BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२१ ऑक्टो, २०२२

रस्त्याच्या कामाचा निधी हडप ? चिखल तुडवत पोरं खड्डयातून शाळेला !

 



शोध न्यूज : रस्त्याच्या मुरूमीकरणाचे कसलेही काम न करता रस्त्याच्या कामाचा निधी हडप करण्यात आल्याचा मोठा आरोप करण्यात आला असून याची चौकशी करा अन्यथा आंदोलनाला सुरुवात करू असा रोखठोक इशारा माढा तालुक्यातील घोटी येथील तरुणांनी दिला आहे. 


ग्रामीण भागातील जनता विविध नागरी समस्यांचा सामना नेहमीच करीत असते आणि सरकारी योजना त्यांच्यापर्यंत जाता जाता वाटेतच झिरपून जातात. सामान्य सुविधा देखील गावकरी, शेतकरी मंडळींपर्यंत पोहोचत नाहीत, त्यांनी आक्रोश केला तरी कुणी त्यांच्याकडे लक्ष देत नाहीत अशी परिस्थिती कायमच असते. शेतकरी बांधवाना शेतात जाण्यासाठी रस्ता नसतो तर शेतमाल आणण्यासाठी त्यांना प्रचंड यातना सहन कराव्या लागतात. वस्तीवर राहणारी शाळकरी मुलं शाळेला गावात येतात पण त्यांना चिखल तुडवत, खड्डे चुकवत आणि अनेकदा ओढ्या नाल्यातून वाट काढत यावे लागते. एवढ्या साध्या सुविधा मिळत नाहीत त्यामुळे अन्य समस्या तर अशाच वरचेवर विरून जातात. 


सद्या सगळीकडे पावसाचा जोरदार धिंगाणा सुरु आहे त्यामुळे ग्रामीण भागात तर प्रचंड अडचणी येताना दिसत आहेत. आधीपासूनच धड नसलेले रस्ते चिखल पाण्यात हरवून गेले आहेत आणि त्यातच रस्त्याच्या कामाचा निधीच हडप केल्याची गंभीर तक्रार समोर आली आहे. माढा तालुक्यातील घोटी येथील अक्षय हनुमंत बागल आणि दत्तात्रय प्रभाकर लोंढे यांनी रस्त्याच्या कामात मोठी भानगड झाल्याचा आरोप करीत प्रत्यक्ष रस्त्याची पाहणी करून संबंधितावर कारवाई करण्याची जोरदार मागणी केली आहे. संबंधित अधिकारी यांनी समक्ष चौकशी नाही केली तर आंदोलन काण्याचा लेखी इशारा देखील त्यांनी पंचायत समितीला दिला आहे. त्यामुळे आता अधिकारी काय करतात याकडेच परिसराचे लक्ष लागले आहे. 


घोटी येथील गळगुंडे वस्ती, जळोली रस्ता, बनवस्ती, लोंढे वस्ती ते कणसे वस्ती या रस्त्यांची अत्यंत दुरवस्था झालेली आहे. यातील तीन रस्ताच्या मुरूमीकरणाचे काम अत्यंत निकृष्ठ दर्जाचे झाले असल्याचा आरोप तर त्यांनी केलाच आहे पण जळोली रस्त्याचे मुरुमीकरण झालेच नाही, परंतु या रस्त्याचे मुरुमिकरण झाले असल्याचे कागदावर दाखवून रस्त्याच्या कामाचा निधी हडप केला असल्याचे बागल आणि लोंढे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. याबाबत ४ ऑक्टोबर आणि १२ ऑक्टोबर रोजी असे दोन अर्ज त्यांनी गट विकास अधिकारी, पंचायत समिती माढा (कुर्डूवाडी) यांना दिले आहेत. 


पहिला अर्ज दिल्यानंतर काही चौकशी होईल अशी त्यांची  अपेक्षा होती परंतु तसे काहीच न घडल्यामुळे त्यांनी दुसरा अर्ज देवून वाट पाहिली आहे. गंभीर तक्रार करूनही अद्याप कसलीही दखल घेतली गेली नाही. दुसऱ्या अर्जात त्यांनी २५ ऑक्टोबर पासून आंदोलनाचे हत्यार उपसण्याचा इशारा देखल दिला आहे. पंचायत समिती अधिकारी यांनी रस्त्यांच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी करावी आणि संबंधितावर कारवाई करावी अशी मागणी केली आहे. (Serious complaint of corruption in road works in Madha taluka) अद्याप तरी कुणी अधिकारी इकडे फिरकलेले नसून यामुळे तर यातील संशयाला अधिक वाव मिळताना दिसू लागला आहे.


 तक्रारदार यांच्या म्हणण्यानुसार जर रस्त्याचे काम न करता निधी हडप केला असेल तर ही अत्यंत गंभीर बाब आहे. दोन वेळा एवढी गंभीर तक्रार करूनही अधिकारी कशासाठी मौन बाळगून आहेत ? हा प्रश्नच काही उत्तरे देवू लागला आहे. स्थानिक अधिकारी लक्ष देणार नसतील तर वरिष्ठ पातळीपर्यंत आवाज उठवला जाईल असे देखील तक्रारकर्ते अक्षय बगल यांनी सांगितले. रस्त्याच्या कामाबाबत आता आंदोलनही हाती घेतले जाणार असून यामुळे लवकरच सत्य बाहेर येण्याची शक्यता आहे. निधी हडप केल्याचा गंभीर आरोप केल्याने परिसरात अनेकांच्या भुवया उंचावल्या असून नेमका काय प्रकार आहे याबाबत सर्वांच्याच नजरा चौकशीकडे लागलेल्या आहेत.  


      

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !