BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२९ नोव्हें, २०२२

ठेकेदाराकडून लाचेची मागणी करणाऱ्या ग्रामसेवकाला अटक !



शोध न्यूज : कामाचे बिल देण्यासाठी ठेकेदाराकडून लाच मागणारा ग्रामसेवक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला असून त्याला बेड्या ठोकण्याची घटना सोलापूर जिल्ह्यात आज घडली आहे.


अलीकडे लाचखोरीचे लोण खेड्यापर्यंत देखील आलेले असून लाचेची गोडी ग्रामसेवकापर्यंत पोहोचली आहे. शासकीय विभागातील अनेक बडे अधिकारी आणि कर्मचारी लाच घेताना रंगेहात सापडतात तसे सामान्य शिपाई देखील लाचेची चव घेताना सापळ्यात अडकत असतात. गेल्या काही महिन्यात लाचेची चव ग्रामपंचायतीमधील ग्रामसेवक आणि सरपंच यानाही लागली असल्याचे समोर आलेले आहे. आज सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील बोराळे येथील ग्रामविकास अधिकारी आपलाच विकास करताना अडकला आहे. 


पंधराव्या वित्त आयोगातून करण्यात आलेल्या कामाचे बिल देण्यासाठी ग्रामविकास अधिकारी गोपीचंद दादा गवळी याने तब्बल एक लाख रुपयांची लाच ठेकेदाराकडे मागितली आणि त्यातील पन्नास हजार रुपयांचा पहिला हप्ता घेण्याच्या प्रयत्नात तो सापळ्यात अडकला. मंगळवेढा तालुक्यातील बोराळे ग्रामपंचायतीचा हा ग्रामविकास अधिकारी मुळचा मोहोळ तालुक्यातील अंकोली येथील आहे. (Gramsevak arrested for demanding bribe) तक्रारदाराचे मित्र हे ठेकेदार असून मंगळवेढा तालुक्यातील बोराळे येथील ग्रामपंचायतीचे पंधराव्या वित्त आयोगातील काम त्यांनी केले होते. या कामाचे बिल आणि जिल्हा परिषद शेषनिधीच्या अंतर्गत केलेल्या कामाचे बिल त्यांना मिळालेले नव्हते. हे बिल मिळावे यासाठी ते प्रयत्न करीत होते. 


सदरचे बिल मिळावे यासाठी ठेकेदाराचे मित्र असलेले तक्रारदार हे पाठपुरावा करीत होते. या कामाच्या बिलाची रक्कम ग्रामपंचायत खात्यात जमा देखील करण्यात आले होते. पण ग्रामसेवक गोपीचंद गवळी याने बक्षीस म्हणून एक लाख रुपयांची लाच मागितली होती.  त्यात तडजोड होऊन पन्नास हजार रुपयांचा पहिला हप्ता मान्य करण्यात आला होता. याबाबत तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. या तक्रारीनुसार पडताळणी केली असता लाच मागणी केल्याचे दिसून आले.  त्यानुसार पुढील कारवाई करून ग्रामसेवक गोपीचंद गवळी याला ताब्यात घेण्यात आले. मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून आरोपी लोकसेवक गवळी याला अटक करण्यात आली आहे. 


 



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !