BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

३१ ऑक्टो, २०२२

सोलापूरचे शिक्षणाधिकारी लाच घेताना रंगेहात पकडले !

 



शोध न्यूज : डिसले गुरुजी वादात बहुचर्चित ठरलेले सोलापूर जिल्हा प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी किरण लोहार हे लाच घेताना रंगेहात पकडले गेले असून त्यांच्यावर पुढील कारवाई सुरु करण्यात आली आहे. 


लाचखोरीच्या घटनात पोलीस, महसूल या विभागाची नेहमी चर्चा होत असली तरी अलीकडे शिक्षण विभाग देखील बरबटलेला असल्याचे अधूनमधून दिसत आहे. आता तर शिक्षणाधिकारी लोहार हेच या सापळ्यात अडकले असल्याने शिक्षण विभागाला मोठा धक्का आणि आश्चर्य देखील आहे. जिल्हा परिषद शाळांचा दर्जा सुधारण्याबाबत सतत मोठमोठे उपदेशाचे डोस पाजणारे आणि अत्यंत शिस्तप्रिय असल्याचे  भासविणारे प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी किरण लोहार आज चक्क तब्बल २५ हजारांची लाच घेताना रंगेहात पकडले गेले आहेत. ग्लोबल टीचर रणजितसिंह डिसले गुरुजी यांच्या वादात किरण लोहार हे खूपच चर्चेत आले होते पण आज खरा चेहरा समोर आला. 


पाचवी ते आठवीचे वर्ग वाढवून देण्यासाठी एका शाळेने वर्गवाढीसाठी परवानगी मागितली होती. प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्याकडे या परवानगीची मागणी करण्यात आली होती. त्याचा आयडी देण्यासाठी तब्बल पन्नास हजार रुपयांची लाच मागण्यात आली होती. सुट्ट्या असल्यामुळे ही रक्कम देण्यास थोडासा उशीर झाला होता. आज मात्र आठवड्याच्या पहिल्याच दिवशी संबंधितांना कार्यालयात बोलावून घेतले आणि त्यांच्याकडून २५ हजार रुपयाची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांना रंगेहात पकडले.  लाचेची मागणी केल्यानंतर संबंधित तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती आणि या विभागाने आज सापळा लावला होता. या सापळ्यात किरण लोहार अलगद अडकले आहेत. 


किरण लोहार हे अनेकदा वादग्रस्त ठरत होतेच शिवाय अनेक शिक्षकांच्या त्यांच्याबाबत तक्रारीही होत्या. मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी लोहार याना नोटीस काढली होती आणि काहीही न बोलण्याचं सूचना केल्या होत्या. कालच उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या तसेच उत्पादन शुल्क विभागाचे मंत्री शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीत लोहार याना राज्यस्तरीय पुरस्कार देण्यात आला होता. पुरस्कार दिल्याच्या दुसऱ्याच दिवशी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांना लाच घेताना पकडले असून यामुळे जिल्हाभर खळबळ उडाली आहे. 


पन्नास हजाराची लाचेची मागणी  असली तरी प्रत्यक्षात २५ हजार रुपयांची लाच घेताना किरण लोहार याना रंगेहात पकडण्यात आले आहे. कार्यालयातच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधिकारी दबा धरून आणि सापळा लावून बसलेले होते त्यात लोहार बरोबर अडकले. (Education officer of Solapur caught red-handed while taking bribe) शिक्षण खात्यात देखील नेमके काय चालू आहे याचेच दर्शन या घटनेने घडले आहे. 




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !