शोध न्यूज : शेती आणि घरकाम करण्यासाठी ठेवलेल्या नोकरानेच आरोग्य सेवकाच्या घरात सात लाखांवर डल्ला मारला असल्याचे एक प्रकरण उघडकीस आले आहे.
घर बंद ठेवून घरमालक परगावी गेला की त्या घरात रात्री हमखास चोरी होते, निर्मनुष्य परिसर असेल तर भर दिवसाही चोरी करण्यास चोर मागे पुढे पहात नाहीत पण ज्याच्या विश्वासावर घर टाकून जावे तो देखील आपल्याच मालावर डल्ला मारतो अशीही काही प्रकरणे समोर येत असतात. आरोग्य सेवक पती पत्नीच्या बाबतीत असाच धक्कादायक पराक्र घडला असून या मोठ्या चोरीच्या घटनेने खळबळ उडाली आहे. माढा तालुक्यात नोकरीस असलेले आरोग्यसेवक विश्वास गोवर्धन काळे हे करमाळा तालुक्यातील नेरले येथील राहणारे आहेत. त्यांच्या पत्नीही आरोग्य सेविका म्हणून काम पाहतात. त्यांच्या अनुपस्थितीत त्यांच्या नोकरानेच साडे सहा लाखांचे दागिने लंपास केल्याची तक्रार काळे यांनी करमाळा पोलिसात दिली आहे.
विश्वास काळे हे आपली आई वडील, पत्नी मुलांसह नेरले येथील घरात राहतात. काळे हे आरोग्य सेवक तर त्यांची पत्नी आरोग्य सेविका म्हणून माढा तालुक्यातील रोपळे येथे काम करतात. शेताची कामे तसेच घरकाम करण्यासाठी त्यांनी नेरले गावच्या विकी सतीश अंधारे या तरुणाला मासिक दहा हजार रुपये पगाराने कामाला ठेवलेले आहे. काळे यांच्याकडे गेल्या चार वर्षांपासून तो काम करीत असून तो शेतातील वस्तीवरच राहतो. रोज शेतातून दुध घेवून येणे तसेच गावातील घरातील कामे तो करीत असतो. आरोग्य सेवक काळे यांची पत्नी प्रशिक्षणासाठी पुणे येथे गेल्याने त्यांचे दागिने घरातील कपाटात कुलुपबंद करून ठेवलेले होते. या कपाटाची चावी मात्र घरातच ठेवली गेली होती.
पत्नी प्रशिक्षणाला गेल्यानंतर काळे यांनी हे कपाट उघडून पाहिलेच नाही, परंतु पत्नी परत आल्यावर त्यांनी घरातील कपाट उघडून पाहिले. यावेळी कपाटातील दागिने जागेवर नसल्याचे आढळून आले. घरात सर्वत्र शोधाशोध केली पण दागिने कोठेच मिळून आले नाहीत. अखेर त्यांनी नोकर विकी अंधारे याच्याकडे चौकशी केली, घरातील कपाटाची चावी घरात कोठे ठेवली जाते हे नोकर विकी अंधारे याला माहित होते. त्याला विचारले असता त्याने उडवाउडवी केली परंतु त्याच्या वागण्यात एकदम बदल जाणवला आणि तो घाबरलेला असल्याचे लक्षात आले. (Servant steals from healthcare worker's house)त्याला विचारातच तो घाबरून गेल्याने त्यानेच दागिने चोरले असल्याची शंका काळे यांना आली आणि त्यांनी त्याच्याविरोधात पोलीस ठाण्यात चोरीची तक्रार दाखल केली.
२ लाख रुपये किमतीचे एक सोन्याचे चैन असलेले अंदाजे चार तोळा वजनाचे मोठे गंठण, सव्वा लाख रुपयांचे एक सोन्याचे चैन असलेले अंदाजे अडीच तोळा वजनाचे लहान गठण,१ लाख रुपये किमतीचे एक सोन्याचा दोन तोळा वजनाचा नक्षीदार नेकलेस, १ लाख ५० हजार रुपये किमतीचे अंदाजे तीन तोळा वजनाच्या सहा नक्षीच्या/पिळाच्या वेगवेगळ्या वजनाच्या अंगठया, १ लाख रुपये किमतीची अंदाजे दोन तोळा वजनाच्या चार कानातील फुले, झुबे, साखळी, गुडे, टॉप्स असे ६ लाख ७५ हजार रुपये किमतीचे दागिने चोरीला गेल्याची तक्रार काळे यांनी दिली आहे. घरातून झालेल्या या मोठ्या चोरीने आणि या चोरीचा आरोप घरकाम करणाऱ्या नोकरावरच असल्याने परिसरात देखील खळबळ आणि चिंता निर्माण झाली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !