BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१ फेब्रु, २०२२

चोरट्यांनी देवाला सुध्दा नेले चोरून !

 



माळशिरस : कोरोनाच्या काळापासून चोरींच्या घटनात वाढ होत असताना आता चोर देवालाही सोडत नसल्याचे दिसून आले असून तरंगफळ येथील देवाच्या मृत्यूवरही चोरांनी डल्ला मारल्याची घटना समोर आली आहे.


अलीकडे सगळीकडेच चोरींच्या घटना वाढल्या आहेत. वेगवेगळ्या युक्त्या करून चोर चोऱ्या करू लागले आहेत. घराला कुलूप म्हणजे चोरांना खुले निमंत्रण ठरताना दिसत आहे तर वेगवेगळ्या बतावण्या करून हातोहात चोरी करून चोर पसार होत आहेत. रस्त्यावरून निघालेल्या महिलांच्या गळ्यातील दागिने ओरबाडून जात आहेत. चोरांना कसल्याच प्रकारची आणि कुणाचीही भीती उरली नसल्याची साक्ष देणाऱ्या अनेक घटना आजूबाजूला घडत असताना आता चोर देवालाही सोडायला तयार नसल्याची घटना घडली आहे. आपले रक्षण कर म्हणून लोक ज्या देवाला साकडे घालतात तो देवदेखील सुरक्षित नसल्याचेच हे उदाहरण समोर आले आहे. 


माळशिरस तालुक्यातील तरंगफळ येथे जागृत देवस्थान म्हणून परिचित असलेल्या सिद्धनाथ मंदिरात चोरट्यांनी चोरी केली आहे. सिद्धनाथ, जोगेश्वरी देवी आणि घोड्याची एक अशा तीन चांदीच्या  मुर्त्या चोरट्यांनी रात्रीच्या वेळी चोरून नेल्याची बाब पुजारी अंकुश गेंड यांच्या सकाळी लक्षात आली.  मंदिरातील कपाटाच्या वर ठेवलेली चावी घेऊन कपाट उघडून चोरट्यांनी या तीन चांदीच्या मूर्ती लंपास केल्या आहेत. दीड ते दोन किलो वजनाच्या असलेल्या या मूर्ती सुमारे पाऊण लाख रुपये किमतीच्या आहेत. मूर्ती चोरी गेल्याचे सकाळी लक्षात आले तेंव्हा पुजाऱ्यासह गावकऱ्यानाही धक्का बसला. या घटनेबाबत भाविकांनी संताप व्यक्त केला असून त्वरित या चोरीचा तपास व्हावा अशी मागणी होऊ लागली आहे. 


वेगवेगळ्या प्रकाराने होत असलेल्या चोऱ्या आता मंदिरापर्यंत आल्याने गावकरी आणि भाविक यांच्यात अस्वस्थता निर्माण झाली आहे. जागृत देवस्थान म्हणून सिद्धनाथ मंदिर ओळखले जात आणि राज्याच्या विविध भागातून भाविक येथे येत असतात. रस्त्यावरील महिला, घरातील नागरिक सुरक्षित राहिले नाहीतच पण आता मंदिरातील देव देखील असुरक्षित झाल्याने ग्रामीण भागात देखील चिंता व्यक्त करण्यात येत आहे.     

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !