शोध न्यूज : बारामती - मोरगाव मार्गावर झालेल्या भीषण आणि विचित्र अपघातात माय लेकरासह तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
दिवाळीचा आनंद साजरा होत असतानाच या अपघाताने दु:खाची छाया परिसरात निर्माण केली आहे. बारामती तालुक्यातील माळवाडी, फोंडवाडा येथील दशरथ साहेबराव पिसाळ हे ६२ वर्षे वयाचे गृहस्थ बारामती - मोरगाव रस्त्यावरून चालत येत होते आणि याच वेळेस करावागज येथील अतुल गंगाराम राऊत (वय २२) आणि त्याची आई नंदा राऊत हे दोघे दुचाकीवरून निघाले होते. याच दरम्यान पुण्याच्या दिशेने निघालेल्या एका कारने दुचाकीला उडवले पण यात पादचारी दशरथ पिसाळ आणि अतुल गंगाराम राऊत हा तरुण असे दोघे मृत्युमुखी पडले. अतुल यांच्या मागे दुचाकीवर बसलेल्या त्यांच्या आई नंदा राऊत या गंभीर जखमी झाल्या.
जखमी झालेल्या नंदा राऊत यांना उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले परंतु उपचार सुरु असतानाच त्यांचाही मृत्यू झाला. या अपघातात एकूण तिघांचा मृत्यू झाला. जोराची धडक देवून अपघात केलेल्या कारचा चालक कार जागेवरच ठेवून अंधाराचा फायदा घेवून तेथून पळून गेला आहे. दुचाकीला तर धडक दिलीच परंतु यात पायी चालत निघालेल्या ६२ वर्षे वयाच्या व्यक्तीचाही मृत्यू झाला. (Accident Baramati Moragaon road, three people died) फोंडावाड जवळील पेट्रोल पंपाजवळ हा अपघात झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अपघाताची पाहणी करून पोलिसांनी सदर कार ताब्यात घेतली असून चालकाचा शोध पोलीस घेत आहेत.
सदरचा अपघात हा नेमका कशामुळे झाला हे मात्र समजू शकले नाही. पोलिसांनी घटनास्थळाची बारकाईने पाहणी केली असून अज्ञात चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. अपघाताचे कारण पोलिसांच्या तपासात समोर येईल परंतु या अपघाताने परिसरात प्रचंड हळहळ व्यक्त होऊ लागली आहे. आई, तरुण मुलगा आणि एक जेष्ठ नागरिक अशा तिघांचा या अपघाताने बळी घेतला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !