BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१८ ऑक्टो, २०२२

फौजदाराने केला धावत्या बसमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग !

 



शोध न्यूज : एका  फौजदाराने धावत्या एस टी बस मध्ये एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल झाला असून यामुळे पोलीस दलात प्रचंड खळबळ तर उडालीच आहे पण जनतेतून प्रचंड संतापाची लाट देखील उसळली आहे. 

रक्षक देखील कसे भक्षक बनतात याची अनेक उदाहरणे यापूर्वी देखील समोर आली असून धावत्या एस टी त देखील असा प्रकार घडल्याचे समोर आले आहे. कोल्हापूर येथील सहाय्यक फौजदार महेश मारुती मगदूम हा सातारा येथील पोलीस क्रीडा स्पर्धेसाठी आला होत. सातारा येथून परत जात असताना चालत्या बसमध्ये वळसे ते काशीळ दरम्यान एका अल्पवयीन महाविद्यालयीन मुलीचा त्याने विनयभंग केल्याची तक्रार पिडीत मुलीने दिल्यानंतर मगदूम याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कराड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यानंतर तो बोरगाव पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. महेश मगदूम हा अधिकारी कोल्हापूर पोलीस मुख्यालयात नेमणुकीस आहे. तो खेळाडू असल्याने पोलीस क्रीडा स्पर्धेसाठी तो सातारा येथे गेला होता.


पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सातारा येथील पिडीत मुलगी शिक्षणाच्या निमित्ताने कराड येथे राहायला आहे. या मुलीची परीक्षा असल्यामुळे ती बारामती - कोल्हापूर या बसमधून कराडला निघाली होती. ती बसमध्ये बसल्यानंतर काही वेळाने एक अनोळखी व्यक्ती बसमध्ये आली आणि तिच्या शेजारी बसली. बसमध्ये शेजारी बसल्यानंतर त्या मुलीला नाव, गाव विचारायला सुरुवात केली. ओळख नसतानाही बोलणे सुरु करून जवळीक साधण्याचा प्रयत्न सुरु केला. आपण कोल्हापूर येथे पोलीस असल्याची माहितीही त्याने या मुलीला दिली. आपण मित्र बनू, चॅटिंग करू असे म्हणत त्याने या मुलीकडे मोबाईल नंबर मागितला. सदर मुलीने त्याला मोबाईल क्रमांक देण्यास नकार दिला. 


मुलगी मोबाईल क्रमांक देण्यास नकार देत असतानाही याने मात्र माघार घेतली नाही. त्याच्याशी बोलणे नको म्हणून मुलीने आपल्या कानात हेड फोन घातला आणि त्याच्याकडे पूर्ण दुर्लक्ष केले. काही वेळ थांबून त्याने या मुलीचा अंगास स्पर्श करून तिच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल अशा प्रकारे चाळे सुरु केले. (A police officer molested a minor girl in a running bus) त्रस्त झालेल्या या मुलीने काशीळ गावाजवळ पोहोचल्यावर त्याला दुसऱ्या जागेवर बसण्यास सांगितले. दरम्यान या मुलीने घडलेला प्रकार कराड येथील आपल्या वर्गमित्रास आणि कुटुंबियांना फोनवरून सांगितला.


कराड बस स्थानकावर बस पोहोचली तेंव्हा या मुलीचे मित्र पोलिसांना घेवूनच तेथे हजार झाले आणि बस स्थानकात पोहोचताच पोलिसांनी महेश मगदूम याला ताब्यात घेतले.  पिडीतेच्या फिर्यादीवरून पोलिसांनी महेश मगदूम याच्याविरोधात विनयभंग तसेच पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. प्रवासात मुली, महिला पोलीसंच्याकडे एका आश्वासक आधाराने पहात असतात आणि पोलिसांची त्यांना तशी मदतही होत असते पण या घटनेने पोलिसांच्या प्रतिमेलाच धक्का लावण्याचा प्रकार केला आहे. ज्यांच्यावर विश्वास ठेवला जातो त्यांच्यापासूनच धोका असल्याची जाणीव करून देणारी ही घटना असून पोलीस दलातही खळबळ उडाली आहे. 




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !