BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१६ ऑक्टो, २०२२

-- तर सरपंच, ग्रामपंचायत सदस्य होणार अपात्र !

 



शोध न्यूज : ग्रामपंचायतीचा कर भरण्यास टाळणे आता भलतेच महागात पडणार असून कर न भरलेल्या सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांवर थेट अपात्रतेची कारवाई होणार आहे. 


गावातील लोकांकडून ग्राम पंचायत कर जमा करीत असते आणि यातून वीज, पाणी, रस्ते अशा विविध सोई केल्या जाव्यात असे अपेक्षित असते. कराची रक्कम आणि पाणीपट्टी वेळेत वसूल होण्याची आवश्यकता असते परंतु तसे घडताना दिसत नाही. सोलापूर जिल्ह्यातील बहतेक तालुके कर वसुलीबाबत उदासीन असल्याचे समोर आले आहे.  पंढरपूर, सांगोला, मंगळवेढा, मोहोळ, माढा, माळशिरस, अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर या तालुक्यांतील करवसुली खूपच कमी आहे. या ग्रामपंचायतीची एप्रिल ते सप्टेंबर या काळातील पन्नास टक्केही वसुली झालेली नाही. निवडणुकीच्या काळात कर भरला जातो आणि नंतर मात्र पुढील निवडणुकीपर्यंत कर भरलाच जात नाही अशांची संख्या मोठी आहे. 


सोलापूर जिल्ह्यात १ हजार १९ ग्रामपंचायतीकडून पाणीपट्टी आणि मालमत्ता कर याची ७१ कोटी ५३ लाख रुपयांची वसुली अपेक्षित आहे. करमाळा आणि बार्शी तालुके सोडले तर जिल्ह्यातील अन्य सर्व तालुक्यातील वसुली ही ४९ टक्क्यांपेक्षा कमीच आहे. कर थकविणाऱ्यात बहुतेक ग्राम पंचायतीच्या सदस्यांचा समावेश असल्याचे दिसत आहे. गेल्या वर्षीची ८ कोटी रुपयांची थकबाकी अद्याप वसूल झालेली नाही. ज्यांनी ग्रामस्थांना सांगून कराची वसुली होण्यात योगदान देणे अपेक्षित आहे त्यांनीच मोठी थकबाकी ठेवलेली आहे. सरपंच आणि सदस्य यांनीच ग्रामपंचायतीचा कर भरला नाही तर गावकरी कर भरण्यास पुढे कसे येणार हाच मूळ आणि मोठा प्रश्न आहे.  याबाबत जिल्हा परिषद आता अलर्ट मोडवर असून कराची थकबाकी असलेल्या ग्रामपंचायत सरपंच आणि सदस्यांची माहितीच जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाने आता मागवली आहे.


ग्रामपंचायत कर न भरलेल्या सरपंच आणि सदस्य यांच्यावर आता मोठी कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला असून बिल पाठवल्यापासून एक महिन्यात जर ग्रामपंचायत कर भरला नाही तर सदर सरपंच आणि सदस्य हे ग्रामपंचायत अधिनियम कलम ३९ नुसार अपात्र होतील असा इशाराच उप मुख्य कार्यकारी अधिकारी इशाधीन शेळकंदे यांनी दिला आहे. अशा सरपंच आणि सदस्य यांनी माहितीही सादर करण्याचे आदेश ग्रामपंचायत ग्रामसेवकांना देण्यात आले आहेत. गावकरीही वर्षानुवर्षे कर भरीत नाहीत, त्यामुळे थकबाकीदार ग्रामस्थांना नोटीस बजावण्यात यावी आणि पुन्हा पुन्हा नोटीसा देवूनही थकबाकी न भरणाऱ्या गावकऱ्याचे नळ कनेक्शन तोडले जाणार आहे. 


ग्रामपंचायत कराची रक्कम मोठी असेल तर या रकमेचे टप्पे करून दिले जात आहेत. कराच्या रकमेतूनच गावात सोई सुविधा दिल्या जातात त्यामुळे आधी सरपंच, उप सरपंच आणि सदस्यांनी स्वत:चा कर भरून ग्रामस्थांना कर भरण्याचे आवाहन करण्याची आवश्यकता आहे. कराची मागणी झाल्यानंतर एक महिन्यात सरपंच, सदस्य यांनी जर कर भरला नाही तर ते अपात्र होतील असे जिल्हा परिषदेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी स्पष्ट केले आहे. (Sarpanch, Gram Panchayat member will be disqualified if tax is not paid) या कारवाईच्या इशाऱ्याने अनेकांचे धाबे दणाणले असून यामुळे मोठी कर वसुली होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. 





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !