शोध न्यूज : कायद्याने बंदी असतानाही बालविवाह उरकण्याचा घाट घातलेले दोन बालविवाह सोलापूर जिल्ह्यात रोखण्यात आले आहेत. जिल्हा बाल संरक्षण कक्षाने ही करवाई केली आहे.
बालविवाह करण्यास कायद्याने मनाई असताना आणि याबाबत माहिती असतानाही अनेक पालक अल्पवयीन मुलींचे विवाह गुपचूप उरकण्याचा प्रयत्न करीत असतात पण प्रशासनाला सुगावा लागताच असे विवाह रोखले जातात. प्रशासनाच्या डोळ्यात धूळ फेकण्यासाठी अनेक प्रकारच्या युक्त्या केल्या जातात पण संबंधित पालक कायद्याच्या कचाट्यात अडकत असतात. सोलापूर जिल्ह्यात अशाच प्रकारे करण्यात येऊ लागलेले दोन विवाह जिल्हा बाल संरक्षण कक्षाने रोखले असून यातील एक विवाह बार्शी तालुक्यात तर दुसरा विवाह माढा तालुक्यात करण्याचा प्रयत्न करण्यात येत होता. प्रशासनाने तो वेळीच हाणून पाडला त्यामुळे हे बाल विवाह होऊ शकले नाहीत.
दिवाळीनंतर तुलसी विवाह केला जातो आणि हाच मुहूर्त साधून हे बालविवाह उरकण्याचा घाट घातला गेला होता. माढा तालुक्यातील मानेगाव येथे यातील एक बालविवाह आयोजित करण्यात आला होता. मोहोळ तालुक्यातील अवघ्या १४ वर्षे वयाच्या मुलीचा विवाह मानेगाव येथील ३८ वर्षे वयाच्या व्यक्तीसोबत करण्याचे निश्चित करण्यात आले होते तर बार्शीत २५ वर्षे वयाच्या तरुणाशी १७ वर्षे ८ महिने वयाच्या मुलीचा विवाह आयोजित करण्यात आला होता. या दोन्ही विवाहाबाबत प्रशासनाला सुगावा लागला आणि प्रशासनाने हे दोन्ही विवाह होण्याआधीच रोखले आहेत.
माढा तालुक्यातील मानेगाव येथे होणारा बालविवाह अधिक चर्चेचा ठरला आहे. मोहोळ तालुक्यातील एक अल्पवयीन मुलीचा विवाह मानेगाव येथे आयोजित करण्यात आला होता. यात मुलीचे वय केवळ १४ वर्षांचे होते तर मुलाचे वय तब्बल ३८ वर्षांचे होते. असा विवाह होणार असल्याची खबर माढा पोलिसांच्या कानावर गेली आणि पोलीस प्रशासन वेगाने कामाला लागले. या विवाहाबाबत माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. या पथकाने मुलीच्या वयाबाबत खातरजमा करून घेतली आणि मुलीचे वय कमी असल्याचे निदर्शनास आले. (Two child marriages were prevented in Solapur district) या मुलीला ताब्यात घेत पोलिसांनी तिला बालकल्याण समितीकडे सुपूर्द केले आणि हा होणारा बालविवाह रोखला गेला.
चार महिने कमी !
बार्शी तालुक्यातील एका मुलीचे वय केवळ चार माहिने कमी होते परंतु तोपर्यंत न थांबता तिचा विवाह उस्मानाबाद जिल्ह्यातील एक मुलाशी आयोजित करण्यात आला होता. चार महिन्यांनी तिचे अठरा वर्ष पूर्ण होणार होते परंतु त्याआधीच लग्नाचा घाट घातला गेला आणि याची माहिती जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अतुल वाघमारे यांना समजली. त्यांनी तातडीने सूत्रे हलवली आणि विवाह होणार असल्याच्या दिवशीच पांगरी पोलीस लग्नस्थळी पोहोचले. लग्नाची तयारी झालेली होती, मंडप देखील टाकण्यात आला होता. या लग्नमंडपात सुरुवातीला तुळशीचे लग्न लावण्यात आले. त्यानंतर अल्पवयीन मुलीच्या लग्नाचा सोहळा होणार होता परंतु तो रोखला गेला.
तुलसी विवाहाचा सोहळा !
तुलसी विवाहाचा सोहळा असल्याचे चित्र पोलिसांना पाहायला मिळाले पण याच मंडपात हातावर मेंदी काढलेली आणि पिवळी साडी परिधान केलेली मुलगी आणि हळदीचा विधी करण्याची लगबग पोलिसांना जाणवली. त्यामुळे पोलिसांनी मुलीच्या वयाचा अंदाज घेतला. विश्वासात घेवून नवरी मुलीकडे विचारणा केली असता मुलीचे वय अठरा वर्षांपेक्षा कमी असल्याचे निदर्शनास आले त्यामुळे पोलिसांनी हा विवाह ऐन हळदी समारंभांवेळीच रोखून धरला. पोलिसांनी तिला ताब्यात घेतले आणि बालकल्याण समितीसमोर हजर केले. तातडीने हालचाल केल्यामुळे हा विवाह होण्याआधीच रोखण्यात प्रशासनाला यश मिळाले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !