शोध न्यूज : लग्नाची तयारी झाली पण ऐनवेळी लग्नासाठी आलेली नवरीच पळून गेली आणि नवरा मुलगा दीड लाखाचा लागलेला चुना घेवून हात चोळीत बसला. लग्नाच्या बहाण्याने फसवणूक झाल्याची आणखी एक घटना सोलापूर जिल्ह्यात घडली.
कर्जत तालुक्यातील जळकेवाडी येथील बाळासाहेब रमेश मोरे यांनी या घटनेबाबत पोलिसात तक्रार दिली असून हा फसवणुकीचा मोठा प्रकार असल्याचे दिसून आले आहे. लग्न तर नाहीच पण दीड लाखांचा गंडा घातला गेल्याप्रकरणी सहा जणांच्या विरोधात सोलापूर एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बापूसाहेब मोरे यांच्या लग्नासाठी त्यांचे कुटुंबीय मुलीच्या स्थळाच्या शोधात होते. निलेश यादव आणि दत्तात्रय दळवी यांना या लग्नासाठी स्थळ शोधण्यास सांगण्यात आले होते. दत्तात्रय दळवी यांनी पुण्याच्या वाघोली येथील वधू वर सूचक मंडळाच्या शामल चव्हाण यांच्याकडे जाण्याचा सल्ला मोरे यांना दिला होता. त्यानुसार मोरे यांनी शामल चव्हाण यांच्याशी संपर्क साधला आणि पुढील नाट्यमय घडामोडी सुरु झाल्या.
लग्नासाठी सोलापूर जिल्ह्यातील एक मुलगी आहे पण मुलगी पाहण्यासाठी सोलापूर जिल्ह्यात यावे लागेल शिवाय या लग्नासाठी दीड लाख रुपयांचा खर्च येईल असे मोरे यांना सांगण्यात आले. स्थळाची आवश्यकता होती आणि स्थळ उपलब्ध होते त्यामुळे बाळासाहेब मोरे यांच्या कुटुंबातील काही जण लग्नाची मुलगी पाहण्यासाठी म्हणून सोलापूर जिल्ह्यातील टेंभुर्णी येथे गेले. त्यानंतर मात्र जत येथील मुबारक मुल्ला याची ओळख करून देण्यात आली. यावेळी धानम्मा बिराजदार ही महिला देखील त्यांच्यासोबत होती. या दोघांनी मिळून मोरे यांच्या कुटुंबियांना जुने घरकुल येथे एका घरात नेले आई तेथे सुरेखा पुजारी या मुलीचे स्थळ दाखविण्यात आले.
मुलगी दाखवताना मुलीचे आई वडील यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती देण्यात आली आणि 'आज रात्र झाली आहे, लग्नाचा कार्यक्रम उद्या करू, तोपर्यंत विवाहाची कागदपत्रे तयार करू' असे सांगत दहा हजार रुपये फोन पे च्या माध्यमातून मागून घेण्यात आले. दुसऱ्या दिवशी करारपत्र लिहून घेतेवेळी धानम्माच्या खात्यात १ लाख दहा हजार रुपये जमा करण्यास मुल्ला यांनी मोरे यांना सांगितले. त्यानुसार रोख रक्कम पन्नास हजार आणि धानम्मा बिराजदार हिच्या खात्यात साठ हजाराची रक्कम पाठविण्यात आली. (The bride ran away after being cheated of one and a half lakh) यावेळी शामल चव्हाणच्या बँक खात्यावर देखील पंधरा हजाराची रक्कम पाठविण्यात आली.
आणि नवरी पळाली !
आपल्या खात्यावर पैसे आलेच नाहीत असे म्हणत धानम्मा हिने वेगळेच नाटक सुरु केले आणि अत्यंत कौशल्याने ती तेथून पद्धतशीर सटकली. तिने पळ काढल्यावर शामल आणि मुल्ला यांनी 'तुम्ही मुलगी, तिची बहिण महानंदा यांना सोबत घेवून पुणे नाक्यावर या. आपण मंदिरात लग्न लावू आणि मग लग्न झाले की मुलीला तुम्ही सोबत घेवून जावे' असे सांगितले. त्यानुसार ठरलेल्या ठिकाणी सगळे गेले पण तेथे काही अपरिचित लोक उपस्थित झाले. त्यांनी वेगळाच गोंधळ घालायला सुरुवात केली आणि या गोंधळाचा फायदा घेत नवरी मुलगी आणी तिची बहिण महानंदा या दोघीही तेथून सटकल्या.
फसवणूक झाली !
गोंधळ शांत झाल्यावर मुलीचा शोध घेतला असता नवरी मुलगी बेपत्ता होती आणि तिची बहिणही तेथे नव्हती. मोबाईलवरून संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता सगळ्यांचेच फोन बंद अवस्थेत होते. यावेळी मात्र आपली फसवणूक झाली असल्याचे मोरे कुटुंबियांच्या लक्षात आले आणि मग त्यांनी धावत पळत पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आता या सगळ्या भामटेगिरीचा शोध पोलीस घेत आहेत.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !