शोध न्यूज : संपत्तीसाठी मुलानेच आपल्या पित्याला रिव्हाल्व्हर दाखवून सांगेल तेथे सही करण्यास सांगत मारहाण केल्याची खळबळजनक तक्रार पोलिसांपर्यंत पोहोचली आहे. विशेष म्हणजे या कामात मुलासह सून आणि नातवंडेही सहभागी झाली होती.
प्रत्येक पिता आपल्या मुलासाठी आपल्या इच्छा गुंडाळून ठेवत मुलाच्या इच्छा पूर्ण करण्यात आपले आयुष खर्च करतो, मुलाला आनंद देण्यासाठी स्वत: कायम दु:खात राहतो पण आपले दु:ख पिता कधी दाखवत नाही. केवळ आणि केवळ मुलाच्या चेहऱ्यावरील समाधान पाहण्यासाठी त्याचे डोळे सदैव आसुसलेले असतात. मोठ्या कौतुकाने तो मुलाचे लग्न लावून देतो पण तेथूनच त्याच्या आयुष्याचे मातेरे सुरु व्हायला लागते. पत्नीचे ऐकून आपला मुलगाच आपल्या मनाविरोधात वागू लागतो असे अनुभव बहुसंख्य पित्यांना येत असतो. वृद्धावस्थेकडे झुकलेल्या अथवा वृद्ध झालेल्या माता पित्यांना यापेक्षा मोठे दुसरे दु:ख नसते. पत्नीच्या कान भरण्यातून संपत्तीसाठी तो आई वडिलांचा थेट जीव घ्यायलाही मागे पुढे पाहत नाही. यापेक्षाही महाभयानक प्रकार समोर आला आहे.
मुलगा, सून, नातू, नात आई इतर पाच सहा जणांनी मिळून ८३ वर्षे वयाच्या प्रल्हाद गणपती घुटे यांना जबर मारहाण करून रिव्हाल्व्हरचा धाक दाखवला आणि आपण सांगतो तेथे सही अंगठा करण्यासाठी धमकावल्याचे हे प्रकरण कुठल्याही संवेदनशील मनाच्या व्यक्तीला यातना देणारे ठरले आहे. घुटे यांच्या संपत्तीचे बेकायादेशी कुलमुखत्यार पत्र आणि बक्षीसपत्र तयार करून घेण्यात आल्याचेही सदर वृद्ध पित्याने आपल्या तक्रारीत म्हटले आहे. कराडच्या उंब्रज येथील मुलगा नितीन, सून वंदना, नातू शुभम, नात टीना तसेच चरेगाव येथील उत्तम केंजळे, कारंडवाडी येथील कल्याण खामकर यांच्यासह गणेश पोटेकर, संदीप पोतले, दिगंबर माळी यांच्याबाबत या वृद्धाने पोलिसात तक्रार केली आहे.
प्रल्हाद घुटे यांनी कष्ट करून पैसा मिळवला, 'नितीराज' नावाचा एक बंगला बांधला, वय वाढत गेले आणि मुलगा नितीन हा त्यांच्या संपत्तीच्या मागे लागला. तुमची सर्व संपत्ती माझ्या नावावर करा म्हणून सारखा तगादा लावू लागला. त्यांच्या कष्टाची संपत्ती हडप करण्यासाठी मिळकती बक्षीसपत्र करून द्याव्यात या हेतूने मुलगा, सून, नातू, नात या सगळ्यांनी संगनमत करून आपल्याला पहिल्या मजल्यावरील एका खोलीत कोंडून ठेवले. खोलीच्या बाहेर पडण्यास मज्जाव करण्यात आला. मुलीला आणि जावयाला भेटायला देखील मनाई करण्यात आली. ज्या पित्याने वाढवले, शिकवले, मोठे केले त्याच पित्याची त्याच्याच घरात ही दुर्दशा झाली होती.
कुणी नातेवाईक घुटे यांना भेटायला आले तर त्यांचावर देखील पाळत ठेवली जायची. दबाव आणून मानसिक खच्चीकरण केले जायचे आणि उपाशीही ठेवले जायचे. संपत्ती बक्षिसपत्र करून देण्यासाठी मुलगा नितीन याने रिव्हाल्व्हर दाखवत दमदाटी केल्याचेही या वृद्ध पित्याने आपल्या फिर्यादीत म्हटले आहे. मुलाने त्यांच्यासमोर रिव्हाल्व्हर ठेवले आणि ठार मारण्याची धमकी देत मी सांगेल तेथे सही अंगठा करायचा असा दबाव टाकला. कराड येथील रजिस्टर नोंदणी ऑफिसमध्ये नेले. अन्य काहींनी देखील 'आम्ही साक्षीदार आहोत, मुलगा सांगतोय तसे करून टाका नाहीतर जड नाईल' अशी धमकी दिली.
इच्छा नसताना मारहाण करून जबरदस्तीने मुलाने कुलमुखत्यारपत्र आणि नातुच्या नावाने बक्षीसपत्र बेकायदेशीरपणे करून घेतले असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. (Revolver threat to father for wealth, beating) शिवाय इतरांनी संपत्तीची कागदपत्रे, आधारकार्ड, चेकबुक, पासपोर्ट साईज फोटो आदी घेवून गेल्याचे देखील त्यांनी म्हटले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !