्यासाठी महाविद्यालयीन शिक्षण असते याचाच अनेकांना विसर पडू लागला असून केवळ प्रेम प्रकरण फुलाविण्यासाठीच महाविद्यालयात जायचे असते असा गैरसमज करून घेतलेल्या काही तरुण तरुणीमुळे शिक्षणाची दिशाही भरकटताना दिसत आहे. महाविद्यालयातील अनेक प्रेमप्रकरणे चिंताजनक वळणावर पोहोचू लागली आहेत पण आज वेगळीच आणि अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे.
विद्यापीठातील विद्यार्थी असलेल्या तरुण तरुणीच्या बाबतीत धक्कादायक घटना आज घडली आहे. प्रियकर विद्यार्थ्याने स्वत:ला पेटवून घेतलेच पण पेटलेल्या अवस्थेत प्रेयसी विद्यार्थिनीला मिठी मारली आणि दोघेही आगीच्या ज्वाळात लपेटले गेले . विद्यार्थिनी ही संस्थेत प्रोजेक्ट करीत बसली होती तेथे हा तरुण विद्यार्थी आला आणि केबिनचा दरवाजा बंद केला. आपल्या हाताने आपल्या अंगावर रॉकेल ओतून घेतले. त्यानंतर स्वत:ला आग लावली. आगीच्या ज्वाळांनी तो लपेटला गेला आणि त्यानंतर त्याने प्रेयसीला मिठी मारली.
या प्रकारामुळे ही तरुणी देखील भाजली गेली आहे. आजूबाजूच्या लोकांनी धाव घेत आग विझवली आणि त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. या दोघानाही घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेने विद्यापीठ परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. सुरुवातीला तर नेमके काय घडतेय आणि काय घडलेय हेच अनेकांना समजत नव्हते. अचानक घडलेल्या या प्रकाराने विद्यापीठात प्रचंड गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. संभाजीनगर येथे घडलेल्या या घटनेचे पडसाद शहरभर उमटू लागले असून पालकांत देखील भीतीचे वातावरण तयार झाले आहे.
हा प्रकार नक्की कशामुळे घडला आहे याची नेमकी माहिती लगेच मिळाली नाही परंतु एकतर्फी प्रेमातून हे घडले असावे असा अंदाज व्यक्त होत आहे. गेल्या काही काळापासून या दोघांत मैत्री होती परंतु सदर मुलीने लग्नास नकार दिला त्यामुळे तरुणाने हा प्रकार केला असल्याची चर्चाही सुरु आहे. तरुणाचे नाव गजानन मुंडे तर तरुणीचे नाव पूजा साळवे असे आहे. हे दोघे परस्परांना गेल्या चार वर्षांपासून ओळखत होते आणि गेल्या काही दिवसांपासून दोघात वाद निर्माण झाले होते.
सदर मुलीने या तरुणाच्या विरोधात आधीच पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल केली होती. अदखलपात्र गुन्ह्याची नोंद देखील केली गेली होती अशी माहिती समोर येत आहे. (Embalmed himself and hugged his girlfriend) पोलिसांनी तातडीने दखल घेतली असून पोलीस तपासानंतरच यातील तथ्य समोर येणार आहे. या घटनेने मात्र विद्यार्थिनी आणि पालकांत मात्र चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. तरुणीने दाखल केलेल्या तक्रारीकडे पोलिसांनी फारसे गंभीरपणे पाहिले नाही त्यामुळे ही वेळ आली असल्याची चर्चा देखील सुरु झाली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !