BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१४ ऑक्टो, २०२२

चार कोटींचा गंडा घालून ऊस तोडणी टोळ्या झाल्या बेपत्ता !

 



शोध न्यूज : साखर कारखान्याचे गळीत हंगाम सुरु होण्याआधीच ऊस तोड कामगारांनी चार कोटींचा गंडा घालून पळ काढल्याचा धक्कादायक प्रकार पुन्हा एकदा समोर आला आहे.


ऊसाची तोडणी करणाऱ्या कामगारांकडून वाहतूकदारांची दरवर्षीच मोठी फसवणूक केली जात असल्याच्या घटना घडत असतात. कामगारांच्या टोळ्या आधी रक्कम घेतल्याशिवाय तोडणीसाठी येण्यास राजी नसतात त्यामुळे वाहतूकदार त्यांना मोठी रक्कम आधीच देतात. टोळीप्रमुख ही रक्कम घेतात आणि तोडणीसाठी टोळी घेवून येत असल्याचे सांगतात परंतु प्रत्यक्षात मात्र ऐनवेळी ते गायब झालेले असतात. वाहतूकदार त्यांना सोबत घेवून येण्याच्या इराद्याने जातात तेंव्हाही रक्कम घेवून रात्रीच टोळी प्रमुख पळ काढून लाखो रुपयांची फसवणूक करतात. अशी फसवणूक सतत केली जात असल्याने ही एक मोठी समस्या बनत चालली आहे. यावर्षी देखील ऊस तोडणी मजुरांच्या टोळ्यांनी चार कोटी रुपयांचा गंडा वाहतूकदारांना घातला असल्याची बाब समोर आली आहे. दोन साखर कारखान्यांच्या बाबतीतच हा आकडा चार कोटीवर पोहोचला आहे.


सोमेश्वर सहकारी साखर कारखाना आणि फलटण तालुक्यातील श्री दत्त शुगर या कारखान्याच्या क्षेत्रातील ऊस तोडणी बाबत मोठी फसवणूक झाली असल्याचे समोर आले आहे. ऊसाची तोड करणाऱ्या सुमारे चाळीस टोळ्यांनी वाहतूकदारांची मोठी फसवणूक केली आहे. ट्रक, ट्रॅक्टरद्वारे उसाची वाहतूक करणाऱ्या वाहतूकदारांना चार कोटींचा गंडा घालून तोडणी मजुरांच्या टोळ्या पळून गेल्या आहेत. उद्या १५ ऑक्टोबर पासून साखर कारखाने सुरु करण्यासाठी शासनाने परवानगी दिलेली आहे आणि ऐनवेळी या टोळ्यांनी वाहतूकदारांना मोठा  दणका दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या विविध भागात पाऊस होत असल्याने यंदाचा हंगाम काहीसा लांबणीवर पडण्याची शक्यता स्पष्ट दिसत असताना हा वेगळाच प्रकार समोर आला आहे त्यामुळे वाहतूकदार मोठ्या अडचणीत आलेले आहेत. यापूर्वीही तोडणी कामगारांकडून अशा प्रकारची फसवणूक करण्यात आलेली आहे. दरवर्षीच अशा फसवणुकीचा सामना करावा लागत असल्यामुळे हा एक चिंतेचा विषय बनला आहे. 


शासनाने कारखाने सुरु करण्यासाठी १५ ऑक्टोबर हा दिवस निश्चित केल्याने कारखाने सज्ज झाले आहेत. ऊसाची तोडणी करणाऱ्या यंत्रणांशी करार केलेले आहेत. पावसामुळे हंगाम सुरु होणे लांबणीवर पडणार असले तरी कारखान्यांनी संपूर्ण तयारी केलेली आहे परंतु तोडणी कामगारांनी ऐनवेळी मोठा दगा दिलेला उघडकीस आला आहे. सोमेश्वर सहकारी आणि श्री दत्त शुगर या कारखान्यांनी ४३६ ट्रक - ट्रॅक्टर, ८६० बैलगाडी, २६९ डंपींग आणि १३ हार्वेस्टरशी करार केले असून सर्वांना आगाऊ रकमा दिल्या आहेत. सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने  ४३६ ट्रक - ट्रॅक्टर वाहतुकदारांशी करार करून प्रत्येक वाहनाला ५ लाखांची उचल दिली आहे. वाहतूकदारांनी देखील आपल्या जवळचे पाच लाखापासून बारा लाखांपर्यंत रकमेची भर घालून ऊस तोडणी कामगारांशी करार केलेला आहे, या कराराप्रमाणे उसाची तोड करणाऱ्या टोळ्या कारखान्यावर येण्याची अपेक्षा होती परंतु बीड आणि चाळीसगाव येथील टोळ्या करार करूनही आल्याच नाहीत. 


ऐनवेळी टोळ्या न आल्याने वाहतूकदार तणावात असून या टोळ्यांचा शोध घेतला असता त्यांचा काहीच थांगपत्ता लागत नाही त्यामुळे वाहतूकदारांची चिंता वाढली आहे. वाहतूकदारांनी कर्ज काढून, सोने गहाण ठेवून लाखो रुपयांची रक्कम या टोळ्यांना दिली आहे पण करार करूनही टोळ्या बेपत्ता झाल्या आहेत. आधी रक्कम दिल्याशिवाय या टोळ्या यायला राजी नसतात त्यामुळे वाहतूकदार कशीबशी ही रक्कम जमा करतो पण ऐनवेळी त्यांना दगाफटका झाल्याने ते हवालदिल झाले आहेत. पैसे घेवून, रीतसर करार करून देखील या टोळ्या पळून गेल्या असल्याचे समोर आले आहे. सोमेश्वर सहकारी साखर कारखाना आणि श्री दत्त शुगर यांच्या क्षेत्रात देखील मोठी फसवणूक झाली आहे. हंगाम सुरु होत असल्यामुळे वाहतूकदारांनी टोळ्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला पण त्यांचे फोन बंद आहेत. धास्तावलेल्या वाहतूकदारांनी त्यांची घरे गाठली पण तेथूनही ते बेपत्ता असल्याचे दिसून आले आहे . या टोळ्या परराज्यात गेल्या असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. 


ऊस तोडणी टोळीच्या मुकादमाशी करार करण्यात येत असतो आणि टोळी घेवून येण्याची जबाबदारी देखील मुकादमाचीच असते. परंतु पैसे घेवून हे मुकादमच बेपत्ता झाले आहेत त्यामुळे विचारायचे कुणाला ? हा सवाल वाहतूकदारांच्या पुढे आहे. (Transporters cheated of crores by sugarcane cutting workers) दरवर्षी कुठे ना कुठे असे फसवणुकीचे प्रकार घडत असतात त्यामुळे यावर ठोस उपाय शोधण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. साखर संघ आणि कारखाने यांनी यातून मार्ग काढावा अशी वाहतूकदारांची अपेक्षा आहे. सद्या मात्र मोठ्या फसवणुकीने वाहतूकदार हवालदिल झाले आहेत. 






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !