शोध न्यूज : जुनोनी येथे भाविकांच्या दिंडीत झालेल्या अपघातातील जखमी महिला वारकऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून आता या अपघातातील मृतांची संख्या आठवर गेली आहे.
कार्तिकी वारीसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील वारकऱ्यांची दिंडी पंढरपूरकडे निघाली असताना सांगोला तालुक्यातील जुनोनीजवळ ३१ ऑक्टोबर रोजी मोठा अपघात झाला होता. सायंकाळच्या वेळेस ही दिंडी रस्त्याने निघालेली असताना सांगोला तालुक्यातील एक गाडी थेट या दिंडीत घुसली होती. या अपघातामुळे दिंडीतील सात वारकरी जागीच ठार झाले होते. हरिनामाचा जयघोष करीत निघालेल्या या दिंडीवर काळाचा मोठा घाला घातला गेला होता. याप्रकरणी आजोबा आणि नातू यांच्याविरोधात पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. तुकाराम दामू काशीद (सोनंद, ता. सांगोला) आणि त्यांचा नातू दिग्विजय मानसिंग सरदार (पंढरपूर) यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नातवाला वाचविण्यासाठी आजोबा कार चालवीत असल्याचे सुरुवातीला पोलिसांना सांगण्यात आले होते त्यामुळे दोघांवरही हा गुन्हा दाखल झाला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील जठारवाडी येथील सात वारकरी या अपघातात ठार झाल्याने कोल्हापूर जिल्ह्यात शोक व्यक्त करण्यात आला होता. या अपघातात एका १४ वर्षीय मुलाचाही मृत्यू झाला होता. सदर कार आजोबा चालवीत होते अशी पोलिसांची दिशाभूल करण्यात आली होती परंतु पोलिसांनी केलेल्या तपासात ही कार नातू चालवत असल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी अत्यंत कौशल्याने हे खोटे उघडे पाडून सत्य समोर आणले आहे.
या अपघातात सात वारकरी जागीच ठार झाले आणि जखमींना पंढरपूर, सोलापूर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. पंढरपूर येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या गंभीर जखमी झालेल्या एका वारकरी महिलेचा उपचार घेताना मृत्यू झाला आहे. ४५ वर्षे वयाच्या सौ. सरिता अरुण शियेकर (जठारवाडी, ता. करवीर ) यांचा पंढरपूर येथील रुग्णालयात मृत्यू झाला आणि या अपघातातील मृतांच्या संख्येत आणखी वाढ झाली. (Death of Warkari woman injured in Junoni accident) आता या अपघातातील मृतांची संख्या आठ झाली आहे. यातील ६ मृत हे जठारवाडी गावातील आहेत. त्यामुळे या गावावर पुन्हा एकदा शोककळा पसरली आहे.
अपघातातील जठारवाडी येथील दोन जखमींना रुग्णालयातून उपचार करून सोडण्यात आले आहे तर एक जखमी कोल्हापूर येथे उपचार घेत आहे. आणखी एका जखमीवर सोलापूर येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या अपघाताने करवीर तालुक्यातील जठारवाडी गावाला मोठा धक्का बसला आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !