शोध न्यूज : सरकारी मदतीत शेतकऱ्यांच्या तोंडाला नेहमीच पाने पुसली जात असल्याचा अनुभव येत असतानाच आता विमा कंपनीकडून पन्नास हजाराचे नुकसान झालेल्या एका शेतकऱ्याला केवळ साठ रुपयांचा पीक विमा मिळाला आहे.
शेतकऱ्याला नेहमीच निसर्गाचा मोठा फटका सहन करावा लागतो त्यासोबत विविध अडचणीतून शेतकरी मार्ग काढत असतो पण त्याला एकीकडे निसर्गाचा आणि दुसरीकडे सरकारचा मार सहन करावा लागत असल्याच्या घटना नेहमीच पहायला मिळत असतात. अस्मानी संकटाने दणका दिला की शेतकरी मोठ्या आशेने सरकारी मदतीकडे पहात असतो. ही मदत त्याला सहजासहजी मिळत नाहीच पण जेंव्हा ती मिळते तेंव्हा मायबाप सरकारने आपली थट्टा केल्याची भावना त्याची होत असते. असाच अनुभव भंडारा जिल्ह्यातील मोहाडी येथील एका शेतकऱ्याला आला आहे. त्याला मिळालेला पीकविमा पाहून विमा कंपनी शेतकरी बांधवाच्या बाबतीत किती संवेदनशील असावे याची प्रचिती येत आहे.
यंदा पावसाने आणि अतिवृष्टीने शेतकरी बांधवाना फार मोठा फटका दिला आहे. उभी पिके नष्ट झाली आहेत आणि सरकारच्या घोषणा, आश्वासने ऐकून त्यांचे कान थकून गेलेले आहेत. निसर्गाचे संकट आले की शासनाच्या मोठ्या घोषणा ऐकायला मिळतात. या घोषणांनी पीडितांना दिलासाही मिळतो पण तो क्षणभंगुर ठरतो. शेतकऱ्यांचे सरकार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वारंवार सांगत असतात आणि शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नयेत म्हणून आवाहन देखील केले जाते. पण हे शिंदे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीमागे किती खंबीर उभे आहे याचे प्रदर्शन अशा काही घटनातून दिसून येवू लागले आहे. विमा कंपनीने गरीब शेतकऱ्याची टिंगल केली असल्याचाच हा प्रकार आहे.
निसर्गाच्या फटक्याने हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना शासनाची मदत मिळताना नेहमीच असे प्रकार घडताना दिसतात. राज्य सरकारकडून मदत येण्याची वाट बळीराजा पाहत आहे पण ती मदत अजून काही पोहोचत नाही. विमा कंपनीने मात्र पीक विमा दिला असून ५० हजार रुपयांचे नुकसान झालेल्या विश्वास पाटील या शेतकऱ्यास ६० रुपयांचा विमा देण्यात आला असून त्यांच्या खात्यावर ही रक्कम जमा देखील झाली आहे. तीन एकराची शेती असलेल्या पाटील यांनी खरीप हंगामात भात लावला होता. यासाठी त्यांना ५० हजार रुपयांचा खर्च आला होता. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात तीन वेळा अतिवृष्टी झाली आणि त्यांचे पिक पाण्यात बुडाले, बराच काळ पीक पाण्यात राहिल्यामुळे संपूर्ण पीक नष्ट झाले.
पिकाचे नुकसान झाले असले तरी पीक विमा आधार देईल ही अपेक्षा आणि आशा होती परंतु पीक विमा रक्कम जमा झाल्याचा आलेला मेसेज पाहून त्यांना धक्काच बसला. पीक विमा काढण्यासाठी त्यांना ८२० रुपयांचा खर्च आला आणि ५० हजार रुपये खर्च केलेले पीक वाया गेले त्याची विमा रक्कम अवघे ६० रुपये मिळाली. (Loss of fifty thousand, crop insurance sixty rupees) यापेक्षा गरीब शेतकऱ्याची थट्टा दुसरी काय असू शकते ? त्यांना मिळालेल्या ६० रुपये पीक विम्याची चर्चा परिसरात सुरु झाली असून शेतकऱ्यांना कधीतरी कुणी वाली भेटणार आहे की नाहीच ? असा सवाल विचारला जाऊ लागला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !