शोध न्यूज : द्राक्षबागेचे काम करीत असताना बेशुद्ध पडून एका तरुण शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली असून या घटनेने प्रचंड हळहळ व्यक्त होऊ लागली आहे.
द्राक्ष बागेची छाटणी करून डॉरमँक्सची पेस्ट लावून नंतर सुतळीच्या सहाय्याने कांड्या बांधत असताना मोहोळ तालुक्यातील पापरी येथे तरुण शेतकरी बेशुद्ध पडला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला आहे. अक्षय गायकवाड या तरुण शेतकऱ्याने अन्य मजुराच्या सोबतीने दिवसभर द्राक्षबागेची छाटणी आणि डॉरमँक्स पेस्ट लावण्याचे काम केले. त्यानंतर बागेतील सर्व मजुरांना घेवून ट्रॅक्टरमधून त्याने पेनूर येथे सोडले आणि घरी परतला. घरी आल्यावरही पुन्हा तो द्राक्षबागेत सुतळी बांधण्याच्या कामासाठी म्हणून तो परत शेतात गेला. शेतात गेलेला अक्षय उशीर झाला तरी परत आला नाही म्हणून त्याचे वडील गोरख मनोहर गायकवाड यांनी यांनी त्याला फोन केला पण त्याचा फोन उचललाच गेला नाही.
शेतात गेलेला अक्षय परत घरीही आला नाही आणि फोन केला तरी प्रतिसाद देत नाही त्यामुळे कुटुंबाला चिंता वाटू लागली. वडील गोरख गायकवाड हे बॅटरी घेऊन शेताच्या दिशेने गेले. शेतात गेल्यानंतर बॅटरीच्या प्रकाशात त्यांनी पहिले असता अक्षय हा जमिनीवर पडलेला दिसला. त्याला उठविण्याचा प्रयत्न केला परंतु तो उठला नाही. अक्षय हा बेशुद्धावस्थेत असल्याचे लक्षात आले त्यामुळे त्यांनी पुतण्या प्रवीण गायकवाड याना फोन करून एकूण प्रकाराची माहिती दिली. अक्षय हा नेमका कशामुळे बेशुद्ध होऊन पडला असावा याचा काहीच अंदाज येत नव्हता परंतु प्रयत्न करूनही तो प्रतिसाद देत नव्हता. अक्षयची अवस्था पाहून वडील प्रचंड काळजीत होते.
फोनवरून माहिती मिळताच प्रवीण तातडीने शेतात पोहोचला आणि चार चाकी वाहनातून अक्षय याला पेनूर येथील रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आले. तेथील डॉक्टरांनी अक्षयला मोहोळ येथील रुग्णालयात घेऊन जाण्याचा सल्ला दिला. त्यानुसार त्याला पुन्हा मोहोळ येथे नेण्यात आले. ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांनी अक्षय याला तपासून पहिले पण उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे आढळून आले. त्याच्या मृत्यूची माहिती मिळताच कुटुंबाला मोठा धक्का बसलाच पण परिसरातून देखील मोठ्या प्रमाणात हळहळ व्यक्त करण्यात येऊ लागली आहे. (Death of a young farmer while working in a vineyard) अक्षय हा तरुण आणि अत्यंत कष्टाळू शेतकरी तरुण होता. त्याचा अशा प्रकारे मृत्यू झाल्याचा अनेकांना धक्का बसला असून मोहोळ पोलीस अधिक चौकशी करीत आहेत.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !